शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 जुलै 2024 (00:42 IST)

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आता भारताचा संपूर्ण भाग व्यापला आहे. 2 जुलै रोजी वेळेआधीच मान्सून भारताच्या सर्व भागात पोहोचल्याचं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे.जून महिन्यात मान्सून दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रातही वेळेआधी दाखल झाला, पण सरासरीएवढा पाऊस झालेला नाही. आता जुलै महिन्यात पावसात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मान्सूनचा जोर कमी झाल्यानं जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती.
 
हवामान विभागाची जून महिन्याची आकडेवारी पाहता देशभरात सरासरीपेक्षा - 11 टक्के म्हणजे कमी पाऊस झाला आहे. भारतात जिल्हावार पावसाची आकडेवारी दर्शवणारा नकाशाच पाहा.
पूर्व आणि उत्तर भारतात तसंच महाराष्ट्रातही विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं इथे दिसून येतं. तर दक्षिण भारताच्या काही भागांत, ईशान्य भारतात आणि जम्मू काश्मिरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
 
आता जुलै महिन्यात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सरासरीएवढ्या ते सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं 1 जुलै रोजीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
पॅसिफिक महासागरात एल निनो मागे हटून सध्या न्यूट्रल स्थिती आहे आणि ऑगस्टमध्ये ला निना स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तिचा परिणामही मान्सूनच्या पावसावर होण्याची शक्यता आहे.
 
मान्सून हा शब्द कुठून आला?
काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.
 
दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

मान्सूनचे दोन प्रकार कोणते?
भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.
 
तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.
मान्सून कुठे तयार होतो?
मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.
 
पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.
जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
 
जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून ऊन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.
 
परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.
 
मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?
भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.
 
मान्सून ऑनसेट म्हणजे काय?
फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पावसाचं प्रमाण, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची स्थिती पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.
 
केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.साधारणपणे केरळमध्ये 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. तिथून 7 ते 10 जूनपर्यंत मुंबईत आणि 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतात पसरतो.
 
नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.
 
मान्सून का महत्त्वाचा
जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.
मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.
 
भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.
 
एल निनो, ला निना आणि मान्सून
एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
 
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.
 
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.त्याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होतो.
 
2024 मध्ये मान्सून कसा असेल?
तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं उच्चांक गाठले. पण एल निनो आता मागे हटत असल्याचं जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांनी जाहीर केलं आहे.
 
भारतीय हवामान विभागानंही त्याला दुजोरा दिला आहे. एल निनो सध्या मध्यम स्वरुपात असून, तो येत्या काळात कमकवूत होत जाईल आणि मान्सूनच्या मध्यावर ला निना चा प्रभाव जाणवू लागेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
 
तसंच सध्या IOD सम स्थितीत (न्यूट्रल) असून मान्सून सुरू झाल्यावर तो सकारात्मक होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
 
या दोन्ही गोष्टी मान्सूनसाठी पोषक असून यंदा एकूण पाऊस सरासरीपेक्षा जास्त ठरेल असंही हवामान विभागाचं भाकित आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 106 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या दरम्यानच्या नैऋत्य मान्सून काळातील पावसाचा हा अंदाज आहे.
 
हवामान खात्याच्या अंदाजाच्या अचूकतेबाबत बोलताना, वर्तवलेल्या अंदाजापेक्षा 5 टक्के कमी किंवा जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो, असंही ते म्हणाले. तसं असलं तरी सरासरीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्तच राहील.
 
जुलैत पाऊस कसा असेल?
रेमल चक्रीवादळामुळे यंदा बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा थोडी वेगानं वर सरकली. त्यानंतर 30 मे रोजीच मान्सून केरळ आणि ईशान्येकडील राज्यांत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं होतं.
 
केरळमध्ये एरवी साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो, यंदा तो दोन दिवस लवकर इथे दाखल झाला. मुंबईत वेळेआधी आलेल्या मान्सून 10 जून ते 24 जूनदरम्यान महाराष्ट्रातच बराच रेंगाळला.मग 2 जुलैला वेळेआधीच मान्सूननं सगळा देश व्यापला.
 
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारताचा अपवाद वगळता देशभरात सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
 
Published By- Priya Dixit