मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (13:06 IST)

नरेंद्र मोदी पंजाब दौरा: 'त्या' 20 मिनिटांत नेमकं काय घडलं?

पंजाबमधल्या फिरोजपूरमध्ये एका उड्डाण पुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अचानक थांबतो. 15 - 20 मिनिटं मोदींच्या गाड्या आहे तिथेच उभ्या राहतात.
 
या उड्डाणपुलापासून पाकिस्तानची सीमा अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर असते. पंतप्रधानांना सुरक्षा देणारे एसपीजीचे कमांडो बंदुका सरसावत मोदींच्या ताफ्यांभोवती कोंडाळं करतात. पंजाब पोलिसांची धावपळ एक मोर्चा बाजूला करण्याची धावपळ सुरू असते.
 
हे सगळं सिनेमात घडतंय तसं वाटत असलं तरी ते प्रत्यक्षात घडलंय. देशात सर्वोच्च सुरक्षा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या बाबतीत एक मोठी आगळीक झाली आणि हा प्रसंग ओढावला. या चुकीची चर्चा आता माध्यमांसह सोशल मीडियावर जोरात होतेय.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटीवरून राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हे प्रकरण नेमकं काय आहे तसंच नरेंद्र मोदी अडकले त्या 15 - 20 मिनिटांत काय थरार घडला ते आता आपण पाहुयात.
 
खराब हवामानामुळे रस्तेमार्गे जाण्याचा निर्णय
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदी हे पंजाबमधल्या हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी 5 जानेवारीला भटिंडा इथे पोहचले. तेथून ते प्रत्यक्ष स्मारकाच्या इथे हेलिकॉप्टरने जाणार होते. मात्र पाऊस आणि खराब दृश्यमानतेमुळे हवाई मार्गाने जाण्याचा पर्याय टाळण्यात आला.
तरी भटिंडामध्ये पंतप्रधानांनी हवामान स्वच्छ होण्याची सुमारे 20 मिनिटे वाट पाहिली. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरले. हा रस्त्याचा प्रवास तब्बल 2 तासांचा होता.
 
केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यक ती सर्व पूर्तता करण्यात आल्याची खात्री केल्यानंतर ताफा हुसैनीवालाच्या दिशेने रवाना झाला.
 
मात्र हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा फ्लायओव्हरवर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे दिसून आले.
 
मोदी उड्डाणपुलावर अडकले..
एरव्ही मोदींच्या ताफ्यात चिटपाखरूही शिरत नाही किंवा त्यांचा ताफा 2 मिनिटही माहितीशिवाय थांबत नाही. पण या आंदोलकांमुळे मोदींचा ताफा एका उड्डाणपुलावरच अडकला.
त्यानंतर एसपीजीच्या सुरक्षा रक्षकांची मोठी धावपळ सुरू झाली. हे एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप्सचे कमांडो असतात. त्यांनी मोदींच्या गाडयांना घेराव घातला.
 
15-20 मिनिटांत काय घडलं?
नरेंद्र मोदी यांना या प्रकाराविषयी माहिती देण्यात आली. या कालावधीत सुमारे 15-20 मिनिट नरेंद्र मोदी आपल्या वाहनात तसेच बसून होते.
बाहेर हलकासा पाऊस पडत असल्याने सगळे कमांडो आणि पंजाब पोलीस भिजतच उभे होते. मोदींच्या जवळ कोणीच येऊ नये म्हणून 4 इनोव्हा गाड्या त्यांच्या मुख्य गाडीपासून 10 - 15 फुटांवर आडव्या लावण्यात आल्या.
 
मोदींच्या सुरक्षेसाठी NSG चे बंदूकधारी कमांडो त्यांच्या वाहनाभोवती पहारा देत उभे होते. काही अंतरावर इतर कमांडो हातात बंदुका घेऊन तैनात करण्यात आले.
 
दरम्यान, आंदोलकांना आवरण्याचा आणि त्यांना मागे सारण्याचा प्रयत्न पंजाब पोलीस करत होते. मात्र, हा रस्ता मोकळा करण्यात त्यांना यश आलं नाही.
 
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची अधिक समस्या वाढू नये म्हणून मोदींच्या गाड्या मागे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
त्यामुळे सर्व वाहनांनी यू-टर्न घेतला आणि पुन्हा भठिंडा विमानतळाकडे रवाना झाले. मोदींचे पुढील सर्व कार्यक्रम सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे रद्द करण्यात आले.
 
या कालावधीत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण चन्नी यांनी फोनवरून संवाद साधला नाही, असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
 
विमानतळावर परतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली. ते म्हणाले, "तुमच्या मुख्यमंत्र्यांना थँक्यू सांगा. मी भठिंडा विमानतळावर जिवंत परतू शकलो."
राजकीय आरोप-प्रत्यारोप
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. दोषींवर ठोस कारवाई करू असंही शाह ट्वीट करत म्हणालेत.
तर, पंतप्रधानांच्या सुरक्षिततेविषयी पूर्ण काळजी घेण्यात आली होती असं पंजाबे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी म्हटलंय. कोरोना संसर्गग्रस्ताच्या संपर्कात आल्याने आपण पंतप्रधानांचं स्वागत करण्यास जाऊ शकलो नाही आणि त्यांना परतावं लागलं याचा आपल्याला खेद वाटत असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटलंय.
 
मात्र, पंतप्रधान हेलिकॉप्टरने शहीद स्मारकाकडे जाणार असल्याने रस्ता मोकळा नव्हता. ऐनवेळी रस्त्याच्या मार्गाने जायचा निर्णय घेतला गेल्याने ही घटना घडल्याचं चन्नी यांनी म्हटलं.
 
दरम्यान, ज्याठिकाणी कार्यक्रम होता तिथे माणसंच उपस्थित नव्हती असा टोला काँग्रेसने भाजपला लगावला.
तर, दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर आरोप केले. 'पंतप्रधानांचा जीव धोक्यात घातला गेला आणि पंजाब पोलिस मूकदर्शक बनून पाहत राहिली,' असं स्मृती इराणी यांनी म्हटलं.