पर्सन ऑफ द इयर यादीत मोदी आघाडीवर
अमेरिकेच्या प्रतिष्ठीत टाईम मासिकातर्फे दर वर्षी प्रसिद्ध केल्या जात असलेल्या पर्सन ऑफ द इयर स्पर्धेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर असल्याचे आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. यात मोदींनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन व विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे यांना मागे टाकले आहे. रिडर्स पोलनुसार मोदींना ११ टक्के. असांजेला ९, पुतीन व ट्रंप यांना ८ टक्के मते मिळाली आहेत तर बराक ओबामा व उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उंग यांना प्रत्येकी १ टक्के मते मिळाली आहेत.
अचानक नोटबंदी करून मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात जो लढा उभारला त्यामुळे त्यांची लोकप्रियता वेगाने वाढल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीच्या आठवड्यात मोदी या यादीत मागे होते मात्र त्यानंतर त्यांची लोकप्रियता वेगाने वाढली आहे. टाईम मासिकानेही नोटबंदी निर्णयाबाबत मोदींचे कौतुक करणारा लेख लिहिला आहे. या स्पर्धेसाठी मतदान करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर आहे व त्यानंतर ७ डिसेंबरला एडीटर्स तर्फे २०१६ पर्सन ऑफ द इयरची घोषणा केली जाईल. गतवर्षी हा मान जर्मनीच्या चॅन्सलर अजेंला मर्केल यांना मिळाला होता.