शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 जानेवारी 2022 (19:28 IST)

नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवली- भाजपचा काँग्रेसवर आरोप

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीमुळं त्यांना सभेला जाता आलं नसल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
''हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर पंतप्रधान मोदी यांचा ताफा एका उड्डाण पुलावर पोहोचला. पण काही आंदोलकांनी रस्ता अडवला असल्याचं त्यावेळी समजलं. त्यामुळं पंतप्रधानांना उड्डाण पुलावर 15 ते 20 मिनिटं अडकून राहावं लागलं. पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती,'' असं गृह मंत्रालयानं म्हटलं.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेतील या चुकीमुळं मोदी यांनी ताफा वळवत पुन्हा बठिंडाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर आरोप केले. 'पंतप्रधानांचा जीव धोक्यात घातला गेला आणि पंजाब पोलिस मूकदर्शक बनून पाहत राहिली,' असं स्मृती इराणी यांनी म्हटलं.
इराणी यांनी म्हटलं, "काँग्रेसचे खुनी मनसुबे अपयशी ठरले आहेत. आम्ही अनेकदा म्हटलं आहे की, तुम्हाला मोदींचा द्वेष वाटत असेल, पण त्याचा राग देशाच्या पंतप्रधानांवर काढू नका. काँग्रेसला उत्तर द्यावं लागेल."
 
दुसरीकडे काँग्रेसनं म्हटलं की, पंतप्रधान सगळ्यांचे आहेत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे.
 
...तिथून पाकिस्तानची सीमा केवळ 10 किलोमीटरवर- कॅप्टन अमरिंदर सिंह
या सभेला कॅप्टन अमरिंदर सिंह हेदेखील पोहोचले होते. पंतप्रधान मोदी या सभेला न पोहोचल्यामुळे त्यांनीच सभेला संबोधित केलं.
 
अमरिंदर यांनी मोदींच्या सुरक्षेमध्ये राहिलेल्या त्रुटीवरून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर निशाणा साधला.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यासंबंधी ट्वीटही केलं आहे. त्यांनी म्हटलं, की पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेचं हे अपयश आहे. विशेषतः हे पंजाबच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचं अपयश आहे. जिथून पाकिस्तानची सीमा केवळ 10 किलोमीटर अंतरावर आहे, अशाठिकाणी तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सुरक्षित रस्ता देऊ शकत नाही? तुम्हाला सत्तेवर राहायचा काही अधिकार नाही. तुम्ही सत्ता सोडायला हवी.
 
गृह मंत्रालयाकडून गंभीर दखल
या विषयाची गंभीर दखल घेतली असून, पंजाब सरकारकडे याबाबत अहवाल मागवण्यात आला असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाब काँग्रेस सरकारवर या मुद्द्यावरून आरोप केला आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं नड्डा म्हणाले, असं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.
पंजाबचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांनी एसपीजीला पंतप्रधानांच्या ताफ्याच्या मार्गात काहीही अडथळा येणार नाही, असं आश्वासन दिलं होतं, असं नड्डा म्हणाले. तरीही आंदोलकांना पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याच्या मार्गात येऊ दिलं ही सुरक्षेतील मोठी त्रुटी होती, असं ते म्हणाले.
 
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे या प्रकरणी फोनवरूनदेखील बोलले नाहीत, असंही नड्डा यांनी म्हटलं. लोकांना पंतप्रधानांच्या सभेत जाण्यापासून रोखावं असे निर्देश पंजाब पोलिसांना दिले होते, असा आरोपही त्यांनी केला.
पीआयबीनं या संपूर्ण प्रकरणावर गृह मंत्रालयाचं निवेदन जाहीर केलं आहे.
''आज सकाळी पंतप्रधान मोदी बठिंडामध्ये उतरले आणि हेलिकॉप्टरद्वारे ते हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकाला जाणार होते.
पाऊस आणि कमी दृश्यमानता असल्यानं पंतप्रधानांनी 20 मिनिटं वातावरण स्वच्छ होण्याची वाट पाहिली. पण वातावरण स्वच्छ झालं नाही म्हणून अखेर त्यांनी, रस्ते मार्गे शहीद स्मारकापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. पंजाब पोलिसांच्या महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबात दुजोरा मिळाल्यानंतर मोदींचा ताफा रवाना झाला,'' असं त्यात म्हटलं होतं.
''हुसैनीवालापासून 30 किलोमीटर अंतरावर मोदींचा ताफा एका उड्डाणपुलावर पोहोचला तर काही आंदोलकांनी रस्ता रोखल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं पंतप्रधान 15 ते 20 मिनिटं या उड्डाण पुलावर अडकले होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी त्रुटी होती.''
पंतप्रधान मोदींचा ताफा रोखण्याच्या घटनेत सुरक्षेत गंभीर त्रुटी झाल्याचं, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा म्हणाले. तर पंतप्रधानांना फिरोजपूरच्या सभेत जाण्यास शेतकऱ्यांनी रोखल्याच्या घटनेवरून केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे.
''पंजाबच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना जाहीर करण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा आंदोलकांनी रस्त्यातच अडवला ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. ही सुरक्षेतील गंभीर चूक आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा आणखी खराब बनवला आहे," असं नेते म्हणाल्याचं एएनआयनं म्हटलं आहे.
 
काँग्रेसचं प्रत्युत्तर
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप नेत्यांच्या आरोपांना उत्तर दिलं.
त्यांनी म्हटलं की, "प्रिय नड्डा जी, सभा रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होतं. जर तुमचा विश्वास नसेल तर हे पाहा. वायफळ वक्तव्यं करण्यापेक्षा स्वतःच्या शेतकरी विरोधी मानसिकतेचा स्वीकार करून आत्मपरीक्षण करा. पंजाबच्या लोकांनी सभेपासून दूर राहात अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे."