गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (15:33 IST)

महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात लोकसभेची कारवाई

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारण्याचे आरोप होते.या आरोपांबाबत संसदेच्या समितीने महुआ मोईत्रा यांची चौकशी केली होती. त्या समितीचा अहवाल आज (8 डिसेंबर) लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर लोकसभा सभागृहात अहवालावर चर्चा झाली. अखेरीस मतदान झालं आणि महुआ मोईत्रा यांचं सदस्यत्व बहुमतानं रद्द करण्यात आलं.
महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरी आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांच्यावर आरोप करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे आणि या आरोपांना प्रसारित करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर त्यांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.
 
बीबीसीशी बोलताना महुआ मोईत्रा यांनी आरोप लावला आहे की भारतातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या गौतम अदानी यांच्या विरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळे त्यांना शांत बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
त्यांनी प्रसारमाध्यमांवर माहिती लीक केल्याचा आरोप केला. त्या म्हणतात, “माझी मीडिया ट्रायल सुरू आहे. आचार समितीला जे शपथपत्र दिलं होतं ते लीक केलं जात आहे. मी शांत बसणार नाही.”
 
गेल्या रविवारी 15 ऑक्टोबरला भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या आरोपानंतर हा वाद सुरू झाला होता. तेव्हा फार कमी लोकांना अंदाज होता की हे प्रकरण इतकं वाढेल.
 
महुआ मोईत्रा, निशिकांत दुबे यांच्याबरोबर महुआ यांचा एकेकाळचा प्रियकर जय अनंत देहाद्राई, हेन्री नावाचा कुत्रा आणि अब्जाधीश दर्शन हिरानंदानीसुद्धा या वादात सामील झाले आहेत.
 
आरोपांचं सत्र
सोशल मीडियावर महुआ मोईत्रा उजव्या विचारांच्या आणि भाजपाने पाठिंबा दिलेल्या लोकांच्या निशाण्यावर असतात.
 
त्या सिगार ओढताना किंवा शँपेन पितानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यांच्याकडे असलेले महागडे कपडे आणि बॅगा यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
मात्र महुआ मोईत्रा स्वत: या आरोपांना उत्तर देत आहेत. अशाच एक ट्विटला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “बंगाली बायका त्यांचं आयुष्य जगतात. कोणाच्या उपकाराखाली राहत नाहीत.”
 
त्या म्हणतात, “माझ्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडने काही खासगी छायाचित्रं क्रॉप करून शेअर केले. त्याचा आधार घेत भाजप मला एक चारित्र्यहीन स्त्री सिद्ध करू इच्छितो. पश्चिम बंगालमध्ये या सर्व गोष्टींनी काही फरक पडत नाही. मात्र ते माझं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना असं वाटतंय की असं केल्याने मी शांत बसेन आणि अदानीचा मुद्दा उपस्थित करणं बंद करेन. मात्र असं होणार नाही, मी बोलत राहीन.”
 
तृणमूलचे नेते काय म्हणत आहेत?
महुआ मोईत्रा यांच्या वादावर तृणमूल सध्या तरी अंतर ठेवून आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतंही सार्वजनिक वक्तव्य केलेलं नाही.
 
पक्षाचे प्रादेशिक सरचिटणीस कुणाल घोष यांना प्रश्न विचारले तेव्हा ते वारंवार म्हणाले, “या विषयावर तृणमूल काँग्रेस काहीही बोलणार नाही.
 
जेव्हा याविषयी त्यांना पुन्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले, “आम्ही या विषयावर लक्ष ठेवून आहोत. माहिती घेत आहोत. मात्र सध्या आम्ही कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही. संबंधित व्यक्ती या प्रकरणावर प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात किंवा स्पष्टीकरण देऊ शकतात. या विषयावर आम्ही कोणतीही टिप्पणी करू शकणार नाही. याबद्दल मला काहीही म्हणायचं नाही.”
 
यावरून तृणमूल काँग्रेसने या वादापासून स्वत:ला दूर ठेवलंय हे स्पष्ट आहे. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी रविवारी म्हटलं, की महुआ मोईत्रा यांच्या प्रकरणात योग्य चौकशीनंतर पक्ष उचित निर्णय घेईल.
 
भाजपने उपस्थित केले प्रश्न
डेरेक ओब्रायन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी चर्चा करताना म्हणाले, “आम्ही प्रसारमाध्यमातील बातम्या पाहिल्या. पक्ष नेतृत्वाने संबंधित सदस्यांना त्यांच्यावर लावलेल्या आरोपासंदर्भात सगळी परिस्थिती स्पष्ट करण्याचा सल्ला दिला आहे.
 
त्यांनी आपली भूमिका मांडली आहेच तरीही हे प्रकरण खासदार, त्यांचे अधिकार आणि विशेषाधिकारांशी निगडीत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी संसदेच्या योग्य त्या समितीने करावी त्यानंतरच पक्ष याबाबतीत निर्णय घेईल.”
 
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही तृणमूल काँग्रेसने महुआ मोईत्रा यांच्यापासून अंतर ठेवण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
ते म्हणाले, “ममता बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रा यांना एकटं सोडणं ही काही आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट नाही. त्या अभिषेक बॅनर्जी सोडून कुणाचाही बचाव करणार नाही. अनेक गुन्ह्यांमध्ये आणि भ्रष्टाचारांच्या आरोपात टीएमसीचे अनेक नेते तुरुंगात आहेत. त्यांच्याविषयी ममता बॅनर्जी काहीच बोलत नाहीत.”
 
मोईत्रा म्हणतात, “टीएमसी माझ्याबरोबर आहे. जेव्हा आरोपांमध्ये काही अर्थ नाही तर कोण काय बोलणार? आचार समितीचा अहवाल येऊ द्या, खरी परिस्थिती समोर येईलच.”
 
तृणमूल समोर का येत नाहीये?
अंतर्गत राजकारण आणि अदानी समुहाची पश्चिम बंगालमधील गुंतवणूक ही यामागची कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुभाशीष मोईत्रा सांगतात, “महुआ मोईत्रा तृणमूलपासून अंतर ठेवण्याची दोन कारणं आहेत. पहिलं हे की महुआ मोईत्रा नादिया जिल्ह्याची खासदार आहे. इतकंच काय तर स्थानिक युनिट त्यांच्या विरोधात आहे. पक्षाचे अनेक लोक त्यांना इथे विरोध करतात. अनेक नेत्यांशी त्यांचं पटत नाही मात्र हे बऱ्याच काळापासून सुरू आहे.”
 
ते सांगतात, “दुसरं कारण आहे की अदानी समूह पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करत आहे. अशावेळी महुआ मोईत्रा सतत अदानींच्या विरोधात बोलत असल्याने पक्षात अस्वस्थता पसरली आहे. तृणमूल काँग्रेसला हवंय की अदानी यांनी राज्यात गुंतवणूक करावी. मात्र हा एक अंदाजच आहे.”
 
मोईत्रा पुढे म्हणतात, “ तृणमूल काँग्रेसमध्ये जो अंतर्गत संघर्ष आहे ते काही लपलेलं नाही. अदानींमुळे पक्षाने त्यांच्यापासून अंतर ठेवून आहे. हा अंदाजच आहे.”
अदानी समुहाने सांगितलं की, ते पश्चिम बंगालात तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.
 
सप्टेंबर 2022 मध्ये अदानी समुहाला ताजपूर डीप सी पोर्ट विकसित करण्याचा कंत्राट मिळाल्याची बातम्या समोर आल्या होता. या योजनेत 3.1 अब्ज डॉलप गुंतवणूक होणं अपेक्षित आहे त्यात 15 हजार कोटी बंदराच्या विकासावर आणि इतर पैसा संबंधित पायाभूत सुविधाच्या विकासावर खर्च होणं अपेक्षित आहे.
 
मात्र महुआ मोईत्रा दावा करतात की अदानी समुहाने आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.
 
आरोप करणारे नेते निशाण्यावर?
मोईत्रा यांच्या आरोपावर आचार समिती चौकशी करत आहे. त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले तर खासदारकी धोक्यात येऊ शकते.
 
सुभाशिष मोईत्रा म्हणतात, “हे गंभीर आरोप आहेत, ते सिद्ध झाले तर त्यांचं राजकीय नुकसान होऊ शकतं. आतापर्यंत त्यांनी आरोपांचा इन्कार केला आहे.”
 
संसदेत आक्रमकपमणे बोलणारे लोक वादात अडकल्याचे दाखलेही त्यांनी दिले. आपचे खासदार संजय सिंह कथित मद्य परवाना प्रकरणात तुरुंगात आहेत तर राघव चढ्ढासुद्धा त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या मुद्द्यावरून वादात आहेत.
 
संजय सिंह यांनीसुद्धा अदानींवर आरोप केले आहेत. पत्रकारिता असो की संसद आरोप करणाऱ्यांना कायमच अडकवलं जातं, असं ते म्हणतात.
 
मोईत्रा यांच्यावर काय आरोप आहेत?
गेल्या रविवारी (15 ऑक्टोबर) भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर आरोप केला की, हिरानंदानी ग्रुपचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांच्याकडून 'रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेऊन' त्या संसदेत प्रश्न विचारतात, आणि त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोईत्रा यांच्या निलंबनाची मागणी केली.
 
बीबीसीशी बोलताना महुआ मोईत्रा म्हणतात, “या आरोपात काहीही दम नाही. मी जर भेटवस्तू घेतल्या तर त्याची यादी कुठे आहे? भाजप एका प्रवक्त्याच्या दाव्याचा आधार घेऊन माझ्यावर आरोप लावत आहेत हे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.”
निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून सांगितलं की, त्यांच्याकडे यासंबंधी ठोस पुरावे आहेत. संसदेत महुआ मोईत्रा यांनी 61 प्रश्न विचारले त्यापैकी 50 प्रश्न अदानी समुहाशी संबंधित होते असं दुबे म्हणतात.
 
सध्या हे प्रकरण आचार समितीकडे आहे.
 
दुबे यांनी हे आरोप जय देहाद्राई यांनी सुप्रीम कोर्टात तक्रार दिल्यावर लावले आहेत. जय अनंत देहाद्राई यांनी सीबीआयकडे शपथपत्र दाखल केलं आहे,
 
महुआ मोईत्रा म्हणतात, “अनंत एक दुखावलेले प्रियकर आहेत. त्यामुळे ही दुखावलेली लोक महिलांच्या चेहऱ्यावर असिड फेकतात. हाही प्रकार असाच आहे. जळफळाटातून त्याने हा प्रकार केला आहे.”
 
आचार समितीला हिरानंदानी यांनी दिलं शपथपत्र
 
हिरानंदानी समुहाचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी संसदेच्या आचार समितीसमोर एक शपथपत्र दिलं आहे. त्यात महुआ मोईत्रा यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत.
 
मोईत्रा यांनी हे आरोप खारिज केले आहेत. ते एक अप्रुव्हर एफिडेव्हिट आहे. ते विना लेटर हेड साध्या कागदावर लिहिलं आङे.
 
अप्रुव्हर असा व्यक्ती असतो जो एखाद्या प्रकरणात आरोपी असतो आणि नंतर तो माफीचा साक्षीदार होतो.
 
बीबीसीशी बोलताना महुआ म्हणाल्या, “हिरानंदानी माझे जुने मित्र आहेत. त्यांना हे शपथपत्र लिहायला लावलं आहे. भाषेवरून असं वाटतं की बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून सही करवून घेतली आहे.”
 
अदानी समुहाने काय म्हटलं?
अदानी समुहाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
 
अधिवक्ता जय अनंत देहाद्राई यांच्या आरोपाचा उल्लेख करत ते म्हणाले, “महुआ मोईत्रा आणि हिरानंदानी यांनी अदानी यांना लक्ष्य करण्यासाठी कट रचला.”
 
काही लोक अदानी समुहाला टार्गेट करण्यासाठी ओव्हटाईम करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
पाळीव कुत्रा हेन्रीवरून आरोप
देहाद्राई यांनी आरोप लावला की त्यांनी त्यांचा कुत्र्याला, हेन्रीला यासाठी ठेवलं आहे जेणेकरून सीबीआयला प्रवेश करण्यापासून रोखलं जावं. हा कुत्रा महुआ मोईत्राने किडनॅप केला आहे. त्यांनी या कुत्र्याचा फोटोही शेअर केला आहे.
 
देहाद्राई यांनी लिहिलं हेन्रीलाला परत करण्याच्या बदल्यात सीबीआयकडे केलेली तक्रार परत घेण्याचा प्रयत्न केला गेला होता.
ते म्हणाले, “मी त्याला स्पष्ट नकार दिला. मी सीबीआयला सगळी माहिती देणार.”
 
प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार महुआ मोईत्राआणि देहाद्राई यांच्यात जवळचे संबंध होते.
 
सध्या हा कुत्रा महुआ यांच्याकडे आहे. त्यांनी हेन्रीबरोबर अनेक फोटो शेअर केले आहेत.
 
Published By- Priya Dixit