शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (14:07 IST)

नरेंद्र मोदींची घोषणा: 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्काराचे नाव यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार राहील अशी घोषणा केली आहे.मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेल रत्न पुरस्कार असावा अशा माझ्याकडे अनेक सूचना आल्या त्यामुळे लोकांच्या भावनांचा विचार करून यापुढे खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हटले जाईल. अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हटलं जातं. हा देशातला क्रीडा क्षेत्रासाठी मिळणारा सर्वांत मोठा पुरस्कार मानला जातो.
 
खेलरत्न पुरस्कार हा 1991-92 ला सुरू झाला. पहिला पुरस्कारार्थी बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद ठरला होता.
 
मेजर ध्यानचंद कोण होते?
हॉकीचे जादूगार संबोधले जाणारे मेजर ध्यानचंद आपल्या खेळासाठी जगभरात लोकप्रिय होते. तितकेच आपल्या निडरपणासाठीही त्यांना ओळखलं जायचं.
जर्मनीचा हुकूमशहा हिटलरची ऑफर धुडकावून लावल्यामुळे ध्यानचंद यांची खूप मोठी चर्चा त्या काळी झाली होती.
मेजर ध्यानचंद त्यांच्या काळात प्रचंड लोकप्रिय होते. बर्लिन ऑलंपिकच्या 36 वर्षांनंतर मेजर ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार एकदा जर्मनीला हॉकी खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती चक्क स्ट्रेचरवर त्यांना भेटण्यासाठी आली होती.
 
हॉकीचे जादूगार
मेजर ध्यानचंद यांचा 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला होता. त्यांना हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून आजही ओळखलं जातं.
बॉक्सिंगमध्ये मोहम्मद अली, फुटबॉलमध्ये पेले आणि क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कर्तृत्वाने जी उंची गाठली, त्याच प्रकारची कामगिरी मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये करून ठेवलेली आहे.
ध्यानचंद यांनी 1928 मध्ये अॅमस्टरडॅम, 1932 ला लॉस एंजेलिस आणि 1936 च्या बर्लिन ऑलंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं नेतृत्व केलं होतं.
मेजर ध्यानचंद यांचे अनेक किस्से आजसुद्धा सांगितले जातात. पण 1936 च्या बर्लिन ऑलंपिकमध्ये ध्यानचंद यांनी हिटलरचा प्रस्ताव फेटाळण्याचा किस्सा अविस्मरणीय आहे.
 
हिटलरची घसघशीत ऑफर नाकारली
मेजर ध्यानचंद यांचा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाचा तो सुवर्णकाळ होता. मेजर ध्यानचंद यांचा खेळ आवडल्यानं जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात मोठं पद देऊ केलं आणि जर्मनीसाठी हॉकी खेळण्यास सांगितलं.ध्यानचंद त्यावेळी भारतीय लष्करात लान्स नायक या कनिष्ठ पदावर कार्यरत होते. पण जर्मन सैन्यातल्या मोठ्या पदाची ऑफर ध्यानचंद यांनी स्पष्टपणे नाकारली.
 
"मी भारताचं मीठ खाल्लं आहे. त्यामुळे भारतासाठीच कायमचा खेळत राहीन," असं ध्यानचंद नम्रपणे हिटलरला म्हणाले.
 
ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांच्या मनात तर त्यांच्या कित्येक आठवणी जशाच्या तशा कोरल्या गेल्या आहेत. अशोक कुमार हेसुद्धा हॉकी खेळाडू होते. अशोक यांच्या गोलच्या बळावरच भारताने 1975 साली पाकिस्तानला हरवून हॉकी विश्वचषक जिंकला होता. बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत त्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या होत्या.
 
1972 मध्ये भारतीय हॉकी संघ जर्मनी दौऱ्यावर होता. मैदानावर सराव करत असताना काही लोक एका माणसाला स्ट्रेचरवर घेऊन त्याठिकाणी आले. त्या स्ट्रेचरवरच्या व्यक्तीने थेट अशोक कुमार यांना गाठलं.
 
त्या व्यक्तीने आपल्यासोबत काही वर्तमानपत्रातली कात्रणं आणली होती. त्यामध्ये बर्लिन ऑलंपिकदरम्यान छापून आलेल्या बातम्या त्यांनी अशोक कुमार यांना दाखवल्या."हे बघा, असे होते तुमचे वडील!" असं ती व्यक्ती म्हणाली.
 
पद्मभूषण'नं गौरव
अशोक कुमार सांगतात, "त्यावेळी ध्यानचंद यांचं विशेषत्व काय असेल, तर ते ब्रिटिश सैन्यात होते, शिपायापासून मेजर पदापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी भारत इंग्रजांच्या सत्तेखाली होता."
स्टिकमध्ये चुंबक असल्याचं म्हणत अनेकदा ध्यानचंद यांची स्टिक बदलण्यात आली.
 
हॉकीच्या या महान खेळाडूचं 3 डिसेंबर 1979 रोजी दिल्लीत निधन झालं. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद यांना 1956 साली 'पद्मभूषण' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची मागणी केली जातेय. माजी गृहराज्यमंत्री तसंच विद्यमान क्रीडा मंत्री किरण रिजुजू यांनीही 'भारतरत्न'साठी मेजर ध्यानचंद यांची शिफारस करण्यात आल्याचं काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं. मात्र, अद्याप मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात आलेला नाही.