गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (08:30 IST)

आगामी निवडणुकीत वंचित- MIM आघाडी होणार? असदुद्दीन ओवेसींनी दिले संकेत

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनीअरींगचा वापर करत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (MIM) पक्षासोबत तसेच इतर छोट्या संघटनांसमवेत संधान साधत राज्यातील भाजप, सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांना विविध ठिकाणी तुल्यबळ लढत दिली होती. हाच पॅटर्न आता पुन्हा दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. MIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी तसे संकेत दिले आहेत. आंबेडकर-ओवेसी फॉर्म्युल्याचा सर्वात जास्त फटका राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच बसल्याचे पाहायला मिळाले. जवळपास ४० लाखाच्या वर मते मिळवत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम ने मोठी राजकीय ताकद दाखवून दिली होती. मात्र अंतर्गत कलहामुळे ही युती २०१९ च्या विधानसभेला कायम राहिली नाही. विधानसभेला वंचित आणि एमआयएम वेगळे लढले.
 
मात्र, आता पुन्हा याच पॅटर्नची शक्यता निर्माण झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून ओवेसी यांनी वंचित-एमआयएम आघाडीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आंबेडकर आणि ओवेसी एकत्रितपणे लढू शकतील असा अंदाज ओवेसी यांच्या संकेतांवरून बांधला जाऊ शकतो. मात्र, राजकारणात काहीही अशक्य नसतं; कधीही काही होऊ शकतं या सूत्रानुसार जर वंचितची तयारी असेल तर आम्ही जरूर आघाडी करू असेही ओवेसी म्हणाले. मराठा आणि ओबीसी आरक्षणाची लढाई राज्यात सुरु असतानाच आता मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएम मैदानात उतरली असून मुस्लिम आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईपर्यंत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी तिरंगा हातात घेऊन एमआयएम वाहनांची रॅली काढणार आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली आहे.