बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (17:09 IST)

कोरोना व्हायरसः भारतासाठी पुढचा काळ अडचणींचा का आहे?

-सौतिक बिस्वास
वरवर पाहता भारतातली परिस्थिती फारशी वाईट दिसत नाही. पण जानेवारीच्या अखेरीस भारतामध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर आतापर्यंत भारतात 1.5 लाखांपेक्षा जास्त कोव्हिड -19 रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झालाय.
 
22 मे पर्यंत भारतामध्ये करण्यात आलेल्या एकूण चाचण्यांपैकी 4% जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर संसर्ग झालेल्यांपैकी 3% जणांचा मृत्यू झालाय. कोरोना व्हायरसचा 'डबलिंग रेट' म्हणजेच रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर आहे 13 दिवस. तर रुग्णांचा रिकव्हरी रेट आहे सुमारे 40%.
 
कोरोना व्हायरसच्या साथीचा भयंकर विळखा पडलेल्या इतर देशांच्या तुलनेत ही आकडेवारी बऱ्यापैकी कमी आहे. पण जगाप्रमाणेच भारतात अनेक हॉटस्पॉट्स आणि संसर्गाची केंद्रं आहेत.
 
भारतातल्या एकूण अॅक्टिव्ह केसेसपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्ण या पाच राज्यांत आहेत - महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि मध्य प्रदेश. आणि त्यातही 60% पेक्षा जास्त रुग्ण हे पाच शहरांमध्ये आहेत. यामध्ये मुंबई, दिल्ली आणि अहमदाबादचा समावेश असल्याचं अधिकृत आकडेवारी सांगते.
 
ज्यांचा या कोव्हिड -19 मुळे मृत्यू झाला त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि यातल्या अनेकांना इतर विकार होते. वयाने ज्येष्ठ व्यक्तींना या आजाराचा जास्त धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय आकडेवारीतूनही आढळलं आहे.
 
भारतातल्या लॉकडाऊनला आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय. अधिकृत आकडेवारीनुसार या लॉकडाऊनमुळे साधारण 37,000 ते 78,000 लोकांचा जीव वाचवण्यात आला. हार्वर्ड डेटा सायन्स रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार आठ आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे साधारण 20 लाख केसेस रोखता आल्या, मृत्यूदर 3% वर रोखता आल्याने 60,000 मृत्यू टाळता आले.
 
"संसर्ग काही भागांपुरता मर्यादित राहिलाय. यामुळे देखील इतर भागांतले व्यवहार खुले करण्याचा विश्वास मिळालेला आहे. सध्यातरी ही साथ शहरांपुरती मर्यादित आहे," कोव्हिड -19 साठीच्या मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेंटचे प्रमुख व्ही. के. पॉल सांगतात. पण या दाव्यांबद्दल पुरेशी स्पष्टता नाही.
 
संसर्गाच्या बाबतीत आता भारत जगभरातल्या सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या पहिल्या 10 देशांच्या यादीत आहे. तर नवीन रुग्णांच्या संख्येच्याबाबत भारत पहिल्या 5 देशांमध्ये आहे.
 
25 मार्चला पहिला कठोर लॉकडाऊन लावण्यात आला तेव्हा देशात कोरोना व्हायरसचे 536 रुग्ण होते. पण आता संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. संसर्गाचा वाढीचा दर हा चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. एप्रिलपासून चाचणी करण्याचं - टेस्टिंगचं प्रमाण दुपटीने वाढलं असलं तरी त्यासोबतच रुग्णसंख्याही अनेकपटींनी वाढलेली आहे.
 
चाचण्यांची संख्या वाढल्याने नोंदणी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता असल्याचं साथीच्या रोगांच्या तज्ज्ञांचं (एपिडेमिलॉजिस्ट - Epidemiologist) म्हणणं आहे. भारतामध्ये गेल्या आठवड्यात एका दिवशी 1,00, 000 नमुने तपासण्यात आले. या चाचण्या करताना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या पण कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या लोकांचाही समावेश केला जातोय.
 
असं असूनही लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात कमी चाचण्या करणाऱ्या देशांत भारताची गणना होते. भारतामध्ये दर 10 लाख लोकांमागे 2,198 चाचण्या केल्या जात आहेत.
 
मार्च महिन्याच्या अखेरीस घाई घाईने लॉकडाऊन लावण्यात आल्याने असंघटित क्षेत्रातल्या लाखोंचा शहरांतला रोजगार गेला आणि जथ्थेच्या जथ्थे गावाच्या दिशेने निघाले. सुरुवातीला पायी आणि मग नंतर ट्रेनने. गेल्या तीन आठवड्यांत 6 पेक्षा जास्त राज्यांतल्या सुमारे 40 लाख मजुरांनी आतापर्यंत रेल्वेने प्रवास करत गाव गाठलंय.
 
यामुळे शहरांमधून गावांमध्ये संसर्ग पोहोचल्याचं सांगणारे अनेक पुरावे आढळले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला लॉकडाऊन गोंधळातच काहीसा शिथील करण्यात आला. यामुळे शहरांमध्ये संसर्ग आणखीन वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
 
तरूण लोकसंख्येला होणारं संसर्गाचं सौम्य स्वरुप आणि मोठ्या प्रमाणातल्या बाधितांना कोणतीही लक्षणं आढळणं ही वाढणारा संसर्ग आणि सध्यातरी कमी असणारा मृत्यूदर यामागची कारणं आहेत. भारत सरकारच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत सांगतात, " मृत्यूचा दर कमी करणं आणि बरं होण्याचा दर वाढवणं, यावर लक्ष केंद्रीत करायला हवं."
 
पण संसर्गाचं प्रमाण वाढतंच चाललंय. "येत्या काही आठवड्यांच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होईल," एका आघाडीच्या व्हायरॉलॉजिस्टनी (Virologist - साथरोगतज्ज्ञ) मला सांगितलं.
 
कोव्हिड-19 चे रुग्ण येण्याचं प्रमाण सतत वाढत असल्याचं दिल्ली आणि मुंबईतल्या डॉक्टर्सनी मला सांगितलं. हॉस्पिटलमधल्या बेड्सचा तुटवडा, क्रिटिकल केअरसाठीच्या मर्यादित सुविधा या सगळ्याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.
 
जुलैमध्ये हा संसर्ग टोक (Peak) गाठण्याचा अंदाज आहे. या काळात संसर्ग वाढल्याने रुग्णसंख्या वाढेल आणि हॉस्पिटल्समध्ये जागा नसल्याने वा उपचार उशीरा मिळाल्याने, वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने वा बरं होण्यासाठी वैद्यकीय मदत न मिळाल्याने जीव वाचवण्याजोग्या अनेकांचा मृत्यू होण्याची भीती आहे.
 
"याचीच खरी काळजी आहे. क्रिटिकल केअरमधल्या बेडला ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, डॉक्टर्स आणि नर्सेसची गरज असते. या सगळ्यावरच ताण येणार आहे," इंदौरमधल्या हॉस्पिटलमधल्या कोव्हिड - १९ वॉर्डचे प्रमुख असणाऱ्या डॉ. रवी दोशी यांनी सांगितलं. त्यांच्या हॉस्पिटलमधला 50 बेड्सचा ICU या विषाणूशी लढणाऱ्या रुग्णांनी भरलेला आहे.
 
लॉकडाऊन शिथील करण्याबद्दल डॉक्टर्सना खात्री नाही. "हे धोक्याचं ठरू शकतं. काही लोकांनी काम करायला सुरुवात केलेली आहे पण सगळ्यांमध्येच खूप भीती आहे," डॉ. दोशी सांगतात.
 
"एकजण ऑफिसमध्ये शिंकला तर त्याचे 10-15 सहकारी घाबरुन हॉस्पिटलमध्ये आले. चाचणी करून घेण्याची मागणी करू लागले. अशा प्रकारचे तणाव वाढायला लागले आहेत."
 
या साथीला तोंड देण्यासाठीची धोरणं आखण्यासाठी पुरेशी खात्रीशीर माहिती उपलब्ध नसल्यानेदेखील हा गोंधळ होतोय.
 
ही साथ आटोक्यात आणण्यासाठी सरसकट एकच उपाययजोना लागू करता येणार नाही, किंवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये संसर्ग वेगवेगळ्या वेळी कळस गाठणार असल्याने एकाचवेळ लॉकडाऊन उठवता येणार नसल्याचं बहुतेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला संसर्गाचा दर म्हणजे दर 100 चाचण्यांमागे रुग्ण आढळण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे.
 
"ही साथ सगळीकडे समान पसरत नाहीये. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या वेळी संसर्गाचा लाटा येतील," नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका साथीच्या आजारांच्या तज्ज्ञाने मला सांगितलं.
 
पुरेशी आकडेवारी नसल्यानेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
 
साधारण 3000 केसेस अशा आहेत ज्या कोणत्याही राज्याच्या नावावर दाखवता येऊ शकत नाहीत. कारण हे लोक अशा ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, जिथे ते मुळात राहात नाहीत. यापैकी किती जण बरे झाले आणि किती जणांचा मृत्यू झाला? या आकड्याची तुलना करायची झाली, तर भारतातल्या 9 राज्यांमध्ये 3000 पेक्षा जास्त रुग्ण आहेत.
 
शिवाय सध्याच्या आकडेवारीवरून या रोगाच्या भविष्यातल्या आलेखाचा अंदाज बांधणं शक्य आहे का, हे देखील अजून स्पष्ट नाही.
 
म्हणजे उदाहरणार्थ - भारतामध्ये संसर्गाची लक्षणं न दिसणारे असे किती प्रसारक - Carriers आहेत याचा अंदाज उपलब्ध नाही. एक ज्येष्ठ सरकारी संशोधक गेल्या महिन्यात म्हणाले होते, की "कोव्हिड -19च्या दर 100 रुग्णांपैकी 80 जणांमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणं आढळतात."
 
असं असेल तर भारताचा मृत्यूदर कमी राहील. लक्षणं न आढळणाऱ्या केसेसचा समावेश केला तर मग या रोगाचा भविष्यातला आलेख वेगळा असेल असं संख्याशास्त्राचे प्राध्यापक अतनू बिस्वास सांगतात. पण भारतामध्ये ही आकडेवारी उपलब्ध नसल्याने पुढचा अंदाज बांधता येणार नाही.
 
शिवाय रुग्णांच्या दुप्पटीचा दर (Doubling Rate) आणि पुनरुत्पादनाचा दर (R0) याच्याही काही मर्यादा असल्याचं साथीच्या आजारांचे अभ्यासक सांगतात. एखादा साथीचा आजार किती पसरू शकतो हे त्याच्या पुनरुत्पादनाच्या आकड्यावरून - R0 वरून समजतं. नवीन कोरोना व्हायरस - Sars CoV -2 चा पुनरुत्पादन दर 3 च्या आसपास आहे. पण याविषयीचे अंदाज वेगवेगळे आहेत.
 
"जेव्हा एखाद्या साथीदरम्यान रुग्णांची संख्या कमी असते, तेव्हा या गोष्टी फायद्याच्या ठरतात. पण आरोग्यक्षेत्राच्या पुढच्या गरजा जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे किमान पुढच्या महिन्याभराचा अंदाज असायला हवा. आपण मापनाच्या एका पद्धतीचा आधार घेण्याऐवजी, विविध उपाययोजनांविषयीच्या पुरव्यांच्या सरासरीच्या आधारे मूल्यांकन करणं योग्य राहील." युनिव्हर्सिटी ऑफ मिशीगनमध्ये बायो-स्टॅटिस्टिक्सचे प्राध्यापक असणाऱ्या भ्रमर मुखर्जींनी मला सांगितलं.
 
तर दररोज नवीन रुग्णांच्या संख्येची नोंद करणं आणि यावरून संसर्ग कसा पसरतोय हे ठरवणंही नेहमीच फायदेशीर ठरत नसल्याचं इतरांचं म्हणणं आहे.
 
नवीन चाचण्यांची संख्या आणि नवीन केसेस अशा दोन्हीकडे पाहिल्यास आपल्याला एक प्रमाण निष्कर्ष मिळू शकतो, असं पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी सांगतात.
 
यासोबतच देशाच्या एकूण लोकसंख्येच्या आकड्याशी कोव्हिड 19 च्या मृत्यूंची तुलना करण्यापेक्षा दर 10 लाखांमागे किती मृत्यू झाले, हे ताडून पाहणं मृत्यूदर ठरवण्याचा अधिक चांगला पर्याय असल्याचंही त्यांना वाटतं.
 
पण भारताकडे अशी तपशीलवार आणि सखोल आकडेवारी उपलब्ध नसल्याने संसर्गाच्या संक्रमणाचा पुढचा अंदाज बांधणं भारताला कठीण जातंय.
 
अजून किती मृत्यूंची मोजदाद करण्यात आलेली नाही, हे उघडकीला आलेलं नाही. पण अद्याप अशाप्रकारे कोणतेही गुप्त मृत्यू झाल्याचा पुरावदेखील समोर आलेला नाही.
 
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी, या काळात किती मृत्यू हे न्युमोनिया आणि इन्फ्लुएन्झासारख्या रोगाने झाले हे तपासून पाहत त्यावरून नेहमीपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत का हे पहावं लागणार असल्याचं साथीच्या आजारांचे तज्ज्ञ सांगतात.
 
याशिवाय या संसर्ग आणि मृत्यूंमध्ये काही विशिष्ट वांशिक भेद आहेत का, हे देखील तपासल्यास ठराविक समाजाच्या वस्त्यांवर लक्ष केंद्रित करता येईल. (उदा. अमेरिकेच्या लुईझियाना राज्यात कोव्हिडमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 70% आफ्रिकन - अमेरिकन होते. एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचं प्रमाण 33% आहे.)
 
पण भारतामध्ये अजूनही मर्यादित प्रमाणात चाचण्या होत असल्याने आपल्याला या रोगाच्या प्रसाराबद्दल पूर्ण माहिती समजली नसल्याचं साथीच्या आजारांचे तज्ज्ञ म्हणतात.
 
"आम्हाला अशा खात्रीशीर 'फोरकास्टिंग मॉडेल्स' म्हणजेच भविष्याचा अंदाज बांधणाऱ्या आलेखांची गरज आहे ज्याच्या मदतीने देशातल्या आणि राज्यातल्या पुढच्या काही आठवड्यांच्या परिस्थितीचा अंदाज बांधता येईल," डॉ. मुखर्जी सांगतात.
 
लक्षण दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा दोन्ही रुग्णांबाबत जास्तीत जास्त टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची गरज असून यानंतर अलगीकरण वा विलगीकरण करणं गरजेचं असल्याचं साथीच्या रोगांचे तज्ज्ञ सांगतात.
 
शिवाय 'कॉन्टॅक्ट नेटवर्क' म्हणजेच कोणाच्या संपर्कात किती जास्त लोक येतात, हे तपासून त्यांची चाचणी केल्यास 'सुपर स्प्रेडर' म्हणजे एका व्यक्तीद्वारे अनेकांना संसर्ग होण्याच्या घटना होणार नाहीत. कोव्हिडशी लढणारे फ्रंटलाईन वर्कस, डिलीव्हरी घेऊन जाणारे, अत्यावश्यक सेवांमधील लोक अशा मोठ्या गटाशी संबंध येणाऱ्या व्यक्तींच्या चाचण्या करता येऊ शकतात.
 
डॉक्टर मुखर्जी सांगतात, "हा व्हायरस आता आपल्यासोबतच असणार आहे. म्हणूनच आपल्याला असणारा धोका कमी करून आपलं रोजचं आयुष्य सुरू कसं ठेवायचं, हे शिकायला हवं."
 
पण भारतातल्या एकूण बाधितांचा खरा आकडा अजून माहित नसल्याने सगळेच अंधारात चाचपडत असल्याचं साथीच्या रोगांचे तज्ज्ञ म्हणताहेत. कोरोना विरुद्धच्या भारताच्या लढ्यातला हा सर्वात मोठा अडथळा असेल, आणि याचा परिणाम अर्थव्यवस्था पुन्हा उभारण्यावरही होईल.