गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2023 (22:42 IST)

Manipur violence मणिपूर हिंसाचाराचं लोण ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पसरतंय?

manipur
दिलीप कुमार शर्मा
 
 39 वर्षीय एन. अंजली (नाव बदललेलं आहे)यांच्या साठी गेल्या शनिवारची सकाळ खूप भीतीदायक ठरली.
 
मिझोरमची राजधानी ऐझॉलमध्ये त्या आपल्या मुलासोबत राहतात. त्या मणिपूरच्या मैतेई समुदायातील आहे.
 
त्या मिझोरममध्ये स्थायिक झाल्यात. शनिवारी सकाळी जेव्हा अंजलीनं ऐकले की मैतेई समुदायातील बरेच लोक मिझोरम मधून पळत जात आहेत, तेव्हा त्यांचा रोजचा दिनक्रम अचानक संपुष्टात आला.
 
मिझोरममधील आदिवासी लोकांचा संताप आणि निषेध हा अनेकजण धोक्याचं लक्षण मानत आहेत.
 
पीस एकॉर्ड एमएनएफ रिटर्नीज असोसिएशन ( पीएएमआरए) नावाच्या संस्थेनं शुक्रवारी एक निवेदन जारी करून मिझोरममध्ये राहणाऱ्या मैतेईंना स्वतःच्या सुरक्षेसाठी मिझोरम सोडावं अन्यथा त्यांच्यासोबत होणाऱ्या कोणत्याही हिंसेला आपण जबाबदारी नसू. असा संताप व्यक्त केला आहे.
 
PAMRA ही एक प्रभावी संघटना आहे जी पूर्वीच्या भूमिगत मिझो नॅशनल फ्रंटच्या अतिरेक्यांशी जोडलेली आहे.
 
मिझोरममधील मैतेई समाज घाबरलाय
मणिपूरच्या जमावाकडून दोन कुकी महिलांना नग्न करून परेड केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यापासून ईशान्येकडील आदिवासींमध्ये प्रचंड संताप आहे आणि म्हणूनच तेथील मैतेई समाजात घबराट पसरली आहे.
 
एक हजारहून अधिक मैतेई समुदायाच्या लोकांनी ऐझॉल सोडलं आहे.
 
अंजली सांगतात ,"या आधी मिझोराममध्ये सर्वकाही सुरळीत चालले होतं, पण आता भीतीचं वातावरण आहे."
 
PAMRAनं मिझोराममध्ये प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, मणिपूरमध्ये झो जातीय समुदायाविरुद्ध झालेल्या हिंसाचारानं मिझो लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं आता मिझोराम मध्ये राहणं मैतेई समुदायासाठी सुरक्षित नाही. या वक्तव्यानंतर शनिवारपासून मैतेई लोकांनी मिझोरम सोडण्यास सुरुवात केली. झो समुदायामध्ये कुकी, चिन आणि मिझो लोकांचा समावेश होतो
 
राज्य सरकारच्या आश्वासनानंतरही भीती कायम
ऑल मिझोरम मणिपूर असोसिएशनच्या माहितीनुसार, मिझोरममध्ये तीन हजार मैतेई लोक स्थायिक आहेत, ज्यात विद्यार्थी, सरकारी आणि खासगी नोकऱ्या करणारे लोक आहेत. राजधानी ऐझॉलमध्ये दोन हजार मैतेई लोक राहतात.
 
ऑल मिझोराम मणिपूर असोसिएशनच्या एका नेत्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "मिझोरम सरकारनं मैतेई लोकांच्या सुरक्षेची खात्री दिलीय, पण तरीही मैतेई समुदाय घाबरला आहे."
 
त्यांनी सांगीतलं की "अर्ध्याहून अधिक लोक मिझोरममधून स्थलांतरित झाले आहेत. आमच्या संस्थेनं मिझोरमच्या गृह आयुक्तांची दोन तीन वेळा भेट घेतली आहे. पण तरीही आम्ही मैतेई समुदायाच्या आमच्या लोकांना मिझोरममध्ये राहण्याचं सुचवू शकत नाही."
 
दुसरीकडे PAMRAनं स्पष्ट केलं की त्यांनी प्रसिद्ध केलेलं प्रेस रिलीज केवळ एक सल्ला आहे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारमुळं मिझोरम मधील जनभावना मैतेई समुदायाच्या विरोधात असल्यानं मैतेई लोकांना सावधगिरी बाळगण्याची विनंती करण्यात आली होती. पण मिझोरम सोडण्याचा आदेश किंवा नोटीस कोणालाही देण्यात आली नव्हती.
 
मिझोरममध्ये मैतेई लोकांना राज्य सोडण्याचा आदेशाला उत्तर म्हणून ऑल आसाम मणिपूर स्टुडण्ट असोसिएशन नावाच्या संघटनेनं बराक खोऱ्यात राहणाऱ्या मिझो लोकांना हा परिसर सोडण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी काही तासातच आपलं विधान मागे घेतलं.
 
याशिवाय मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात मंगळवारी आसाम मधील दिमा हसाओ जिल्ह्यातील हजारो आदिवासी महिला रस्त्यावर उतरल्या होत्या आणि पीडितांना न्याय देण्याची मागणी करत होत्या.
 
इतर राज्यांमध्ये हिंसाचार पसरण्याचा धोका
मणिपूर हिंसाचार प्रकरणानंतर ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया सामोरं आल्या आहेत, यावर बोलताना नॉर्थ ईस्टर्न सेंटर फॉर सोशल रिसर्चचे संचालक व्होल्टर फर्नांडिस हा धोक्याचा इशारा असल्याचं सांगतात.
 
ते सांगतात की" मणिपूरमध्ये इतक्या दिवसांपासून ज्या प्रकारे हिंसाचार सुरु आहे, त्यावरून मला असं वाटत की काही राजकीय शक्ती आहेत त्यांना हा संघर्ष अधिक व्यापक प्रमाणात पसरवायचा आहे. ही परिस्थिती आपण थांबवली पाहिजे. काही जण स्थानिक मुद्द्यांचा स्वार्थासाठी वापर करताहेत."
 
ईशान्य भारतात या सात राज्यांमध्ये अनेक दिवसांपासून फुटीरतावादामुळं अशांतता आहे. पण 2014 पासून सरकारनं नॅशनल कौन्सिल ऑफ नागालँड (NSCN-IM) या नागा बंडखोर संघटनेसोबत करार केला होता.
 
याशिवाय इतर अनेक राज्यांतील अतिरेक्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे दावे करण्यात आले. अनेक राज्यांमधून आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट (AFSPA)देखील हटवण्यात आला. त्यामुळं ईशान्येकडील राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित होत असल्याचं लोकांना वाटू लागलं होतं. पण मणिपूर हिंसाचारानं या सर्व आशा धुळीस मिळाल्या.
 
ईशान्येकडील प्रदेशात शांततेशी संबंधित प्रश्नांचं उत्तर देताना व्होल्टर फर्नांडिस सांगतात की, "गेल्या काही वर्षांमध्ये काही संघर्ष थांबले आणि स्थिरता दिसून आली, परंतु दुसरीकडे जातीय संघर्ष वाढत आहेत. अशा काही शक्ती आहेत ज्या मणिपूरमध्येच नाही तर इतरत्र संघर्षांना खतपाणी घालत आहेत."
 
उदाहरणार्थ आसाममधील परिस्थिती पाहा, इथं जातीच्या मुद्द्यांमध्ये साम्यवादी शक्ती दिसून येतेय. या राजकीय शक्ती स्वतःच्या फायद्यासाठी जातीय संघर्षाला सांप्रदायिक संघर्षात बदलू पाहत आहेत.
 
मिझो कुकी लोकांमध्ये वांशिक समानता
मणिपूरमधील वांशिक हिंसाचारामुळं सध्या 12 हजार 584 चिन-कुकी-झो लोकांनी मिझोरममध्ये आश्रय घेतला आहे. मिझोरममधील मिझो लोकही कुकी झोमीस जमातीशी संबंधित आहेत. असं म्हंटल जात की मिझोरमच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग या बेघर चिन-कुकी आणि झो पीडितांबद्दल सहानुभूती बाळगतात आणि त्यामुळंच ते मैतेई लोकांवर प्रचंड नाराज आहेत.
 
मिझोरम आसाम यासारख्या राज्यांवर याचा काय परिणाम होतो यावर ज्येष्ठ पत्रकार समीर के पुरकायस्थ म्हणतात की, "ईशान्येकडील राज्यात ज्या भागात आदिवासी लोकसंख्या अधिक आहे तिथं हिंसाचाराचं प्रमाण अधिक दिसून येतं. मिझोरमचा संबंध सांगायचं झाला तर, कुकी आदिवासी आणि मिझो हे केवळ वांशिक दृष्ट्या बांधील नाहीत, तर दोघे एकाच ख्रिश्चन धर्मानं बांधले गेले आहेत. त्यामुळं कुकी लोकांवरील हल्ल्या नंतर थेट मिझो लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळं त्याचा परिणाम हा मिझोरममध्ये दिसून येतोय."
 
ते सांगतात की" आसामच्या काही भागात जिथं दोन्ही जमातीचे लोक राहतात तिथं काही प्रमाणात तणाव निर्माण होऊ शकतो, पण उर्वरित राज्यांमध्ये या हिंसाचाराचा थेट परिणाम दिसून येत नाही. कारण आदिवासी समाज तिथं वेगवेळ्या भागात राहतात."
 
मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरु असलेल्या हिंसाचारानंतर, मेघालयातील पोलीसांनी अशांतता पसरवल्याच्या आरोपखाली 16 लोकांना अटक केली.
 
मेघालयातील सुरुवातीचा तणाव पाहता राज्य सरकारला अनेक उपाययोजना कारवाया लागल्या. कारण कुकी आणि मैतेई यांच्यातील हिंसाचार हा आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यातील लढा बनला आहे. अशा परिस्थितीत ईशान्येकडील राज्यांत स्थायिक झालेल्या आदिवासी समाजाच्या नाराजीचा परिणाम काय होऊ शकतो?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना समीर सांगतात, "मणिपूरमधील हिंसाचारामुळे आदिवासी समाज हा मैतेई समुदायाविरोधात संतापला आहे. विशेषतः दोन कुकी महिलांना नग्नावस्थेत परेड केल्याच्या घटनेननंतर, मिझोरम, आसाम, मेघालय यासह आदिवासींनी सर्वत्र आपला निषेध व्यक्त केलाय."
 
"परंतु आपण यापूर्वीची अनेक उदाहरण पाहिल्यास मणिपूरमध्ये 2001 मध्ये फुटीरतावादी संघटना NSCN-IM सोबत मोठा संघर्ष झाला. पण त्याचा परिणाम नागालँड मध्ये झाला नाही. कारण नागा लोकांचं म्हणणं होतं की हा मुद्दा तांगखुल जमातीचा आहे, तो तेच हाताळतील. NSCN-IM चे नेते तांगखुल जमातीचे आहेत.कुकी नागा हिंसाचारावेळी कोणताच प्रभाव ईशान्येकडील राज्यात पडला नाही."
 
बराक व्हॅली
मिझोरममध्ये स्थायिक झालेले बहुतेक मैतेई लोक आसामच्या बराक खोऱ्यातील रहिवासी आहेत.
 
मिझोरमची सीमा बराक व्हॅली प्रदेशाच्या जवळ आहे. ही आसाम -मिझोरमची तीच विवादित सीमा आहे, जिथं 2021 मध्ये हिंसाचार झाला होता. ज्यात आसामचे पाच पोलीस कर्मचारी ठार झाले होते. बराक व्हॅलीचा भाग हा मिझोरमला लागून असल्यानं मिझो लोकही इथं स्थायिक आहेत. मणिपुरी विद्यार्थी संघटनेच्या इशाऱ्यामुळं इथं तणावाचं वातावरण आहे.
 
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावर चिंता व्यक्त करताना, ईशान्येकडील विद्यार्थी संघटना, नॉर्थ ईस्ट स्टुडण्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सॅम्युअल जिरवा म्हणाले, "कोणत्याही प्रकारच्या हिंसाचारावर वेळीच नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. जे काही घडत आहे त्याबद्दल सर्व समुदायातील लोकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. आता पर्यंत मणिपूर हिंसाचाराचा इतर कोणत्याही राज्यात परिणाम झालेला नाही."
 
दरम्यान मिझोरम सरकारं एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलंय की,'राज्यात आतापर्यंत कोणतीही हिंसा किंवा अनुचित घटना घडलेली नाही.'
 
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारात आता पर्यंत 150 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावलाय. तर 60 हजारांहून अधिक लोक बेघर झाली आहेत.