1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (22:24 IST)

आयआयटी मुंबई देशात अव्वल स्थान कायम

जगातील विद्यापीठ आणि संस्थांची गुणवत्ता आणि त्यांच्या दर्जाबाबत दरवर्षी ब्रिटीश कंपनी क्यूएस रँकिंगकडून क्रमवारी जाहीर केली जाते. या क्रमवारीमध्ये देशातील महत्त्वाची संस्था असलेल्या आयआयटी मुंबईने देशातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तर आशियातील विद्यापीठांच्या क्रमावारीमध्ये ४२ वे स्थान पटकावले आहे. क्यूएस रँकिंगने मंगळवारी २०२२ या वर्षातील विद्यापीठ व संस्थांच्या क्रमवारी जाहीर केली.
 
क्यूएस रँकिंगने गतवर्षी जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबईने देशात अव्वल स्थान मिळवले होते. हे स्थान यावर्षी ही कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. आयआयटी मुंबईने यंदा १०० पैकी ७१ गुण मिळवत आपले हे स्थान कायम ठेवले आहे. आयआयटी मुंबईला शैक्षणिक प्रतिष्ठेसाठीचे ८१.४ गुण मिळाले. तर कर्मचारी सुविधेसाठी ९६, प्राध्यापकांच्या कार्यक्षमतेसाठी २३ गुण, विद्यार्थ्यांचे प्रमाण ४४.७ गुण, पीएचडी केलेल्या स्टाफची संख्येसाठी १०० गुण, प्राध्यापकांकडून सादर केलेले संशोधन पेपरसाठी ८४.२ गुण, आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी ७८.५ गुण, आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांची संख्या ११ गुण, संस्थेत शिकत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी ४.४ गुण, अंतर्गत देवाणघेवाण १४.५ गुण, बाह्य देवाणघेवाणीसाठी ८.३ गुण मिळाले आहेत. या ११ मुद्द्यांना देण्यात आलेले गुण हे १०० पैकी आहेत. ११ मुद्द्यांपैकी पीएचडी करणार्‍या कर्मचार्‍यांचा मुद्दा क्रमवारीमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी ठरला आहे. त्याचप्रमाणे २०२२ मध्ये आशियातील विभागीय क्रमवारीमध्ये आयआयटी मुंबईच्या गुणांमध्ये सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. विभागीय कम्रवारीमध्ये गतवर्षी आयआयटी मुंबई आशियातील संस्थांच्या क्रमवारीत ३७ व्या स्थानावर होती.