शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (10:13 IST)

मौलवींची विनंती, शांततेचे आवाहन करा!

अलीगढ : अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर अलिगढ जिल्ह्यातील मौलवींनी मशिदींतील इमामांची भेट घेऊन जनतेने शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी आवाहन करावे, अशी विनंती केली. सामाजिक सौहार्द कायम रहावे, आणि लोकांच्या धार्मिक भावना प्रक्षुब्ध होऊ नयेत, या हेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
 
मुस्लीम मौलवी आणि पोलिसांच्यात शनिवारी बैठक झाली. त्यात झालेल्या चर्चेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला. नायब शहर काझी झनिहूर राशिदीन म्हणाले, वरीष्ठ पोलिस अधिक्षक अजयकुमार साहनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतर कोणती स्थिती उद्‌भवू शकते, याचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात शांतता आणि सलोखा कायम ठेवण्यासाठी शक्‍य ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही मुस्लिमांकडून देण्यात आली. जो काही निर्णय लागेल तो स्वीकारून त्याचा आदर सर्वांनी करावा असे ठरवण्यात आले. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमात ए उलेमा यांनी या आधीच सर्वोच्च न्यायलयाचा निकाल स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.
 
जिल्ह्यातील 500 मशीदींच्या इमामांची बैठक घेण्यात आली. त्यात त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्याबाबत विनंती करण्यात आली. हे आवाहन शक्‍यतो शुक्रवारच्या नमाजनंतर करण्यात यावे, असे सुचवण्यात आले. दरम्यान काही मौलानांनी अशीच बैठक हिंदु समाजाच्या धार्मिक नेत्यांची घ्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर तशी एक स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. त्यानंतर दोन्ही समाजाची एकत्रित बैठक घेण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.