शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मार्च 2020 (10:48 IST)

मोदींच्या संबोधनपर भाषणातील काही महत्त्वाचे आणि ठळक मुद्दे

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता प्रशासनाकडूनही कमालीची सतर्कता बाळगण्यात येत आहे. सरकार कोरोनाशी लढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलत असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्राला संबोधित करत जनता कर्फ्यूची हाक दिली.  मोदींच्या याच संबोधनपर भाषणातील काही महत्त्वाचे आणि ठळक मुद्दे खालीलप्रमाणे..... 
 
*भारतावर कोरोनाच्या संकटाचा कोणताही परिणाम होणार नाही असा विचार करणं चुकीचं ठरेल. त्यामुळे आपल्याला संकल्प आणि संयम या दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. 
 
*आजच्या दिवशी हा संकल्प घ्यायला हवा की, स्वत:ला आणि इतरांनाही कोरोनाची लागण होण्यापासून दूर ठेवू. शिवाय गर्दीपासून दूर राहत आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवत स्वत:वर संयमही ठेवू. शक्य ते सर्व व्यवहार, कामं घरातून करण्यालाच प्राधान्य द्या. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना घरातून बाहेर पडू देऊ नका. 
 
*२२ मार्च हा दिवस देशात जनता कर्फ्यू पाळण्याचा. या दिवशी म्हणजेच रविवारी, सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सर्व देशवासियांना जनता कर्फ्यूचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे आत्मसंयम आणि देशहितार्थ कर्तव्याचं पालन सर्वांनीच करावं. 
 
*जनता कर्फ्यूच्याच दिवशी होम डिलवरी करणाऱ्यांपासून या संकटाच्या वेळी सक्रीय असणाऱ्या आणि प्रत्येक कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या कृतीला सलाम करायचा आहे. या राष्ट्ररक्षक व्यक्तींने आभार मानण्यासाठी सायंकाळी ठीक पाच वाजता घराच्या प्रवेशद्वारात किमान पाच मिनिटं उभं राहून या व्यक्तींसाठी टाळ्या वाजवाव्यात, त्यांच्या कामाला दुजोरा द्यावा. स्थानिक प्रशासनाने सायरन वाजवून याविषयीची सूचना नागरिकांपर्यंत पोहोचवावी अशी विनंती मोदींनी केली.
 
*रुग्णालयांवरील ताण वाढू देऊ नका. रुटीन चेकअपसाठी सध्या रुग्णालयात जाणं टाळा. गरज वाटल्यास डॉक्टरांशी फोनवरच संपर्क साधा.  शस्त्रक्रीयांची तारीख पुढे ढकला. 
 
*अर्थव्यवस्थेवरही या परिस्थितीचा ताण पडणार आहे. त्यासाठीही अर्थमंत्री आणि इतर जबाबदार मंडळींच्या साथीने भविष्यातील उपाययोजना राबवल्या जातील.
 
*मध्यवर्गापासून गरीब वर्गापर्यंत सर्वांनाच कोरोनाची झळ पोहोचली आहे. य़ामध्ये तुमच्या हाताखाली, तुमच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करा. कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करु नका. त्यांच्यापुढेही कौटुंबीक जबाबदाऱ्या आहेत हे लक्षात घ्या.
 
*कोरोनाचं संकट असतेवेळी जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा थांबणार नाही. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टींच्या साठवणुकीवर भर देऊ नका. पूर्वीप्रमाणेच हे चक्र चालू द्या . 
 
*संकट इतकं गंभीर आहे की एक देशही दुसऱ्या देशाला मदत करु शकत नाही. तेव्हा सर्व सामर्थ्य स्वत:ला कोरोनापासून वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याच्या कार्यासाठी उपयोगात आणा. 
 
*चला आपणही वाचूया, देश वाचवूया आणि हे जग वाचवूया.