गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (15:02 IST)

कमलनाथ : महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशातही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर?

Kamal Nath
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना प्रसारमाध्यमांमध्ये उधाण आलंय.
 
आपला मुलगा आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ याच्यासह कमलनाथ शनिवारी (17 फेब्रुवारी) दिल्लीत आलेले. दिल्लीत सध्या भाजप कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे.
 
दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. मात्र, त्यांनी वृत्त फेटाळलेही नाहीय.
 
भाजप प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर कमलनाथ म्हणाले की, “असं काही असेल तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेन.”
दुसरीकडे, काँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी कमलनाथ यांच्याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांचं खंडन केलं असून, कमलनाथ यांच्याविषयीच्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलंय.
 
कमलनाथ हे काँग्रेसचे दिग्गज नेते असून त्यांनी छिंदवाडामधून नऊ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.
 
मात्र, गेल्या दोन निवडणुकांपासून ते तिथले आमदार आहेत आणि त्यांचा मुलगा नकुलनाथ छिंदवाडाचे खासदार आहेत.
 
काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.
 
याआधीही ज्योतिरादित्य सिंधिया, आरपीएन सिंह, हार्दिक पटेल यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
 
अटीतटीच्या लढाईनंतर कमलनाथ मुख्यमंत्री झालेले...
2018 च्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विजय मिळवला आणि सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज सिंह चौहान यांचं सरकार पाडलं.
 
2018 च्या त्या निवडणुकीत विधानसभेच्या एकूण 230 जागांपैकी काँग्रेसला 114 आणि सत्ताधारी भाजपला 109 जागा मिळाल्या होत्या. दोन्ही पक्ष बहुमताच्या जादुई आकड्यापासून दूर असले तरी 'कमलनाथ यांच्या चपळाई'मुळे राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन होईल, असं मानलं जात होतं.
 
सरकार कोण बनवणार या अनिश्चिततेत कमलनाथ यांनी मास्टरस्ट्रोक मारला. त्यांनी रात्री उशिरा राज्यपालांना ई-मेल केला आणि प्रत्यक्ष भेटून सरकार स्थापनेचा दावा करणारं पत्र दिलं. तसंच सकाळी 121 आमदारांचं समर्थन राज्यपालांना सादर करून अखेर सरकार स्थापन करण्यात आलं.
 
या सर्व गोष्टींमुळे राजकीय विश्लेषक कमलनाथ यांना 'राजकारणातील धुरंधर' म्हणू लागले.
 
तथापि, कमलनाथ यांना 2020 मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि काँग्रेसचं सरकार कोसळलं.
सर्व अडचणींना तोंड देत मध्य प्रदेशात सरकार स्थापन केल्यामुळे राजकारणातील त्यांच्या चतुराईची चर्चा होऊ लागली.
 
मात्र, कमलनाथ यांच्या कर्तृत्वावर आणि कौशल्यावर विरोधकांना अजिबात शंका नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे कमलनाथ स्वत:ला लो-प्रोफाइल ठेवणं पसंत करतात.
 
महत्त्वाचं म्हणजे, कमलनाथ हे संजय गांधी यांचे शालेय मित्र होते. त्यांची मैत्री शाळेपासून सुरू झाली आणि मारुती कार बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून या दोन्ही तरुणांनी काँग्रेसच्या राजकारणात प्रवेश केला.
 
पत्रकार विनोद मेहता यांनी त्यांच्या 'संजय गांधी- अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात लिहिलंय की, संजय गांधींनी युवक काँग्रेसच्या काळात पश्चिम बंगालमध्ये सिद्धार्थ शंकर रे आणि प्रियरंजन दासमुंशी यांच्या विरोधात कमलनाथ यांना उमेदवारी दिली होती.
 
इतकंच नाही तर आणीबाणीनंतर संजय गांधींना अटक झाली तेव्हा त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून न्यायाधीशांसोबत गैरवर्तन करण्यापर्यंत त्यांची मजल गेलेली.
 
या प्रकरणात कमलनाथ यांना तिहार तुरुंगात पाठवण्यात आलं आणि त्यांनी इंदिरा गांधींच्या 'गुड बुक'मध्ये प्रवेश केला.
1980 मध्ये काँग्रेसने त्यांना पहिल्यांदा छिंदवाडा येथून तिकीट दिलं.
 
तेव्हा त्यांच्या निवडणूक प्रचारात इंदिरा गांधी म्हणाल्या, "तुम्ही काँग्रेस नेते कमलनाथ यांना मत द्यावं, अशी माझी इच्छा नाही. तुम्ही माझा तिसरा मुलगा कमलनाथ यांना मत द्यावं, अशी माझी इच्छा आहे."
 
"'इंदिरा के दो हाथ- संजय गांधी और कमलनाथ' अशा घोषणा लोकांनी द्यायला सुरूवात केली," असं दिर्घकाळ काँग्रेस पक्षाबाबत वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार मनोरंजन भारती म्हणतात.
 
कमलनाथ पहिल्यांदा कुठे जिंकले?
1980 मध्ये आदिवासी भागातून पहिल्यांदाच विजयी झालेल्या कमलनाथ यांनी छिंदवाड्याचं संपूर्ण चित्रच पालटून टाकलं.
 
या भागातून नऊ वेळा खासदार झालेल्या कमलनाथ यांनी तिथे शाळा-महाविद्यालयं आणि आयटी पार्कची उभारणी केली आहे.
 
इतकंच नव्हे तर स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफिल्ड आणि हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या कंपन्या सुरू केल्या.
 
तसेच त्यांच्या मतदारसंघात कापड निर्मिती प्रशिक्षण संस्था, चालक प्रशिक्षण संस्था देखील सुरू करण्यात आल्या.
 
मात्र, संजय गांधींचा मृत्यू आणि इंदिरा गांधींच्या हत्येचा कमलनाथ यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला.
 
परंतु ते काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले.
1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिख विरोधी दंगलीतही त्यांचं नाव पुढे आलेलं.
 
मात्र, त्यात त्यांची भूमिका सज्जन कुमार किंवा जगदीश टायटलर यांच्यासारख्या नेत्यांसारखी स्पष्ट नव्हती.
 
1984 च्या शीख विरोधी दंगली आणि 1996 च्या हवाला घोटाळ्याचा अपवाद वगळता, अनेक वर्षे महत्त्वाची मंत्रिपदे भूषवूनही कमलनाथ यांची राजकीय कारकीर्द निष्कलंक राहिली आहे.
 
तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कोणतेही गंभीर आरोप ठेवण्यात आलेले नाहीत.
 
त्यांनी पर्यावरण, शहर विकास, वाणिज्य आणि उद्योग यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली आहेत.
हवाला घोटाळ्याचे आरोप
कमलनाथ यांच्यावर 1996 मध्ये जेव्हा हवाला घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा पक्षाने त्यांच्या पत्नी अलकानाथ यांना छिंदवाडामधून उमेदवारी दिली.
 
त्यांच्या पत्नीचा विजय झाला, पण पुढच्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत कमलनाथ यांना पराभवाचा सामना करावा लागला. छिंदवाड्यातून ते फक्त एकदाच हरले.
 
इंदिरा गांधींच्या निधनानंतर कमलनाथ यांना राजीव गांधींचे विश्वासू सहकारी मानलं जाई आणि आजपर्यंत राहुल गांधींचाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.
 
खरं पाहता, कानपूरमध्ये जन्मलेले आणि पश्चिम बंगालमधील व्यापारी कुटुंबाशी सबंधित असलेले कमलनाथ हे एक 'बिझनेस टायकून' आहेत.
 
रिअल इस्टेट, एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे.
 
कमलनाथ आयएमटी गाझियाबादच्या संचालकांसह सुमारे 23 कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत.
 
हा व्यवसायाची धुरा त्यांची दोन मुलं नकुलनाथ आणि बकुलनाथ सांभाळतात.
 
Published By- Priya Dixit