मन की बात-नरेंद्र मोदी : 'फ्रंटलाईन वर्कर्सनी आपल्या जीवावर उदार होऊन काम केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मे महिन्यातील मन की बात कार्यक्रम आज प्रसारित झाला. पंतप्रधानांनी फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक केलं. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांनी जीवावर उदार होऊन सर्वांनी काम केलं असं मोदी म्हणाले.
त्याच सोबत जे ऑक्सिजनचे टॅंकर घेऊन जाणारे ड्रायव्हर आहेत ते देखील मोठं काम करत आहे असं मोदी म्हणाले.
कोरोनाची भारतातील दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस घसरत चालल्याचंही काही सर्वेक्षणांमधून समोर येत आहे.
शिवाय, आजच नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची द्वितीय वर्षपूर्ती होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम प्रसारित झाला.
मोदी सरकार : दुसरा टर्म, द्वितीय वर्षपूर्ती
आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी सरकारची दोन वर्षं पूर्ण होत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर 30 मे 2019 रोजी नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी पार पडला होता.
दुसऱ्यांदा सत्ता हस्तगत केल्यानंतर पहिल्या वर्षात कलम 370, ट्रिपल तलाक, CAA-NRC यांसारखे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतले होते. पण दुसरं वर्ष पूर्णपणे कोरोनामध्ये निघून गेलं. यादरम्यान कोरोना स्थिती हाताळणं, लसीकरण मोहीम, ऑक्सिजन पुरवठा आदी मुद्यांवरून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं.
या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम योगायोगाने द्वितीय वर्षपूर्तीच्याच दिवशी आला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी काय बोलतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.