मणिशंकर अय्यर यांची जीभ घसरली; मोदी ‘नीच’,’असभ्य’ माणूस
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदम नीच आणि असभ्य माणूस असल्याची टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचं उद्घाटन केलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका करत निशाणा साधला होता. काँग्रेसच्या एका कुटुंबाला वाढवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना मणिशंकर अय्यर यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी मोदींना नीच आणि असभ्य म्हणून टाकलं. याआधी मणिशंकर अय्यर यांनी 2014 लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदींना ‘चायवाला’ म्हटलं होतं.
उद्घाटनावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी जे राजकीय पक्ष बाबासाहेबांच्या नावाने मतं मागतात त्यांना बाबासाहेबांपेक्षा आजकाल भोले बाबांची आठवण येऊ लागलीय, अशा शब्दांत आज अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर हल्लाबोल केला. दरम्यान, पटेलांप्रमाणेच आंबेडकरांवरही काँग्रेसने कसा अन्याय केला, हेदेखील मोदींनी सांगितलं. 1992 मध्ये नरसिंहराव हे पंतप्रधान असताना बाबासाहेबांच्या नावाने अशा केंद्राची संकल्पना मांडली गेली होती. मात्र इतकी वर्षे हे काम पूर्ण करण्याची तसदी कुणी घेतली नाही, असा आरोप मोदींनी केला.
पंतप्रधानांच्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर इतके संतापले की त्यांनी मोदींना खरं खोटं सुनावलं आहे. ते बोलले की, ‘आंबेडकरांचं जे स्वप्न होतं, ते पुर्ण करण्यासाठी एका व्यक्तीने सर्वात मोठं योगदान दिलं ते म्हणजे जवाहरला नेहरु. अशा कुटुंबाबद्दल तुम्ही इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलता आणि तेदेखील आंबेडकरांच्या आठवणीत बांधण्यात आलेल्या इमारतीच्या उद्धाटनावेळी. मला वाटतं हा माणूस एकदम नीच आहे. त्याच्यात कोणती सभ्यता नाही. अशावेळी इतक्या घाणेरड्या राजकारणाची काय गरज’
गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी आपण शिवभक्त असल्याचं सांगितलं होतं. राहुल गांधींच्या त्याच वक्तव्यावरुन नरेंद्र मोदींनी टोला लगावला आहे. पण नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर देण्याच्या नादात मणिशंकर अय्यर यांनी मात्र अपमानजनक शब्दांचा वापर केला आहे. याआधी नरेंद्र मोदींनी बुधवारी अहमदाबादमधील धंधुका येथे पार पडलेल्या सभेत काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली होती. एका कुटुंबाने बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार पटेल यांच्यासोबत खूप अन्याय केलं असल्याचं सांगत काँग्रेसवर टीका केली होती.