गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 जुलै 2024 (14:18 IST)

तामिळनाडूतील बसपा प्रदेशाध्यक्षांची हत्या, बॉक्सर ते नेता बनलेले आर्मस्ट्राँग कोण होते?

murder knief
चेन्नईमध्ये बहुजन समाज पक्षाचे (बसपा) प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची शुक्रवारी (5 मे) संध्याकाळी हत्या करण्यात आली आहे. आर्मस्ट्राँग यांची चेन्नईतील त्यांच्या घरी हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली.
मद्रास उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त असरा गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून हत्येचे कारण शोधले जात आहे.
बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
 
मायावती यांनी एक्स (पूर्वीच्या ट्विटर) या सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलं की, "बहुजन समाज पक्षाचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांची आज संध्याकाळी चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर झालेली निर्घृण हत्या अत्यंत दुःखद आणि अत्यंत निषेधार्ह आहे. पेशाने वकील असलेले आर्मस्ट्राँग हे राज्यातील दलितांसाठी खंबीर आवाज म्हणून ओळखले जात होते. सरकारने तातडीने दोषींवर कठोर कारवाई करावी."
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील आर्मस्ट्राँग यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे.
 
एक्स (पूर्वीच्या ट्विटर) सोशल मीडिया माध्यमावर पोस्ट करून त्यांनी लिहिलं की, "तामिळनाडू काँग्रेसचे नेते सातत्याने सरकारशी संवाद साधत आहेत आणि राज्य सरकार दोषींवर कारवाई करेल, याची मला खात्री आहे."
 
अशी झाली हत्या
आर्मस्ट्राँग यांचं घर चेन्नईच्या पेरांबूर परिसरात आहे. घटनास्थळापासून जवळच त्यांचं आणखीन एक जुनं घर आहे, जे पाडून ते नवीन घर बांधत होते. आर्मस्ट्राँग रोज संध्याकाळी त्यांच्या जुन्या घराजवळ जायचे आणि तिथे काही लोकांशी त्यांची चर्चा व्हायची.
 
शुक्रवारी (5 मे) संध्याकाळी 7.30 च्या सुमारास तिथे दुचाकीवरून आलेल्या लोकांनी आर्मस्ट्राँग यांच्यावर विळा आणि चाकूने हल्ला करून पळ काढला.
हा हल्ला झाला त्यावेळी तिथे असलेले इतर दोन लोकही जखमी झाले. हा हल्ला झाल्यानंतर लगेच जवळच्या सेंबियम पोलीस ठाण्यात याची माहिती दिली गेली.
पोलिसांना या हल्ल्याची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी गेले आणि आर्मस्ट्राँग यांना क्रीम्स रोड येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारांआधीच आर्मस्ट्राँग यांना मृत घोषित करण्यात आलं. दोन जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत.
 
अंत्यसंस्कारांवरून वाद
आर्मस्ट्राँग यांच्या बहुजन समाज पक्षाने अशी मागणी केली होती की, त्यांच्या पार्थिवावर चेन्नईतील बसपाच्या कार्यालयात अंत्यसंस्कार केले जावेत. पण चेन्नई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तशी परवानगी दिलेली नाही.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
 
7 जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता संपत या खटल्याची सुनावणी करणार आहेत.
 
या खटल्याच्या निकालावरून आर्मस्ट्राँग यांच्या पार्थिवावर नेमके कुठे अंत्यसंस्कार केले जातील हे ठरवलं जाईल.
 
कोण होते आर्मस्ट्राँग?
चेन्नईच्या पेरांबूरमध्ये आर्मस्ट्राँग यांचा जन्म झाला होता. शालेय वयात असतानाच त्यांना राजकारणाची आवड निर्माण झाली. यासोबतच त्यांना बॉक्सिंग आणि इतर खेळांचीही आवड होती.
 
शालेय वयातच त्यांना बॉक्सिंग आणि राजकारणाची आवड निर्माण झाली होती. 2000 पर्यंत ते पूवई मूर्ती यांच्या नेतृत्वाखालील 'प्राची भारतम' पक्षात सामील झाले होते. दरम्यान, त्यांनी तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वरा लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवीही मिळवली होती.
2002 मध्ये पूवई मूर्ती यांच्या निधनानंतर आर्मस्ट्राँग यांनी 'आंबेडकर दलित फाऊंडेशन' नावाची संस्था स्थापन केली होती.
 
2006 च्या चेन्नई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 'हत्ती' या निवडणूक चिन्हावर त्यांचा विजय झाला आणि बहुजन समाज पक्षातल्या राज्यातील नेत्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं.
 
बसपाच्या राज्यातील नेत्यांनी त्यांना बसपामध्ये येण्याची विनंती केली आणि त्यानंतर लगेचच 2007 मध्ये बसपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आर्मस्ट्राँग यांना नियुक्त करण्यात आलं.
 
नगरसेवक असताना आर्मस्ट्राँग यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या एक आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.
 
बसपाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना चेन्नईला आणलं होतं आणि एक मोठी सभा घेतली होती.
 
आर्मस्ट्राँग यांना जवळून ओळखणारे रजनीकांत म्हणतात की, "आर्मस्ट्राँग यांनी डॉ. आंबेडकरांचं लिखाण वाचलं होतं, त्यांच्या लिखाणाचा अभ्यास त्यांना होता. त्यांना भेटायला जाणाऱ्यांना ते नेहमी आंबेडकरांच्या लिखाणाचे दाखले देत असत."
 
आठ आरोपींना अटक
उत्तर चेन्नईचे अतिरिक्त आयुक्त असरा गर्ग यांनी सांगितलं की, बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली असून विशेष पोलीस तपास करत आहेत.
 
असरा गर्ग म्हणाले की, “सध्या आम्ही 8 जणांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. हा प्राथमिक तपास सुरु आहे. अटक केलेल्यांची कसून चौकशी केल्यानंतरच हत्येमागील संपूर्ण कारण समोर येईल. आम्ही यासाठी 10 विशेष पथकं तयार केली असून तपास करत आहोत. या हत्येत काही धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.”
 
तामिळनाडूच्या राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया
या हल्ल्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून या घटनेत सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलेलं आहे.
 
तामिळनाडूच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते ईके पलानीस्वामी यांनी तीव्र शब्दांमध्ये या हत्येचा निषेध केला आहे.
 
ईके पलानीस्वामी म्हणाले की, "एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची अशी हत्या होत असेल तर डीएमके सरकारमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत न बोललेच बरं. यांच्यावर टीका करण्यातही काही अर्थ नाही. गुन्हेगारांची अशी हत्या करण्याची हिंमतच कशी होऊ शकते?"
तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून लिहिलं की, "चेन्नई येथे आज बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची निर्घृण हत्या झाल्याच्या वृत्ताने मोठा धक्का बसला आहे. राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था एवढी बिघडलेली असताना मुख्यमंत्री पदी राहण्याची नैतिकता एम. के. स्टालिन यांच्यात आहे का? याचा त्यांनी विचार करावा."
 
तामिळनाडूमध्ये याआधी एआयएडीएमकेच्या नेत्यांचीही हत्या झालेली असल्याने आर्मस्ट्राँग यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.
 
मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी एक्सवर पोस्ट करून लिहिलं की, "बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येमुळे मोठा धक्का बसला आहे आणि खूप दुःख झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे व्यथित झालेल्या सर्वांप्रती मी मनापासून शोक आणि संवेदना व्यक्त करतो. मी पोलिसांना या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींना कायद्यानुसार योग्य शिक्षा दिली जाईल."
 
तामिळनाडूमध्ये 'हाय प्रोफाइल हत्यांचं' सत्र
गेल्या तीन महिन्यांमध्ये राज्याच्या विविध भागात झालेल्या काही हत्यांमुळे तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
 
तामिळनाडूमध्ये मागच्या काही काळात एकापाठोपाठ एक राजकीय हत्या होत आहेत.
काही काळापूर्वी तिरुनेलवेली येथे काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा गूढ मृत्यू झाला, सालेममध्ये एआयएडीएमके पक्षाच्या नेत्याची हत्या करण्यात आली आणि आता बहुजन समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाची हत्या करण्यात आली आहे.
 
तिरुनेलवेली येथील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात होत असलेल्या आंतरजातीय विवाहांमुळे त्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता, तेव्हाही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता आर्मस्ट्राँगच्या हत्येने पुन्हा तामिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
चेन्नईचे महानगर आयुक्त संदीप रॉय राठोड म्हणाले की, आर्मस्ट्राँगच्या मृत्यूकडे राजकीय हत्या म्हणून पाहू नये.
 
Published By- Priya Dixit