मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (20:29 IST)

‘वाघाने गाय मारल्याचा संशय’ त्याने असा घेतला वाघांचा बदला

tiger
तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील अवलांची गावात एका शेतकऱ्याने मृत गायीच्या शरीरावर विष टाकून दोन वाघांना मारल्याची घटना घडली आहे.
 
या 2 वाघांव्यतिरिक्त निलगिरीमध्ये अवघ्या एका महिन्यात सहा वाघांचा मृत्यू झाल्याने पर्यावरणतज्ज्ञही हैराण झालेत.
 
निलगिरी जिल्ह्यातील मुदुमलाई व्याघ्र प्रकल्प हा पश्चिम घाटातील प्रमुख जैवविविधतेचं ठिकाण आहे. तामिळनाडूच्या इतर भागांपेक्षा एकट्या निलगिरीमध्ये वाघांची संख्या सर्वाधिक असल्याची नोंद वनविभागाने केली आहे.
 
अशा परिस्थितीत, निलगिरी जिल्ह्यातील अवलांची धरणाजवळ शनिवारी, 9 सप्टेंबर रोजी 3 आणि 8 वर्षं वयाचे दोन नर वाघ गूढरित्या मृतावस्थेत आढळून आले होते.
 
विषाबाधेमुळे हे वाघ मृत्युमुखी पडले का, याचा तपास वनविभागाने सुरू केला.
 
विषबाधेमुळे वाघांचा मृत्यू
या संदर्भात निलगिरी वनविभागाने एक प्राथमिक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यानुसार, 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी एमराल्ड पीट परिसराजवळ दोन वाघ मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाली.
 
घटनास्थळाची पाहणी केली असता, धरणाचे अतिरिक्त पाणी वाहत असलेल्या ओढ्याच्या काठावर 8 वर्षांचा वाघ आणि 3 वर्षांचा वाघ नाल्यात मृतावस्थेत आढळून आले.
 
निवेदनात पुढे म्हटलं होतं की, "दोन वाघांच्या शरीराचे अवयव शाबूत आहेत. आम्ही 20 लोकांची टीम तयार केली असून यात स्निफर कुत्र्यांची मदत घेऊन वाघांना विष देऊन मारलं का याचा तपास करत आहोत."
सोबतच दोन्ही वाघांचे शवविच्छेदन करून अवयवांचे नमुने गोळा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. ज्या ठिकाणी वाघांचा मृत्यू झाला त्या ठिकाणाजवळ वनविभागाला एका प्राण्याचा मृतदेह सापडला.
 
या प्राण्याच्या मृतदेहावर विष टाकून वाघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधत त्यांनी त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला.
याप्रकरणी एका शेतकऱ्याने आपल्या गायीला वाघाने मारल्याचा बदला घेण्यासाठी मृत गायीच्या शवामध्ये विष टाकून दोन वाघांना ठार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली.
 
त्यानंतर वनविभागाने सोमवारी 11 सप्टेंबरच्या रात्री या शेतकऱ्याला अटक केली.
 
वाघांना का मारलं?
गुन्हेगाराच्या अटकेबाबत बीबीसी तमिळशी बोलताना मुदुमलाईचे फील्ड डायरेक्टर व्यंकटेशन म्हणाले, "वाघांचा मृत्यू झाला त्या भागापासून अवघ्या 30 मीटर अंतरावर आम्हाला मृत गायीचं शव आढळून आलं."
 
गाईमध्ये असलेल्या विषामुळे या वाघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. म्हणून आम्ही वाघ आणि गायींच्या शवांची नेक्रोप्सी केली. त्यांच्या शरीराचे काही नमुने आणि शव सलीम अली पक्षीविज्ञान प्रयोगशाळा आणि कोईम्बतूर येथील प्रयोगशाळेत पाठवले.
सोबतच जवळपासच्या गावात एखादी गाय बेपत्ता झाली आहे का, याची चौकशी करण्यात आली. यामध्ये एमराल्ड भागातील शेतकरी शेखर यांची गाय 10 दिवसांपूर्वी बेपत्ता असल्याचे आढळून आलं.
 
फील्ड डायरेक्टर व्यंकटेशन यांनी सांगितलं की, "शेखरची चौकशी केली असता त्याने वाघांना विष देऊन मारल्याची कबुली दिली आहे. एक गूढ प्राणी चावल्यामुळे शेखरच्या गायीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात गायीच्या शवामध्ये पिकांसाठी वापरण्यात येणारं कीटकनाश मिसळलं."
 
व्यंकटेशन यांनी सांगितल्याप्रमाणे, शेखरने दिलेल्या विषामुळे दोन्ही वाघांचा मृत्यू झाला.
 
या मृत्युमुखी पडलेल्या दोन वाघांशिवाय निलगिरीत एकाच महिन्यात 6 वाघांचा मृत्यू झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
निलगिरी येथील मधुवट्टम वनचारगम मुतीमांडू परिसरात 17 ऑगस्ट रोजी एका खाजगी परिसरात 7 वर्षांच्या वाघाचा गूढ मृत्यू झाला.
 
त्यानंतर एका वाघिणीच्या मृत्यूनंतर दोन आठवड्यांची दोन पिल्लं मरण पावली. विषबाधेमुळे दोन वाघांसह सध्या एकूण सहा वाघांचा मृत्यू झाला आहे.
 
या सर्व घटनांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात निलगिरीत वाघाची शिकार करून त्याचे अवयव परदेशात विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांच्या टोळीला वनविभागाने अटक केली होती.
 
निलगिरीमध्ये वाघांची संख्या किती आहे?
या वर्षी मार्चमध्ये राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाने भारतातील वाघांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
यामध्ये 2006 मध्ये भारतातील वाघांची एकूण संख्या 1,411 इतकी होती. वन क्षेत्रातील उपक्रमांमुळे वाघांची संख्या वाढली असून 2022 मध्ये देशातील वाघांची संख्या 3,682 इतकी झाली आहे.
 
या अहवालानुसार, 2006 मध्ये तामिळनाडूतील वाघांची संख्या 76 होती, 2022 मध्ये ती 306 पर्यंत वाढली आहे. एकट्या निलगिरीमध्ये 114 वाघ आहेत.
एकीकडे वाघांची संख्या वाढत असल्याचा दावा सरकार करत असले तरी दुसरीकडे मात्र वाघांचा सातत्याने मृत्यू होत असल्याने पर्यावरणतज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
बेजबाबदार यंत्रणा
वाघांच्या मृत्यूबाबत बीबीसी तमिळशी बोलताना व्याघ्र अभ्यासक डॉ. कुमारगुरु म्हणाले, "तमिळनाडूमध्ये एका टोळीने घुसखोरी केल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. पण तरीही या टोळीने वाघाची शिकार केली. हा यंत्रणेचा बेजबाबदारपणा आहे."
 
ही टोळी निलगिरीत येऊन वाघाची शिकार करते, जंगलातून पळूनही जाते. यावरून वनविभाग किती ढिसाळ आहे याची कल्पना येते.
 
पाळत नसल्यामुळेच ते सहजपणे शिकार करतात असा आरोप कुमारगुरु यांनी केला आहे.
 
तसेच वनविभाग शेतकऱ्यांना जंगलात गायी चरण्यास परवानगी देतो. शेतकरी देखील घनदाट जंगलात जाऊन गायी चरवत असल्याने अशा घटना घडतात. गाई पाळणाऱ्यांवर निर्बंध आणि देखरेख ठेवली पाहिजे असंही ते म्हणाले.
 
निसर्गाचा समतोल ढासळतो
वाघांच्या शिकारीच्या आरोपावर फील्ड डायरेक्टर व्यंकटेशन म्हणाले, मुथुमलाईमध्ये शिकार रोखण्यासाठी कडक पाळत ठेवली जात आहे.
 
ते म्हणाले, "मागे झालेल्या शिकारीनंतर आम्ही शिकार विरोधी रक्षकांची संख्या वाढवली आहे आणि पहाराही कडक केला आहे. त्यामुळेच यावेळी आम्ही वाघांच्या मृत्यूचा शोध लावू शकलो."
 
यावर व्याघ्र अभ्यासक कुमारगुरु म्हणतात की, व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने तातडीने कारवाई केली नाही तर नैसर्गिक समतोल ढासळेल.
 
"वाघांशिवाय जंगलात इतर सस्तन प्राण्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होऊन नैसर्गिक समतोल बिघडण्याचा धोका असतो."
 
जर इतर सस्तन प्राणी वाढले तर जंगलातील गवत आणि वनस्पती संपुष्टात येतील. गवतामुळे जमिनीत पाण्याचा निचरा होतो, आणि पाणी हे जीवनासाठी आवश्यक आहे.
 
तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढल्यामुळे ते शहराच्या दिशेने देखील येतात. ही लोकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते.
 
व्याघ्र अभ्यासक कुमारगुरु पुढे म्हणतात की, "वाघ अन्नसाखळीत मोठी भूमिका बजावतात. आणि यासाठी आपण कित्येक कोटी रुपये खर्च केले तरी ते काम करू शकत नाही."
 


















Published By- Priya Dixit