सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (22:17 IST)

खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा, मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना पुन्हा एकदा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मेहबुबा मुफ्ती आता पुढील आदेशापर्यंत नजरकैदेत राहतील. जम्मू-काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी घटना आणि सुरक्षा दलांच्या भीषण चकमकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संध्याकाळी स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. खोर्‍यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबाबत मेहबुबा मुफ्ती यांनी नुकताच केंद्र सरकारवर मोठा आरोप केल्याने त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
खोऱ्यात सोमवारी झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी मारले गेल्यावर मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या होत्या की, खोऱ्यात दहशतवादीही मारले जात आहेत की नाही हे कोणालाही माहिती नाही. या चकमकीत नागरिक ठार झाल्याचा दावा त्यांनी केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाच्या नावाखाली सर्वसामान्यांना लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. 
 
यापूर्वीही खोऱ्यात सुरक्षा दलांची संख्या वाढवण्यात आली होती, तेव्हाही मेहबुबा मुफ्ती यांनी टीका केली होती. लष्कराची उपस्थिती वाढवून खोऱ्याचे छावणीत रूपांतर सरकार करू इच्छित असल्याचे मुफ्ती म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यावर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली होती.
 
याआधीही, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मुफ्ती जेव्हा फटाके फोडणाऱ्या किंवा टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींना पाठिंबा दिल्याने वादात सापडल्या होत्या. त्यावेळी पीडीपी प्रमुखांनी लोकांना विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केला तर राग कशाला, असे म्हटले होते.