सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (08:28 IST)

कोरोनाबाबतचा असा नकोसा विक्रम झाला भारताच्या नावावर

देशातील कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६० हजारांच्या पुढे गेल्यामुळे भारताच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदला गेला आहे. आशियातील देशांचा विचार केल्यास कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. सध्या जगातील केवळ आठच देशांमधील कोरोना रुग्णांचा आकडा भारतापेक्षा जास्त आहे.
 
worldometers.info हे संकेतस्थळ जगभरातल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी देतं. भारतात सध्याच्या घडीला कोरोनाचे १ लाख ६० हजार ३१० रुग्ण आहेत. आशिया खंडात इतकी रुग्णसंख्या कोणत्याही देशात नाही. देशात सध्या ८६ हजार ११० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे ५६ हजार ९५८ रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ तमिळनाडू (१८ हजार ५४५), दिल्ली (१५ हजार ५२७), गुजरात (१५ हजार १९५) या राज्यांचा क्रमांक लागतो. 
 
आशियाई देशांचा विचार केल्यास भारत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर तुर्कस्तान (१ लाख ५९ हजार ७९७), इराण (१ लाख ४३ हजार ८४९), चीन (८२ हजार ९९५), सौदी अरब (८० हजार १८५), पाकिस्तान (६१ हजार २२७), कतार (५० हजार ९१४), बांगलादेश (४० हजार ३२१), सिंगापूर (३३ हजार २४९), संयुक्त अरब अमिरात (३२ हजार ५३२) यांचा क्रमांक लागतो.