NEET 2020 Result : नीट परीक्षेचा रिझल्ट आज, कसा आणि कुठे पाहाल निकाल
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) यूजी 2020 चा निकाल आज 16 ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राष्ट्रीय चाचणी एजन्सीला दिले होते. त्यानुसार आज या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्वीट करत देखील माहिती दिली होती. 12 ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टानं कोविड -19 किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबरला परीक्षेला हजर राहण्याची संधी द्या, असं म्हटलं होतं. तसंच या परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबरला घोषित करावा असंही कोर्टानं म्हटलं होतं.
कोविडमुळं परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी दिली एक संधी
सुप्रीम कोर्टानं 13 सप्टेंबर रोजी परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना 14 ऑक्टोबर रोजी एकदा परीक्षा देण्याचा निर्णय दिला होता. देशात नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी 3,843 परीक्षा केंद्रांवर आयोजित केली होती. जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. एकूण 15.97 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. मात्र काही विद्यार्थी कोरोना आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळं परीक्षा देऊ शकले नव्हते. त्यांना 14 ऑक्टोबर रोजी एक संधी दिली होती.
नीट 2020 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी हे करा
- सर्वात आधी अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर या
- यानंतर रिझल्ट असं लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारिख आणि सेक्युरिटी पिन टाकून सबमिट करा
- नंतर नीट 2020 रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेल.
- आपला रिझल्ट डाऊनलोड करा किंवा प्रिंट काढून घ्या.