1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (19:05 IST)

नातेवाईक नाही तर हा आयएएस अधिकारी नवीन पटनाईकांचा राजकीय वारसदार होणार?

मुरलीधर काशीविश्वनाथन
ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी व्ही. कार्तिकेयन पांडियन यांनी नोकरीचा राजीनामा देऊन कॅबिनेटमंत्री दर्जाचं पद स्वीकारलं आहे.
 
तमिळनाडूच्या पांडियन यांच्यावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना एवढा विश्वास का आहे आणि त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे? हे जाणून घेऊयात.
 
2000 बॅचचे ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी व्ही. कार्तिकेयन पांडियन यांनी गेल्या सोमवारी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली.
 
त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी त्यांना ‘मॉडर्न ओडिशा अँड ट्रान्सफॉर्मेशनल इनिशिएटिव्ह'चं प्रमुख बनवण्यात आलं. कॅबिनेट मंत्र्यांच्या दर्जाचं हे पद आहे.
 
मॉडर्न ओडिशा अँड ट्रान्सफॉर्मेशनल इनिशिएटिव्हला 5T नावानंही ओळखलं जातं. त्यात टीम वर्क, टेक्नॉलॉजी, ट्रान्सपरन्सी, ट्रान्सफॉर्मेशन आणि टाइम असे 5T आहेत. ओडिशा सरकार राज्यात सरकारी योजनाचं मुल्यांकन याच आधारे करत आहे.
 
महत्वाकांक्षी योजनांची जबाबदारी
'अमा ओडिशा, नवीन ओडिशा' नावाच्या योजनेचा उद्देश पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि विकासाची गती वाढवून ग्रामीण भागात बदल घडवून आणणं हा आहे.
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 'अमा गोवान, अमा विकास' नावाची योजना सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 50 लाख रुपये खर्च केले जातील.
 
व्ही. कार्तिकेयन पांडियन यांना या दोन्ही योजनांचे अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.
 
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे स्वीय सचिव व्ही. कार्तिकेयन पांडियन यांना राज्य सरकारमधील सर्वात शक्तीशाली व्यक्ती समजलं जातं होतं.
 
कोण आहेत व्ही कार्तिकेयन पांडियन
ओडिशा सरकारचा कोणताही महत्त्वाचा निर्णय त्यांच्या सहमतीशिवाय घेतला जात नव्हता. एवढे शक्तीशाली व्यक्ती असलेल्या पांडियन यांनी पार्श्वभूमी जाणून घेऊयात.
 
व्ही. कार्तिकेयन पांडियन यांचा जन्म 1974 मध्ये मदुरै जिल्ह्याच्या मेलूरजवळ कूथप्पनपट्टीमध्ये झाला होता. त्यांनी प्राथमिक शिक्षण अलगर मंदिराजवळ असलेल्या वेल्लापट्टी सरकारी शाळेत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी नेवेलीमधील एका स्पोर्ट्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यादरम्यान त्यांनी अॅथलेटिक्समध्येही उत्साहानं सहभाग घेतला.
 
त्यांनी मदुरै कृषी महाविद्यालयमध्ये कृषी विज्ञान विषयात पदवी आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
 
2000 मध्ये त्यांची निवड भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) मध्ये झालं. त्यांना ओडिशा केडर मिळाले. त्यांनी आयएएस अधिकारी सुजाता राऊत यांच्याशी विवाह केला.
 
त्यांची पहिली नियुक्ती ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्याच्या धरमगडमध्ये उपायुक्त पदावर झाली. याठिकाणी काम करताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी किमान हमीभाव (एमएसपी) निश्चित करत धान खरेदी नियमित केली. त्यांच्या या कामाने सरकारचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं.
 
व्ही. कार्तिकेयन पांडियन 2005 ते 2007 पर्यंत मयूरभंज आणि 2007 ते 2011 पर्यंत गंजाम जिल्ह्यात कर्तव्यावर होते.
 
मयूरभंज ओडिशाचा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याठिकाणी असताना विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील अगदी दुर्गम भागातील गावांचाही दौरा केला. त्यांनी विकास योजनांच्या अंमलबजावणीत मोठं योगदान दिलं.
 
दिव्यांगांसाठी केलेलं त्यांचं काम पाहता त्यांना 'हेलेन केलर' पुरस्कारही मिळाला.
 
त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांमुळं जिल्ह्यात नक्षलवादाची समस्याही कमी होऊ लागली होती.
 
गंजाममध्ये केली मनरेगाची सुरुवात
ओडिशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गंजामचे जिल्हाधिकारी बनल्यानंतर त्यांनी महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी अॅक्ट (मनरेगा) लागू केले.
 
त्यांनी मजुरांची मजुरी थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठवण्याची यंत्रणा सुरू केली.
 
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा विधानसभा मतदारसंघ हिंचिली याच जिल्ह्यात आहे.
 
नवीन पटनायक यांनी याठिकाणी त्यांचं काम पाहिलं आणि 2011 मध्ये त्यांना त्यांच्या कार्यालयात सहभागी करून घेतलं.
 
त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक सचिवाची जबाबदारी देण्यात आली. कार्तिकेयन पांडियन यांनी लवकरच नवीन पटनायक यांचा विश्वास संपादन केला.
 
त्यांच्याच देखरेखीखाली ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्त्वं असलेल्या ठिकाणांचं रुप पालटण्याची 'मो सरकार' योजना, पुरीमध्ये विरासत परिसर योजना, हायस्कूलचे रूप बदलण्यासाठीची योजना आणि ओडिशाला भारताचे क्रीडा केंद्र बनवण्याची योजना अशा सर्व योजना यशस्वी झाल्या.
 
संपूर्ण व्यवस्थापनामध्ये बदल करण्यासाठी 2018 मध्ये 5टी कार्यक्रम सुरू करण्यात आला.
 
व्ही. कार्तिकेयन पांडियन यांची प्रगती
ओडिशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यात 70 लाख लोकांना आरोग्य विमा प्रदान करण्यासाठीची बिजुस्वतिया कल्याण योजना, ओडिशामध्ये दोन हॉकी विश्वचषकांचे आयोजन आणि ओडिशामध्ये सर्वात मोठे हॉकी स्टेडियम तयार करण्यामागे व्ही. कार्तिकेयन पांडियन यांचीच कल्पना होती.
 
पण कौतुकाबरोबरच त्यांच्यावर टीकाही झालेली आहे.
 
मुख्यमंत्री सचिवालयात प्रवेश केल्यानंतर काही वर्षांतच व्ही. कार्तिकेयन पांडियन यांचा सरकारमध्ये प्रभाव वेगानं वाढू लागला. ते कायम मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याबरोबर राहू लागले.
 
कार्तिकेयन पांडियन शर्ट, टाइट पँट आणि सँडल अशा पोशाखात फिरतात. विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणांच्या दौऱ्याची सुरुवात केली.
 
त्यांनी दौरा केला त्यावेळी त्यांना एखाद्या मंत्र्यासारखी सन्मान मिळाला. अनेकदा तर त्यांनी त्यापेक्षाही अधिक महत्त्व मिळाल्याचं दिसून आलं.
 
गेल्या जून महिन्यात पांडियन यांनी विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा दौरा केला.
 
राजकीय नियुक्त्यांमधील भूमिका
याच दरम्यान ओडिशा आणि राष्ट्रीय माध्यमांमध्ये कार्तिकेयन पांडियन यांच्याबद्दलचे लेख यायला सुरुवात झाली होती. लोकांचं लक्ष त्यामुळं त्यांच्याकडं वेधलं गेलं.
 
या दौऱ्यात लोक त्यांच्या पाया पडत असल्याच्या किंवा महिला त्यांना फुलांचे हार घालत असल्याच्या बातम्या आल्या.
 
कर्तव्य बजावत असलेल्या एखाद्या अधिकाऱ्यांचं अशाप्रकारे स्वागत होणं हे काही प्रमाणात आश्चर्यकारक होतं.
 
असंही म्हटलं जातं की, बिजू जनता दलामध्ये महत्त्वाच्या पदांवर ज्या नियुक्ती केल्या जातात त्यातही व्ही. कार्तिकेयन पांडियन यांची भूमिका असते.
 
बिजू जनता दलाच्या आधिकृरिक ट्विटर हैंडलवरून मात्र कार्तिकेयन यांच्याबाबत काहीही पोस्ट केलं जात नाही. पण पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख स्वयं प्रकाश नियमितपणे कार्तिकेयन पांडियन यांच्याबाबत पोस्ट करतात.
 
कार्तिकेयन पांडियन यांचे अनेक फॅन पेजही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्या पेजवर त्यांच्याशी संबंधित बातम्या आणि व्हिडिओ नियमितपणे येत असतात.
 
नवीन पटनायक यांचा उत्तराधिकारी कोण?
नवीन पटनायक 2000 पासून सलग ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. ते अविवाहित आहे. त्यांच्यानंतर पक्षातील दुसरा कोणताही नेता एवढा शक्तीशाली नाही.
 
त्यामुळं कार्तिकेयन पांडियन यांना नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी म्हणून तयार केले जात आहे का? असा प्रश्नदेखिल उपस्थित होतो.
 
मूळचे तमिळनाडूचे असलेले कार्तिकेयन पांडियन बिजू जनता दलाचे नेते बनण्याची किंवा राज्याचे मुख्यमंत्री बनण्याची किती क्षमता आहे, हे लगेच सांगणं कठीण आहे.
 
आगामी विधानसभा निवडणुकीत ते निवडणूक लढवून सरकारमध्ये मंत्री बनतील असंही म्हटलं जात आहे. मात्र सध्या तरी या सर्व केवळ चर्चा आहेत.
 
बिजू जनता दल 2024 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं सरकारच्या आगामी कार्यकाळातही कार्तिकेयन पांडियन यांना प्रभाव कायम असेल, हे मात्र नक्की.