मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (09:29 IST)

शाहीन चक्रीवादळ : अरबी समुद्रात नवं वादळ तयार होण्याची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'गुलाब' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस पडतोय. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता आणखी एका संभाव्य वादळाचं संकट घोघावत आहे.
 
गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय. त्याचमुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडतोय.
 
'गुलाब'चा परिणाम अजूनही ओसरला नसताना, आता दुसऱ्या एका वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
 
हे वादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव 'शाहीन' असेल. हे नाव कतारनं दिलं आहे.
 
'गुलाब' चक्रीवादळ रविवारी ( आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं. सोमवारी (27 सप्टेंबर) या वादळाचं रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झालं. सध्या हे क्षेत्र छत्तीसगढ आणि ओडिशाच्या दक्षिणेला आहे. गुरुवारी (30 सप्टेंबर) हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात प्रवेश करून नवीन चक्रीवादळ तयार होऊ शकतं, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
 
या वादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टी भागाबरोबरच गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ या प्रांतांमध्ये काही दिवस मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जातोय.
 
राज्यात 'गुलाब'च्या प्रभावामुळे पाऊस सुरूच
पालघर जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू असून ठीकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मस्तानाका परिसरात शिमला हॉटेल जवळ तसंच महामार्गावरील चिल्लर फाटा माउंटेन हॉटेल जवळही पुराचं पाणी आल्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
 
मुंबईतही जोरदार पाऊस सुरू आहे.
 
नाशिकमध्ये सलग 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकमधली धरणं भरली आहेत. गंगापूर धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे. आज (29 सप्टेंबर) दुपारी 15 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होईल.