इस्रोच्या ईओएस-03 उपग्रहाचं प्रक्षेपण अयशस्वी, इंजिनात आला बिघाड
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या ईओएस-03 उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी ठरलं आहे. इंजिनात बिघाड झाल्यानं हे मिशन पूर्ण होऊ शकलं नाही.
इस्रोनं श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून गुरुवारी सकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी जीएसएलव्ही-एफ 10 द्वारे पृथ्वीवर निगराणी ठेवणाऱ्या ईओएस-03 उपग्रहाचं प्रक्षेपण सुरू केलं होतं.
पहिल्या दोन टप्प्यात सर्व काही सुरळीत झालं होतं. पण तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजीनमध्ये बिघाड झाला, असं मिशन कंट्रोल सेंटरच्या वेज्ञानिकांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
''क्रायोजेनिक पातळीवर बिघाड झाल्यानं मिशन पूर्ण होऊ शकलं नाही,'' असं इस्रोचे प्रमुख सिवन म्हणाले.
नैसर्गिक संकटं, एखादी घटना यावर त्वरित निगराणी ठेवता यावी यासाठी ठरावीक काळानंतर मोठ्या भागांच्या वास्तविक वेळेचा अंदाज प्रदान करणं हा या मिशनचा उद्देश होता.