शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जानेवारी 2022 (12:33 IST)

नरेंद्र मोदी घेणार मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक, देशात लॉकडाऊन लागणार की नाही याकडे लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना-ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यातील मुख्यमंत्र्याची आढावा बैठक घेणार आहेत.
 
या बैठकीत पंतप्रधान मोदी नेमका कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
आज दुपारी ही बैठक होईल. ओमिक्रॉन व्हेरियंट आल्यानंतर या विषाणूचा झपाट्याने प्रसार होत आहे. तेव्हा या प्रसाराला रोकण्यासाठी पंतप्रधान मोदी नेमकी कोणती पावलं उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 
देशातील आरोग्य व्यवस्थेवर तणाव पडत असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे, पाच राज्यातील निवडणुका समोर आहेत. या परिस्थितीमध्ये निर्बंध लावले जातील की नाही याबाबत देखील विचार या बैठकीत होऊ शकतो.
 
राज्यांमधील लसीकरणाची गती वाढावी, औषधांचा पुरवठा व्हावा याची मागणी राज्यांकडून केली जाऊ शकते. दोन वर्षांपूर्वी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनचा पर्याय निवडण्यात आला होता. यावेळी काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
 
19 राज्यांमध्ये 10 हजारहून अधिक ओमायक्रॉन करोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली होती.
 
भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या 2,47,417 नव्या केसेस समोर आल्या आहेत. गेल्या एका दिवसाच्या तुलनेत ही 27 टक्क्यांची वाढ आहे. एका दिवसात देशात कोरोनामुळे 380 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या 24 तासात 84,825 जण या आजारातून बरे देखील झाले आहेत.