केंद्र सरकारकडून सर्व गरजूंना मोफत रक्त देण्याचे आदेश
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सर्व गरजूंना मोफत रक्त देण्याचे आदेश जारी केले आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, रुग्णाचे नातेवाईक रक्त घेण्यासाठी पैसे देतात. यामुळे त्यांच्या मनात गैरसमज होतो की, मोफत मिळालेल्या रक्ताचे ब्लडबँकेकडून पैसे आकारले जातात. यामुळे रक्तदान करण्यासाठी दाते पुढे येत नाहीत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अतिरिक्त सचिव मनोज झालानी यांनी यासंदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.
या पत्रात असे म्हटले आहे की, लोकांवरचा आर्थिक भार कमी करणे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचं उद्दिष्ट आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी रुग्णांना रक्त मोफत द्यावे. यामुळे रुग्ण आणि नातेवाइकांवरील आर्थिक बोजा कमी होईल. रक्तदान करण्याबाबत लोकांचा उत्साह वाढेल. सर्व राज्यांनी याची अंमलबजावणी करावी. लोकांमध्ये मोफत रक्तासाठी पैसे आकारले जातात असा गैरसमज आहे.