गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (16:38 IST)

मलिकांनी केलेल्या आरोपांवर स्वत: समीर वानखेडे यांनी दिले प्रत्युत्तर

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या महागड्या वस्तूंबाबत अनेक खुलासे केले. समीर वानखेडे लाखो रुपयांच्या महागड्या वस्तू वापरतात. यासाठी त्यांच्याकडे इतका पैसा येतो कुठून असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केला होता. मात्र मलिकांनी केलेल्या या आरोपांवर स्वत: समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे. मलिकांकडे याबाबत फार कमी माहिती आहे. मलिकांनी खरी माहिती शोधून काढावी’, असे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. नवाब मलिकांनी समीर यांच्यावर केलेल्या आरोपांवर समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे यांनी देखील रोखठोक उत्तर दिले होते. यावेळी ‘समीरच्या हातात असलेले महागडे घड्याळ हे १७ वर्षांपूर्वी आईने गिफ्ट केले’, असल्याचा खुलासा यास्मिन यांनी केला.
 
नवाब मलिक समीर वानखेडेंच्या विरोधात दररोज नवीन आरोप आणि खुलासे करत आहेत. मंगळवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत समीर वानखेडे यांच्या इमानदारीवर प्रश्न उपस्थित केला होता. ‘समीर वानखेडे ७० हजारांचे शर्ट, अडीच लाखांची पँट आणि २०-२५ लाखांची महागडी घड्याळे घालतात. इतक्या महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे इतके पैसे कुठून येतात याची चौकशी व्हायला हवी’, अशी मागणी देखील नवाब मलिकांनी यावेळी केली. समीर वानखेडेंनी प्रायव्हेट आर्मी तयार करुन लाखोंची वसुली केली असल्याचा आरोप देखील करण्यात आला.
 
समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या महागड्या वस्तूंच्या आरोपांवर त्यांची बहीणेने खुलासा केला. ‘समीर केवळ वर्षातून १-२ वेळा शॉपिंग करतात. नवाब मलिक यांच्याइतका पैसा आमच्याकडे असता आम्ही मर्सिडीज सारख्या गाड्यांमधून फिरलो असतो. लंडन दुबईला गेला असतो. नवाब मलिकांनी व बेताल आणि खोटी वक्तव्य करणे थांबवावे’, असे प्रत्युत्तर यास्मिन वानखेडे यांनी दिले.