1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (09:32 IST)

नरेंद्र मोदी भाषण : तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय

गेल्या वर्षी देशात लागू करण्यात आलेले तीन कृषि कायदे मागे घेणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते, पण तरी ते आम्ही त्यांना समजवू शकलो नाही, ही आमचीच चूक आहे, असं मोदी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या हितासाठीच तीन कृषि कायदे देशात आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठीच हा प्रयत्न होता. गेल्या कित्येक दिवसांपासून यासंदर्भात मागणी होती. अनेक संघटनांची ती मागणी होती.
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देशाच्या हिताच्या दृष्टीने हे कायदे असले तरी काही शेतकऱ्यांना आम्ही ते समजवू शकलो नाही.
आम्ही खुल्या अंतःकरणाने शेतकऱ्यांना समजावत राहिलो. सातत्याने चर्चा होत राहिली. पण आमच्याच प्रयत्नात काही कसर राहिली, त्यामुळे आम्ही आमचं म्हणणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकलो नाही.
आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांनी आता घरी निघून जावं. आता आपण पुन्हा नवी सुरुवात करू, असं मोदी म्हणाले.
 
नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
आज देवदिपावलीचा पावन पर्व तसंच गुरुनानक जयंतीचा पवित्र दिवस
सर्व नागरिकांना याचा शुभेच्छा.
दीड वर्षांच्या अंतरानंतर करतारपूर कॉरिडोर नुकताच उघडला, हे सुखावह आहे.
केंद्र सरकार नागरिकांचं जीवन सहज बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
गुरुनानक साहेब यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
गेल्या 50 वर्षांत मी शेतकऱ्यांच्या समस्या खूप जवळून पाहिल्या. त्यामुळेच सत्तेत आल्यापासून कृषि कल्याणाला प्रथम प्राधान्य दिलं.
देशातील 80 टक्के शेतकरी अल्पभूधारक. त्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. त्यांच्या संख्या 10 कोटींच्या आसपास आहे.
या छोट्या जमिनीच्या साहाय्यानेच ते त्यांची शेती करतात. पीढी-दरपीढी कुटुंब वाढेल तसं त्यांची शेती आणखी कमी होत जाते.
केंद्र सरकारने 22 कोटी सॉईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना दिले.
गेल्या चार वर्षांत 1 लाख कोटींपेक्षाही अधिक मदत शेतकरी बांधवांना मिळाली.
या सरकारच्या काळात गेल्या कित्येक वर्षांचा उत्पादनाचा विक्रम मोडला.
आज केंद्र सरकारचा कृषि बजेट आधीपेक्षा पाच पटींनी वाढला आहे. दरवर्षी सव्वा लाख कोटींपेक्षाही जास्त रुपये कृषि क्षेत्रावर खर्च केले जात आहेत.