रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (16:12 IST)

पुण्यात झिका व्हायरसचे 6 रुग्ण आढळले, 2 गरोदर महिलांचा समावेश; काय काळजी घ्याल?

पुण्यामध्ये झिकाची लागण झालेले सहा रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. यातल्या दोन महिलांपैकी एक 24 आठवडे तर दुसऱ्या 16 आठवड्यांच्या गर्भवती आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे (वारजे कर्वेनगर) क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत चार, तर मुंढवा हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत दोन रुग्ण आढळले आहेत. या सहा रुग्णांपैकी चार स्त्रिया, तर दोन पुरुष आहेत.

या रुग्णांना ताप, लाल चट्टे, सांधेदुखी, डोकेदुखी अशी लक्षणे होती. त्यांची तपासणी करण्यात आल्यावर त्यांना झिकाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले.
झिकाचे रुग्ण आढळलेल्या क्षेत्रामध्ये महापालिकेने आतापर्यंत 4,646 घरांमधील 9,739 लोकांचे सर्वेक्षण केले आहे. यापैकी 161 घरांमध्ये अळी आढळल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
 
पुणे महापालिकेचे आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॅा. राजेश दिघे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "सहा रुग्ण आढळले तरी ही वाढ नसून तपासणीचा परिणाम आहे. पुण्यामध्ये आपल्याकडे स्क्रिंनिंग फॅसिलिटी चांगली असल्याने या रुग्णांची तपासणी होऊन निदान झाले आहे.

पावसाळ्यात अशा व्हेक्टरची वाढ होते. सापडलेल्या रुग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. या महिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झिकाची लागण झाल्याचे लक्षात घेऊन आम्ही त्यांना गर्भासाठीचे अॅनोमली स्कॅन करुन घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठीचे सर्व सहाय्य करत आहोत.”
एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. याच डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनियाही पसरतो. पण हा आजार जीवघेणा नाही.
 
झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची पाळी शक्यतो येत नाही. पण तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. या बाळांचं डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकतं.
 
झिका व्हायरस हा डासांमधून पसरणारा विषाणू आहे. या विषाणूमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसंच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.
 
प्रामुख्याने हा व्हायरस डासांमार्फत पसरतो, असं म्हटलं जात असलं तरी काही प्रमाणात त्याचा संसर्ग लैंगिक संबंधामार्फतही होत असल्याचं दिसून आलं आहे.
 
डास चावल्यानंतर काय होतं?
किमशिल्थ हॉस्पिटलमधील संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. मोहम्मद नियास सांगतात, "झिका व्हायरस केवळ डास चावल्यामुळे पसरत नाही. पण, ब्लड ट्रान्सफ्यूजनमधूनही हा पसरण्याची शक्यता असते. तसंच लैंगिक संबंधांमधून हा व्हायरस पसरू शकतो."
 
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसचे न्युरो-व्हायरलॉजीचे प्राध्यापक डॉ. व्ही. रवी सांगतात, "डास चावल्याच्या आठवडाभरानंतर लक्षणं दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर म्हणजेच मज्जासंस्थेशी निगडीत गुंतागुंत होऊ शकते. हा एक ऑटोइम्यून आजार आहे."
 
"म्हणजे शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळेच निर्माण होतो. याला गिलियन-बॅरे सिंड्रोम म्हणतात. यामध्ये शरीरातली प्रतिकारकशक्ती आपल्याच पेशींवर हल्ला करू लागते. यामुळे पक्षाघात होऊन शरीराचा खालचा भाग लुळा पडू शकतो."
 
डॉ. रवी सांगतात, "भारतात पहिल्यांदाच झिका व्हायरसचा क्लस्टर सापडला होता. जर एकाच ठिकाणी एखाद्या संसर्गाची पाचहून अधिक प्रकरणं आढळत असेल तर त्याला संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत क्लस्टर संबोधलं जातं."
झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत?
झिकाची लागण झाल्यास मृत्यूचं प्रमाण कमी असतं. दर पाच संसर्गजन्य लोकांमध्ये एका व्यक्तीत झिकाची लक्षणं आढळतात.
 
हलकासा ताप
डोळे लाल होणे आणि सुजणे
डोकेदुखी
पायांचे गुडघेदुखी
शरीरावर लाल चट्टे येणे
आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली आहे, ना कोणतं औषध उपलब्ध आहे. यामुळे रुग्णांना अधिकाधिक आराम आणि द्रवरुपी पदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो.
 
पण, या व्हायरसचा परिणाम गर्भात असलेल्या मुलावर होतो, ही सर्वाधिक चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीमध्ये मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळांचा जन्म होण्याची शक्यता असते. यास्थितीला मायक्रोसेफली असं म्हणतात.
 
झिका व्हायरस पहिल्यांदा कुठे आढळला?
झिका व्हायरस पहिल्यांदा युगांडाच्या झिका जंगलात आढळून आला होता. त्यावेळी हा व्हायरस माकडांमधून माणसात दाखल झाल्याचं सांगितलं जातं.
 
1952 साली पहिल्यांदाच झिका व्हायरसची नोंद घेतली गेली.
 
संशोधकांच्या मते भारतातील नागरिक मोठ्या संख्येने कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेले आहेत. 196 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 33 रुग्णांमध्ये झिका व्हायरसबाबत प्रतिकारशक्ती तयार झाल्याचं सांगितलं जातं.
 
1953 रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालात भारतात झिका व्हायरसची नागरिकांना लागण होत असते, हे निदर्शनास आलं होतं.
 
2016 आणि 2017 मध्ये अहमदाबाद शहरात झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली होती.

Published By- Priya Dixit