उद्योगपती गौतम अदानी यांना हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.आज (बुधवारी) सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तीन न्यायाधीशांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे.
लाईव्ह लॉच्या माहितीनुसार भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार मर्यादित आहेत असं सांगितलं. सेबीने 24 पैकी 22 प्रकरणांचा तपास केला आहे. आम्ही उरलेल्या दोन प्रकरणांतील तपास पुढील तीन महिन्यांत करण्यास सांगितले आहे असं ते म्हणाले.
हा तपास सेबीकडून काढून घेऊन एसआयटी किंवा दुसऱ्या तपाससंस्थेला देण्यासाठी कोणताही आधार नाही असंही कोर्टानं सांगितलं.
जानेवारी 2023मध्ये हिंडनबर्गने अदानी समुहासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. अदानी समुहाने हा अहवाल नाकारला होता. मात्र त्यानंतर अदानी समुहाचे समभाग कोसळले होते.
अदानी प्रकरण : आतापर्यंत काय घडलं?
24 जानेवारी 2023 - हिंडनबर्गने अदानी यांच्यावरील संशोधनावर आधारित 'अदानी ग्रुप : हाऊ द वर्ल्ड्स थर्ड रिचेस्ट मॅन इज पुलिंग द लार्जेस्ट कॉन इन कॉर्पोरेट हिस्टरी' हा अहवाल प्रसिद्ध झाला.
26 जानेवारी 2023 - अदानी ग्रुपने हिंडनबर्गचा अहवाल फेटाळून लावला. यासंदर्भात कायदेशीर कारवाई करण्याचा आपण विचार करत असल्याचंही अदानी ग्रुपने म्हटलं.
26 फेब्रुवारी 2023 - हिंडनबर्गने म्हटलं की आम्ही आमच्या अहवालावर ठाम आहोत. तसंच कायदेशीर कारवाईचं स्वागत आहे, असंही त्यांनी म्हटलं.
27 जानेवारी 2023 - अदानींनी 2.5 अब्ज डॉलरचा एफपीओ बाजारात आणला.
30 जानेवारी 2023 - या दिवसापर्यंत एफपीओला केवळ 3 टक्के सबस्क्रिप्शन मिळालं. याच दिवशी अबू धाबीतील इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने म्हटलं की आपल्या सबसायडिअरी ग्रीन ट्रान्समिशन होल्डिंग आरएससी लिमिटेडच्या माध्यमातून अदानींच्या एफपीओमध्ये 40 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
31 जानेवारी 2023 - इजराएलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांना भेटण्यासाठी गौतम अदानी हायफा बंदरावर दाखल झाले होते. हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर पहिल्यांदाच अदानी सार्वजनिक ठिकाणी दिसले.
1 फेब्रुवारी 2023 - अदानी कंपनीने आपला एफपीओ रद्द केला.
2 फेब्रुवारी 2023 - कंपनीचे मालक गौतम अदानी यांनी 4 मिनिट 5 सेकंदांचा व्हीडिओ प्रसिद्ध करून एफपीओ मागे घेण्याचं कारण स्पष्ट केलं.
2 फेब्रुवारी 2023 - गुंतवणूकदारांमधील चिंतेचं वातावरण पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कंपनीला कर्ज देणाऱ्या कंपन्यांना त्यासंदर्भातील माहिती मागितली.
3 फेब्रुवारी 2023 - एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की बँकिंग सेक्टर चांगल्या स्थितीत आहे. आर्थिक बाजारपेठा नियमांनुसारच काम करत असल्याचं सीतारामन यावेळी म्हणाल्या.
Published By- Priya Dixit