इराणचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर
इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी हे आजपासून तीन दिवसीय भारत दौऱ्यावर येत आहे. भारत आणि इराण यांच्यातील मैत्रीसंबंध अधिक दृढ करणे तसेच येथील संस्कृती स्थळांना भेट देणे हा रुहानी यांच्या या भेटीमागील मुख्य उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे रुहानी हे हैदराबाद येथील मक्का मशिदीमध्ये जाऊन उद्या नमाज पठण करणार आहेत. आपल्या तीन दिवसीय दौऱ्यामधील पहिले दोन दिवस हे त्यांच्या वयक्तिक कामांसाठी म्हणून ते घालवणार असून हैदरबाद येथे काही अधिकारी आणि नागरिकांची ते भेट घेणार आहेत. यानंतर हैदराबादमधीलच जामा मशिदीमध्ये जाऊन ते नमाज पढणार असून जवळपास १० हजार नागरिकांसमोर ते खुताबा म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये भाषण करणार आहेत. त्यामुळे भारतात येऊन नमाज पढणारे ते पहिलीचे परदेशी राष्ट्रपती ठरणार आहेत.
यानंतर शनिवारी ते भारतीय राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. शनिवारीच रुहानी यांचे राष्ट्रपती भवनात देखील स्वागत करण्यात येणार असून या भेटी दरम्यान भारत आणि इराण यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर या भेटीमध्ये भाष्य करण्यात येणार आहे. त्यामुळे रुहानी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. इराणच्या राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारल्यापासून रुहानी यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.