गायकवाड यांना एअर इंडियासह खासगी कंपन्याकडून बंदी
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला गुरुवारी सँडलने मारहाण करणारे शिवसेनेचे खा. रवींद्र गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यासाठी एअर इंडिया तसेच चार खासगी कंपन्यांनी बंदी घातली आहे. ही बंदी उठेपर्यंत खा. गायकवाड यांना विमानाने प्रवासच करता येणार नाही. त्यामुळे कोणत्याच कंपनीच्या विमानाने परतणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर खा. गायकवाड यांनी दिल्लीहून रेल्वेने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. ते शनिवारी सकाळी मुंबईत पोहोचल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. खा. गायकवाड यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे. एअर इंडिया आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करण्यात आला.