गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2024 (13:35 IST)

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

hathras tragedy
भक्तिभाव ही एकच भावना सर्व भक्तांना स्वयंघोषित ‘भोले बाबा’ च्या सत्संगापर्यंत घेऊन आली आणि भक्तांच्या मृत्यूचं कारण ठरली.
 
भक्तांचे मृतदेह चिरडले गेले. महिला आणि बालकांसह 123 लोकांचे मृतदेह हाथरस येथील शेतात विखुरलेले होते, मात्र भक्तिभाव अजिबात कमी झाला नाही.
 
मंदिरं आणि धार्मिक आयोजनांच्या बाबतीत हे नेहमीच होतं. अनेक लोकांचा चेंगराचेंगरीत जीव गेला. भक्तिरसाने ओतप्रोत असलेल्या भावनेचं एका भेदरलेल्या गर्दीत रुपांतर होतं आणि मग त्यांच्या मार्गात अशा काही गोष्टी येतात, ज्या नष्ट होऊन जातात.
 
कुंभमेळा, वैष्णोदेवी, नैनादेवी, सबरीमला ही अशीच उदाहरणं आहेत, जिथे अनेक लोक अतिउत्साहाच्या भरात चिरडले गेले आहेत. मात्र श्रद्धा आपल्या गतीने पुढे जात आहे.
 
मांढरदेवी ते हाथरस : धार्मिक कार्यक्रमातल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा आहे हृदयद्रावक इतिहास
 
हवालदार ते स्वयंघोषित धार्मिक गुरू झालेले भोले बाबा उर्फ नारायण साकार उर्फ सूरजपाल जाटव त्यांच्या अनुयांयांप्रति इतके निष्काळजी असलेले पहिले धार्मिक गुरू नाहीत.
 
पोलिसांच्या मते सत्संगाच्या आयोजकांनी कार्यक्रमाला येणाऱ्यांची संख्या कमी करून सांगितली. जितके लोक सांगितले होते त्यापेक्षा तिप्पट लोक कार्यक्रमाला आले होते.
 
चेंगराचेंगरीची जी कारणं सांगितली जात आहेत, त्यातून दोन गोष्टी समोर येत आहेत.
 
आयोजकांनी गर्दीला शेतातल्या रस्त्याने जाण्यासाठी मनाई केली किंवा बाबांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी लोकांना त्यांच्या रस्त्यापासून दूर करण्यासाठी धक्का दिला.
 
गर्दीसाठी ये -जा करण्यासाठी कोणत्याही मार्गाची सोय केली नव्हती आणि चेंगराचेंगरीत जे लोक जखमी झाले त्यांना तात्काळ कोणतीही मदत दिली गेली नाही.
 
जे झालं त्याबद्दल त्याची कोणतीही जबाबदारी बाबा घेत नाहीयेत. संपूर्ण दुर्घटनेपासून त्यांनी स्वत:ला लांब ठेवलं आहे आणि आता तो कुठे दिसतही नाहीयेत.
 
गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न उपस्थित का करत नाही?
भक्तांना त्यांच्या नशिबाचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळालं आहे असं काहीसं चित्र निर्माण केलं जात आहे.
 
गुरू या सगळ्यासाठी जबाबदार नाहीत. यावरूनच गुरू आणि त्याचे अनुयायी यांचे संबंध कसे आहेत हे दिसून येतं. गुरू आदेश देतात आणि भक्तगण त्याचे पालन करतात. भक्त सेवा करतात आणि गुरू त्याचा स्वीकार करतात.
 
अशा स्वयंघोषित बाबा लोकांना अंधविश्वास हवा असतो आणि वैयक्तिक स्वार्थासाठी ते अनुयायांचा वापर करून घेतात. महिला या सगळ्याबाबतीत अतिशय असुरक्षित असतात.
 
महिला अनुयायांनी ज्या गुरुंवर लैंगिक शोषणाचा आरोप लावला अशा धार्मिक गुरुंची यादी मोठी आहे. प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांचा आधार घ्यायचा झाल्यास भोले बाबासुद्धा त्यापैकी एक आहेत.
 
ज्या बाबा लोकांवर बलात्काराचा आरोप आहे त्यात गुरमीत राम रहीम आणि आसाराम बापू यांचा समावेश आहे.
 
असं सगळं असतानाही अनुयायी धार्मिक गुरुंना अजूनही मानतात. श्रद्धा आंधळी नसते, मात्र ती तेच पाहते जे तिला बघायचं असते.
 
श्रद्धेचा अर्थ असा की गुरुचं कायमच योग्य आहे मग ते कितीही चूक का असेना.
 
अनुयायी मानतात की गुरू कधीच कुकर्म करू शकत नाही. कधीच चुकीचं काम करत नाही त्यामुळे ते जे करतील ते योग्यच असेल या भक्तीच्या तर्कावर अतर्क्य श्रद्धा आधारित आहे.
 
एकदा गुरुचं दिव्यत्व स्वीकारलं की भक्ताला वाटतं की गुरुला कुटुंब, मित्रमैत्रिणी यांच्यापेक्षाही वरचं स्थान द्यायला हवं.
 
मृत्यूला जबाबदार कोण? गुरू की अनुयायी?
‘लव चार्जर’ गुरू राम रहीम यांनी 2017 मध्ये सरकार आणि न्यायव्यवस्थेला धमकावण्यासाठी त्यांच्या अनुयायांचा वापर केला होता. त्यावेळी राम रहीम यांना बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयात आणलं होतं.
 
मात्र भक्तांना या आरोपांची काही पर्वा नव्हती. राम रहीम यांच्यावर बलात्काराशिवाय हत्येचाही आरोप होता. तसंच 400 अनुयायांना नपुसंक केल्याच्या आरोपाची चौकशीही सुरू होती.
 
मात्र भक्तांसाठी गुरू कायद्यापेक्षा मोठे होते. त्यांना वाटत होतं की राम रहीम यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग न लावता त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी.
 
जेव्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं तेव्हा त्यांचे अनुयायी ओक्साबोक्शी रडले आणि त्यांच्या या भावनावेगामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. त्यात 38 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोक जखमी झाले.
 
या मृत्यूला जबाबदार कोण होतं? गुरू की अनुयायी?
 
राम रहीम यांच्यासारखेच हरियाणामध्ये आणखी एक स्वयंघोषित बाबा आहेत, जगतगुरू रामपाल महाराज. त्यांनीही त्यांच्या भक्तांचा असाच वापर करून घेतला होता.
 
रामपाल यांनी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून त्यांच्या आश्रमात शस्त्रास्त्रं जमा केली होती. त्याबरोबर कमांडोज चं एक खासगी सैन्यही तयार केलं होतं.
 
जेव्हा रामपाल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाला तेव्हा पोलीस इतके घाबरले होते की अटकेसाठी पोलिसांनी निमलष्करी दलाला मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
 
अनुयायी आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत चार महिलांचा मृत्यू झाला होता. या लोकांनी भक्तिभावाच्या नावाखाली स्वत:ला समर्पित केलं होतं.
 
गुरुची नैतिकता सर्वश्रेष्ठ आहे असा श्रद्धेचा अर्थ आहे. त्यावर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत.
 
त्यामुळे गुरुवर बलात्कार, अपहरण, हत्या, जमीन हडपणे किवा नपुंसक करणं, आर्थिक गैरव्यवहार असे आरोप असले तरी भक्तांसाठी तो कायम पवित्रच असतो. अशा परिस्थितीत गुरुविरुद्ध काही कट रचला आहे असं त्याला वाटत राहतं. असे आरोप स्वयंघोषित बाबांवर होत आले आहेत.
 
गुरुच्या प्रतिष्ठेचा विचार करता गुरुपेक्षा भक्तांवर जास्त विश्वास ठेवावा लागतो. ज्या गुरुवर अनुयायांची श्रद्धा आहे तो जर फ्रॉड निघाला तर भक्ताची ओळखही आपोआप तशीच होत जाते. त्यामुळे तिथे प्रतिमेचा प्रश्न उभा राहतो.
 
गुरुचे अनुयायी हा एक समुदाय तयार होतो आणि त्याचं सदस्यत्व ही त्यांची ओळख होते. गुरुवर प्रश्न उपस्थित केला तर समुदायातून बहिष्कृत करण्यात येते. त्यामुळे तिथे निष्ठावान राहणं महत्त्वाचं ठरतं.
 
हाथरस: 'मी तिथे पोहोचलो, तेव्हा जागोजागी मृतदेह पडले होते', चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणाहून ग्राऊंड रिपोर्ट
 
भक्ती आणि सत्ता
ही श्रद्धा फक्त गुरुंसाठीच उपयोगी नाही तर गुरुंच्या सत्ताधारी मित्रांसाठीसुद्धा या गुरुंचं स्थान महत्त्वाचं आहे. कारण त्या मैत्रीचं मतांत रुपांतर होऊ शकतं.
 
मुख्य प्रवाहातल्या गुरुंना राजकीय क्षेत्रात येणं आवडत नाही मात्र राम रहीम यांच्यासारखे काही धर्मगुरू आहेत जे कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जोडून घेतात.
 
यामुळे गुरुची शक्ती अनेक पटींनी वाढते कारण त्यामुळे राजकीय संरक्षण मिळतं. अधिकाऱ्यांची बदली-पोस्टिंग आणि निवडणुकीत उमेदवारांना तिकीट देण्याइतकी ताकदही त्यांना मिळते.
 
धर्मगुरू आणि राजकीय नेते यांचं संधान फक्त मतांसाठी नसतं. कारण राजकीय नेते अतिशय अंधश्रद्ध असतात. देवाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी गुरुंच्या शक्तीवर ते विश्वास ठेवतात.
 
सर्व पक्षाचे नेते आपल्या बाजूने निकाल यावेत यासाठी निवडणुकीच्या आधी सल्ला, आशीर्वाद घेतात, तसंच प्रार्थना करतात.
 
उदाहरणादाखल सांगायचं झालं तर काही प्रसारमाध्यमांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा फोटो प्रकाशित केला आहे. त्यात ते भोले बाबांच्या सत्संगात भाग घेताना दिसत आहेत. तसंच बाबांची स्तुती करणारी एक्सवरची एक पोस्टही समोर आणली आहे.
 
प्राचीन कथांमध्ये असं सांगितलं आहे की, जगन्नाथाच्या वार्षिक रथ यात्रेदरम्यान भक्तगण मोक्ष मिळवण्यासाठी स्वत:ला रथाखाली द्यायचे.
 
त्याउलट हाथरसमध्ये चेंगराचेंगरीदरम्यान ज्या महिला आणि लहान मुलं गेली त्यांनी आपल्या नशिबाचा निर्णय घेतला नव्हता. ते आशीर्वाद घेण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी तिथे आले होते.
 
मात्र ते निष्काळजीपणा आणि संवेदनहीनतेला बळी पडले. असं असलं तरी श्रद्धा आपल्या गतीने पुढे सरकतेच आहे.
 
Published By- Dhanashri Naik