बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (14:56 IST)

हाथरस: 'मी तिथे पोहोचलो, तेव्हा जागोजागी मृतदेह पडले होते', चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणाहून ग्राऊंड रिपोर्ट

अ‍ॅम्ब्युलन्सच्या रांगा, बसमधून वेगानं उतरणारे एसडीआरएफचे जवान, चेंगराचेंगरीनंतर सर्वत्र पसरलेले बूट-चपलांचे ढिग, लाईव्ह रिपोर्टिंग करणारे पत्रकार आणि बेपत्ता झालेल्या नातेवाईकांना शोधणारे लोक.
 
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंद्राराऊ शहराजवळ सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीनंतरचं हे विदारक दृश्य आहे. मात्र, या दुर्घटनेची संपूर्ण कहाणी कळण्यासाठी इतकंच पुरेसं नाही.
 
या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 120 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार म्हणाले की, यासंदर्भात एफआयआर नोंदवला जाणार आहे. त्याचबरोबर या घटनेची पूर्ण चौकशी केली जाणार आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतांश महिला आहेत.
 
या सत्संग कार्यक्रमाच्या आयोजनाची तयारी अनेक दिवसांपासून सुरू होती. आठ दिवसात कार्यक्रमासाठीचा मंडप लावून झाला होता.
 
कार्यक्रमाच्या आयोजकांनी प्रशासनाकडे सत्संगसाठी परवानगी मागितली होती. त्यात त्यांनी जवळपास 80 हजार लोक या सत्संग कार्यक्रमाला हजर राहतील, असं म्हटलं होतं. प्रत्यक्षात कार्यक्रमाला येणाऱ्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त होती.
 
प्रत्यक्षदर्शी आणि भाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्संग संपल्यानंतर कार्यक्रमाला आलेले सर्व भाविक बाबांचा आशीर्वाद (त्यांच्या पायाची धूळ) घेण्यासाठी घाई करू लागले आणि यातूनच चेंगराचेंगरी झाली.
 
'जो एकदा पडला, तो उभा राहू शकलाच नाही'
अलीगडला एटाशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर असलेल्या सिकंद्राराऊ शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील फुलराई गावात हा सत्संग कार्यक्रम होता.
 
तिथे कार्यक्रमासाठी अनेक एकर जमिनीत मंडप लावण्यात आला होता. आता घाईघाईनं तो मंडप काढला जातो आहे.
 
या दुर्घटनेत बहुतांश लोकांचा मृत्यू कार्यक्रमाच्या ठिकाणाच्या पलीकडच्या बाजूस महामार्गाच्या कडेला झाले आहेत. तिथे महामार्गाला उतार असलेली जागा पावसामुळे निसरडी झाली आहे.
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरी जो खाली पडला त्याला उभं राहण्याची संधीच मिळाली नाही. दिवसा पाऊस झाला होता आणि त्यामुळे माती ओली झालेली होती. त्यातच ती जागा निसरडीसुद्धा झाली होती. यामुळे तिथली परिस्थिती आणखीच कठीण झाली होती.
 
कार्यक्रमाच्या ठिकाणाहून जाण्यासाठी नारायण साकार विश्व हरि उर्फ 'भोले बाबा' यांच्यासाठी एक वेगळा रस्ता बनवण्यात आला होता. अनेक महिला बाबांचं जवळून दर्शन घेण्यासाठी उभ्या होत्या.
 
सत्संग संपल्याबरोबर महामार्गावर गर्दी वाढली. नारायण साकार आपल्या वाहनाकडे जात होते आणि त्याच वेळी चेंगराचेंगरी झाली.
 
नारायण साकार यांचे भक्त चेंगराचेंगरी अडकले होते. मात्र, ते तिथे न थांबताच निघून गेले. या दुर्घटनेनंतर बाबा किंवा सत्संग कार्यक्रमाशी निगडीत लोकांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेलं नाही.
 
भक्तांची श्रद्धा
उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातून आलेल्या गोमती देवी यांच्या गळ्यात नारायण साकार यांचा फोटो असलेलं लॉकेट आहे. गोमती देवींनी ते अत्यंत श्रद्धेनं घातलं आहे.
 
त्या ज्या बसमधून आल्या होत्या, त्यातील दोन प्रवासी बेपत्ता आहेत. या दुर्घटनेनंतर सुद्धा नारायण साकार यांच्यावरची गोमती देवींची श्रद्धा कमी झालेली नाही.
 
काही तास शोधाशोध केल्यावर बेपत्ता लोकांना शोधण्यात अपयश आल्यानंतर, बहराइचहून आलेली बस उर्वरित भाविकांना घेऊन परत निघून गेली.
 
या भीषण दुर्घटनेनंतर सुद्धा, या समूहातील भाविकांचा नारायण साकार यांच्यावरचा विश्वास आणि श्रद्धा तशीच कायम आहे.
 
जवळपास चार वर्षांपूर्वी बाबांच्या अनुयायांच्या संपर्कात आलेल्या गोमती देवी गळ्यातील नारायण साकार यांचा फोटो असलेली माळ दाखवत दावा करतात की, "ही माळ गळ्यात घातल्यानं फायदा होतो, शांतता मिळते, रोग बरे होतात, घरातील अडचणी दूर होतात, रोजगार मिळतो."
 
'बहराइच'हूनच आलेले दिनेश यादव म्हणतात, "आमच्याकडे लोक बाबांचा फोटो ठेवून पूजा करायचे. त्यांना पाहून आम्हीदेखील पूजा करू लागलो. एक वर्षापासून आम्ही त्यांचे अनुयायी झालो आहोत. अद्याप आम्हाला कृपेचा अनुभव आलेला नाही, मात्र बाबांवर आमचा विश्वास आहे. त्यांच्याकडे जी इच्छा व्यक्त केली जाते ती पूर्ण होते."
 
या दुर्घटनेसाठी नारायण साकार जबाबदार आहेत असं दिनेश यांना वाटत नाही.
 
चेंगराचेंगरी नंतरची परिस्थिती
कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चेंगराचेंगरी झाली. जखमींना घाईघाईनं सिकंद्राराऊ येथील कम्युनिटी हेल्थ सेंटर (सीएचसी) मध्ये नेण्यात आलं. तिथे गेलेले पत्रकार सांगतात की, सीएचसीच्या ट्रॉमा सेंटरच्या अंगणात मृतदेहांचा ढिग लागला होता.
 
हाथरसमध्ये एक दशकाहून अधिक काळ पत्रकारिता केलेले बी एन शर्मा सांगतात, "मी चार वाजता इथे पोहोचलो. जागोजागी मृतदेह पडले होते. एका मुलीचा श्वास सुरू होता. तिला उपचार मिळू शकले नाहीत आणि माझ्या समोरच तिचा मृत्यू झाला."
 
तसं पाहता हे सिकंद्राराऊमधील सर्वात मोठं हॉस्पिटल आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार करण्याची या हॉस्पिटलची क्षमता नाही.
 
या दुर्घटनेनंतर सुरूवातीला जे कळालं त्यानुसार 10-15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. सरकारी अधिकारी सुद्धा जवळपास चार वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
 
संध्याकाळी जवळपास सहा वाजता बीबीसीशी बोलताना हाथरसचे पोलिस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी 60 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली होती. त्यानंतर दर तासागणिक मरणाऱ्यांची संख्या वाढत गेली.
 
प्रशासनानं जवळपासच्या एटा, कासंगज, आग्रा आणि अलीगड या जिल्ह्यांमध्ये मृतदेह पाठवले. ज्यांचे नातेवाईक किंवा कुटुंबिय बेपत्ता झाले होते त्यांच्यासाठी हे खूपच अडचणीचं झालं होतं.
 
नातेवाईकांची शोधाशोध
मथुरेचे रहिवासी असलेले आणि गुरुग्राममध्ये प्लंबरचं काम करणारे विपुल आपल्या आईला शोधण्यासाठी काही मित्रांसोबत भाड्याची टॅक्सी करून रात्री जवळपास 11 वाजता सिकंद्राराऊ इथं पोहोचले.
 
त्यांनी हेल्पलाइन क्रमांक, कंट्रोल सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये फोन केला. मात्र त्यांना आपल्या आईबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
 
विपुल हाथरसच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचले. तिथे जवळपास 30 मृतदेह आणण्यात आले होते. त्यांना तिथेही आईबद्दल काहीच कळालं नाही.
 
रात्री जवळपास दोन वाजता ते अलीगडच्या जे एन मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. तिथे ते आपल्या आईला शोधत होते.
 
विपुल सांगतात, "माझी आई सोमवती, जवळपास एक दशकापासून बाबांची अनुयायी होती. तिच्या मनात बाबांबद्दल प्रचंड श्रद्धा होती. तिच्यासोबत आलेल्या महिलांनी जेव्हा सांगितलं की त्या बेपत्ता झाल्या आहेत, त्यानंतर मी लगेचच गुरुग्रामहून इथं आलो."
 
विपुल यांच्याप्रमाणेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले अनेकजण आपल्या नातेवाईक, कुटुंबियांना शोधण्यासाठी धावपळ करत होते.
 
कासगंजहून आलेले शिवम कुमार यांची आईसुद्धा बेपत्ता आहे. ते कम्युनिटी हेल्थ सेंटरला (सीएचसी) पोहचेपर्यंत इथून सर्व मृतदेह दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. ते आपली आईचं आधार कार्ड घेऊन इकडे तिकडे शोध घेत होते.
 
अलीगडहून आलेल्या बंटी यांच्याकडे सीएचसीबाहेरचा एक फोटो होता. त्यामध्ये त्यांची आई मौहरी देवी अनेक महिलांबरोबर सीएचसीच्या बाहेर जमिनीवर पडलेल्या होत्या. प्रसारमाध्यमांमधून समोर आलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी आपल्या आईला ओळखलं आहे.
 
बंटी यांना माहित आहे की त्यांची वृद्ध आई आता जिवंत नाही. त्यांना फक्त लवकरात लवकर आपल्या आईचा मृतदेह मिळवायचा आहे.
 
बंटी म्हणतात, मी थेट इथे आलो आहे. मला कळत नाही की कासगंजला जाऊ, एटा जाऊ, अलीगडला जाऊ की हाथरसला जाऊ." ते कंट्रोल सेंटरच्या अनेक क्रमांकावर फोन करतात, मात्र कुठुनंच त्यांना निश्चित माहिती मिळत नाही. एक ऑपरेटर त्यांना सर्व हॉस्पिटलमध्ये जाऊन शोध घेण्याचा सल्ला देतो.
 
ओळख कशी पटवावी?
दुर्घटनेत मरण पावलेल्या अनेकांची ओळख रात्री 12 वाजेपर्यत सुद्धा पटू शकली नव्हती. ज्यांची ओळख पटली आहे, प्रशासनानं त्यांची यादी जाहीर केली आहे. मात्र बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांसमोर त्यांचा शोध घेण्याचं आव्हान आहे.
 
नारायण साकार यांच्या सत्संग कार्यक्रमाला येणारे बहुतांश लोक आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आणि मागासवर्गीय आहेत. एकमेकांच्या संपर्कात आल्यानं आपण अनुयायांच्या जवळ असल्याचं त्यांना वाटतं. आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणींना तोंड देण्यासाठी नारायण साकार यांचा आधार ते घेतात.
 
स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही वर्षात नारायण साकार यांनी हाथरसमध्ये अनेकवेळा सत्संगाचे कार्यक्रम केले आहेत. प्रत्येक वेळेस आधीपेक्षा जास्त गर्दी जमा होते. यातून हे दिसून येतं की सत्संगाशी जोडलं जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
 
पत्रकार बी एन शर्मा सांगतात, "बाबांच्या सत्संगात प्रसारमाध्यमांना प्रवेश नसतो. व्हिडिओ बनवता येत नाही. बाबा प्रसारमाध्यमांमधून सुद्धा फारसा प्रचार करत नाहीत."
 
बी एन शर्मा यांनी अनेकवेळा बाबांचा सत्संग कार्यक्रम बाहेरून पाहिला आहे. त्यांच्या मते, सत्संगी खूपच शिस्तबद्ध असतात. सत्संग जिथे होतो त्या ठिकाणाची साफ-सफाई सत्संगी स्वत:च करतात. इतर जबाबदाऱ्या देखील ते स्वत:च सांभाळतात. गर्दीचं नियोजन करण्यापासून ते ट्रॅफिकचं नियोजन करण्यापर्यत सर्व कामाची जबाबदारी सत्संगीवरच असते.
 
नारायण साकार यांच्या सुरक्षेसाठी सत्संगीची मोठी तुकडी असते. ती त्यांच्या अवतीभोवती चालते. त्यामुळे नारायण साकार यांच्याजवळ जाणं अवघड होतं.
 
सत्संगाच्या वेळेस बाबांचे पाय आणि शरीर ज्या पाण्यानं (या पाण्याला चरणामृत म्हटलं जातं) धुण्यात येतं ते मिळवण्यासाठी सुद्धा भक्तांमध्ये चुरस असते.
 
बी एन शर्मा म्हणतात, "बाबांच्या पायाच्या धुळीला भक्त आशिर्वाद मानतात. त्यामुळेच बाबा जिथून पायी चालत जातात तिथली माती ते उचलून घेतात. मंगळवारी जेव्हा चेंगराचेंगरी झाली तेव्हा बऱ्याचशा महिला हीच माती उचलण्यासाठी खाली वाकलेल्या होत्या. याच कारणामुळे जेव्हा चेंगराचेंगरी सुरू झाली अनेकांना उभं राहण्याची आणि सावरण्याची संधीच मिळाली नाही."
 
Published By- Dhanashri Naik