शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (20:27 IST)

भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढ इतरांपेक्षा अधिक

देशात कोरोना विषाणूचं संसर्ग झालेल्या  रुग्णांची संख्या ३० लाखापर्यंत पोहोचली आहे. ही संख्या पार करणारा भारत अमेरिका आणि ब्राझील पाठोपाठ तिसरा देश ठरणार आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत तिन्ही देशांमधील रुग्णसंख्येच्या वाढीची तुलना केली, तर अमेरिका व ब्राझीलपेक्षा भारतात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. चिंताजनक बाब म्हणजे भारतात मागील १६ दिवसांतच १० लाख रुग्ण आढळून आले आहेत.
 
ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांहून ३० लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी २३ दिवसांचा कालावधी लागला होता. तर दुसरीकडे अमेरिकेतही रुग्णसंख्या २० लाखांहून ३० लाख होण्यासाठी २८ दिवस लागले होते. हे दोन्ही देश जगात सर्वोधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशाच्या यादीत सर्वात वर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे.
 
१० लाख रुग्णसंख्येनंतर भारतातील रुग्णसंख्येचा वेग वाढला. २१ दिवसात रुग्णसंख्या १० लाखांवरून २० लाखांवर पोहोचली. दुसरीकडे अमेरिकेत ४३ दिवस, तर ब्राझीलमध्ये २७ दिवसांच्या कालावधीनंतर इतके रुग्ण आढळून आले होते. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची तुलना केल्यास भारतात दोन्ही देशांपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. ३० लाख रुग्णसंख्या असताना अमेरिकेत दीड लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तर ब्राझीलमध्येही १ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला होता.