आधारला मोबाइलसोबत लिंक करणार नाही – ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपण आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. ममता बॅनर्जी बोलल्या आहेत की, ‘मी आपला मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणार नाही. जर त्यांना हवं असेल तर त्यांनी माझा मोबाइल क्रमांक बंद करुन टाकावा. पण मी आधार लिंक करणार नाही’. याचवेळी ममता बॅनर्जी यांनी लोकांनाही आपल्याला साथ देण्याचं आवाहन केलं आहे. कोलकाता येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना ममता बॅनर्जी बोलल्या आहेत.
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हटलं की, ‘मी इतर लोकांना या मुद्द्यावर पुढे येण्याचं आवाहन करते. मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करुन आपल्या गोपनीयतेवर हल्ला केला जात आहे. जर आधार मोबाइलशी लिंक झाला तर पती-पत्नीमधील खासगी बोलणं सार्वजनिक होईल. काही अशा खासगी गोष्टी असतात, ज्या तुम्ही सार्वजनिक करु शकत नाही’.
दूरसंचार विभागाने 23 मार्च रोजी मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करण्याचा आदेश जारी केला होता. तेव्हापासूनच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोबाइल क्रमांकाला आधारशी जोडण्याला विरोध करत आहेत. यासोबतच ममता बॅनर्जी यांनी 8 नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जाणार असल्याची माहिती दिली आहे. राज्यभरात काळे झेंडे हाती घेऊन रॅली काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने बँक खात्यांप्रमाणे मोबाइल क्रमांकही आधार कार्डशी जोडणं अनिवार्य केलं आहे. लिंक न केल्यास एका ठराविक तारखेनंतर मोबाइल क्रमांक बंद केला जाईल. जर तुम्हीदेखील अद्याप लिंक केलं नसेल, तर तात्काळ करुन घ्या, अन्यथा 28 फेब्रुवारी 2018 नंतर मोबाइल क्रमांक बंद करण्यात येईल. दुसरीकडे बुधवारी सरकारने सर्वोच्च न्यायालयात माहिती देताना, वेगवेगळ्या सेवांसाठी आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यास आपण तयार असल्याचं सांगितलं आहे.