महाविद्यालये विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रे स्व: ताकडे ठेवणार नाही
यापुढे महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रं स्वत:कडे ठेवता येणार नाहीत. मनुष्यबळ विकास मंत्रालयानं याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बदलल्यास त्यांना शुल्कदेखील परत मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
आतापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना महाविद्यालयांकडून त्यांची मूळ प्रमाणपत्रं घेतली जायची. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यावर ही प्रमाणपत्रं महाविद्यालयाकडे जमा करावी लागायची. मात्र यापुढे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना स्वयं साक्षांकित (सेल्फ अटेस्टेड सर्टिफिकेट) प्रमाणपत्रं द्यावी लागतील. ही प्रमाणपत्रं महाविद्यालयांकडून मूळ सोबत पडताळून पाहिली जातील. यानंतर महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्रं परत करावी लागतील. मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे यासंबंधी अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जावडेकर यांनी दिली.