पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वर्षांनी आईची भेट घेतली, आईसह जेवण केले
उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील निवडणूक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री आई हिराबेन यांची भेट घेतली. पंतप्रधान सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान तब्बल दोन वर्षानंतर आपल्या आईला भेटले. त्यांनी आईचे पायापडून त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर त्यांच्या सह जेवण केले. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री मोदीजींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या घरी असतात.
वृत्तानुसार,अहमदाबादमधील रोड-शोसह दिवसभराचे सर्व कार्यक्रम संपवून पंतप्रधान मोदी शुक्रवारी त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले. गांधीनगरच्या बाहेरील रायसन येथील वृंदावन सोसायटीत त्यांच्या भावाचे घर आहे.
पीएम मोदी ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांच्या आईला भेटले होते. नंतर व्यस्ततेमुळे ते आईला भेटू शकले नाही. अशा परिस्थितीत ते दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आले असता त्यांनी आई हिराबेन यांना भेटण्यासाठीही वेळ काढला. याआधी, रोड-शो संपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पंचायत सदस्य आणि नंतर भाजप कार्यालयातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आणि केंद्राच्या योजनांची जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.