मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (18:23 IST)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. त्यांना आर्मी रुग्णालयात व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची आज प्राणज्योत मालवली.
 
प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “जड अंतकरणाने मी आपणास सांगू इच्छितो की डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न, देशभरातून करण्यात आलेल्या प्रार्थना यानंतरही माझे वडील प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे.”.
 
सोमवारी सकाळी रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. 
 
१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. त्यानंतर ते कोमात गेले आहेत असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं होतं.
 
माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगला येथील बिरभूम येथे झाला. पाच दशकांहून अधिक त्यांची राजकीय कारकिर्द आहे. प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपती पद भूषवलं होतं. प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. 
 
भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर 8 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
 
मुखर्जी यांनी परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, वाणिज्य मंत्री आणि अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. इतिहास, राज्यशास्त्र, कायदा या क्षेत्रातलं पद्व्युत्तर शिक्षण घेतलं असून इंदिरा गांधी यांच्या काळात प्रणव मुखर्जी अनेक महत्वाच्या पदावर होते. प्रणव मुखर्जी यांचं आत्मचरित्र खूप गाजलं होतं. 
 
काही राजकीय कारणांमुळे जेव्हा त्यांना पक्षातून थोडंसं बाजूला करण्यात आलं तेव्हा त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही स्थापन केला होता. मात्र 1989 नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला.