बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 फेब्रुवारी 2020 (17:28 IST)

लग्नात डान्स करणे नवरदेवाच्या जीवावर बेतले; हृदयविकाराचा झटका येऊन काही वेळातच मृत्यू

लग्नाच्या वरातीत नाचण्याचा मोह हा कुणाला आवरत नाही. त्यात वधू-वराला नाचविण्याचा प्रकार देखील सर्रासपणे पाहायला मिळतो. यात कधी कधी वधू-वर आनंदाच्या भरात बेभानहून नाचताना दिसतात. मात्र हेच नाचणे एका नवरदेवाच्या जीवावर बेतले आहे. ऐकून धक्का बसला ना! ही घटना घडलीय हैदराबाद येथे. लग्नात नवरदेवाने बराच नाच केल्याने त्याला हृद्यविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना तेलंगणामधील निजामाबाद येथे घडली. गणेश असं 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे नवरदेवाच्या घरात दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
गणेशचे 15 फेब्रुवारीला बोधन शहरात विवाहसोहळा संपन्न झाला. यानंतर लग्नाच्या वरातीत लोकांच्या आग्रहास्तव गणेश आणि त्याच्या पत्नीने वरातीत जोरदार डान्स केला. त्यानंतर आनंदाच्या भरात गणेश खूप वेळ आपल्या मित्रांसोबत डान्स करत होता. काही वेळानंतर अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी कुटूंबियांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच गणेशचा मृत्यू झाला. हृदय विकाराच्या झटक्याने गणेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
अनपेक्षित ही घटना घडल्याने तेथील सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर डीजेच्या जोरदार आवाजामुळे गणेशला त्रास होत होता असं त्याच्या कुटूंबियांनी सांगितले. गणेशच्या मृत्यूने बोधन शहरात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.