सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2025 (18:46 IST)

लोक नमाज अदा करत असताना अचानक बिबट्या मशिदीत शिरला,हल्ल्यात चार जखमी

leopard
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याची दहशत नागरिकांसाठी त्रासदायक ठरली आहे. आतापर्यंत लोक एकटेच घराबाहेर पडणे टाळत होते, मात्र बिबट्या रहिवासी भागात मुक्तपणे फिरताना दिसत होता. शनिवारी सकाळी लक्ष्मीपूर परिसरातील ग्रामपंचायत माळौली येथील मशिदीत बिबट्या घुसला, त्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याने तेथे उपस्थित लोकांवर हल्ला केला.

यामध्ये चार जण जखमी झाले. स्थानिक लोकांनी बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचून तासाभराच्या अथक परिश्रमानंतर बिबट्यावर नियंत्रण मिळवले. मात्र, जेरबंद झाल्यानंतर बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाने वनविभागाला दिली आहे.
 
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना सीएचसी लक्ष्मीपूर येथे दाखल करण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी सांगितले की, मशिदीत उपस्थित लोकांनी बिबट्याला पकडण्यासाठी मासेमारीचे जाळे लावले होते. त्यात बिबट्या अडकला.
 
बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे खरे कारण समजेल. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन वनविभागाने स्थानिक रहिवाशांना दिले आहे.
 
Edited By - Priya Dixit