समीर वानखेडे : 'आम्हांला रोज बेइज्जत केले जात आहे'
आमच्या कुटुंबाची जाहीरपणे बेइज्जती केली जात असून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच माझ्यावर दबाव आणला जात आहे, अशी तक्रार एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांच्याकडे केली आहे.
अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी समीर वानखेडे यांनी हलदर यांच्याकडे आपलं म्हणणं मांडत तक्रार केली.
ते म्हणाले, "आमचं संपूर्ण वानखेडे खानदान बोगस आहे, असं थेट प्रसारमाध्यमांसमोर बोललं जात आहे. अशी भाषा प्रसारमाध्यमांसमोर करणं योग्य नाही. मी दलित समाजाचा आहे. हे लोक माझी बेइज्जती करण्याचं काम करत आहेत.
"माझा युनिफॉर्म काढून घेतला जाणार, माझी नोकरी हिरावून घेतली जाणार असं बोलून मला धमकावलं जात आहे. मला राष्ट्रपती नियुक्त करतात. जर मी काही चुकीचे काम केलं असेल, तर राष्ट्रपती आणि आपण त्यावर न्याय कराल."