शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:10 IST)

केंद्रीय नेत्यांकडून राज्यातील भाजप नेत्यांना महत्वाचे आदेश

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. रोज पत्रकार परिषद घेत मलिकांनी वानखेडेंवर आरोपांची मालिकाच सुरु ठेवलीय. महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांकडूनही मलिकांच्या आरोपांना दुजोरा दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी समीर वानखेडे आणि त्यांचं कुटुंब एकाकी पडल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून राज्यातील भाजप नेत्यांना महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. 
 
महाविकास आघाडी सरकार असलेल्या राज्यात समीर वानखेडे यांना एकाकी पडू देऊ नका, असा आदेशच दिल्लीतील भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना दिल्याचं कळतंय. त्याबाबत व्यूहरचना तयार करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या घरी बैठका सुरु असल्याची माहिती मिळतेय. तसंच भाजपचे अनेक नेते सध्या वरळीत एक ठिकाणी असल्याचं कळतंय. पडद्यामागे राहून वानखेडेंना हवी ती मदत करा, सहकार्य देण्याची भूमिका घ्या, असा आदेश दिल्लीतील भाजप नेत्यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुंबईत दाखल झाल्याचंही समजतं. त्याचबरोबर वानखेडेंना मदत करताना मविआतील नेत्यांवरील घोटाळ्यांच्या आरोपातून लोकांचं लक्ष विचलित होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्लीतून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.