सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 23 जानेवारी 2023 (15:38 IST)

पंतप्रधानांकडून शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा

balasaheb thackeray
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास ट्विट केले आहे. त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि अमोघ वकृत्त्वाची देणगी लाभली होती. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले होते, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक आज दादर येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर गर्दी करतील. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही याठिकाणी येतील.
 
त्यानंतर संध्याकाळी षणमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. यावेळी ते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत. सेंट्रल हॉलमधील बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. या सोहळ्याला राज ठाकरे आणि निहार ठाकरे उपस्थित राहतील.
 
नीडर नेत्याला माझे नमन: राजनाथ
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नीडर नेता असा उल्लेख करत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. 'देशातील सर्वात नीडर नेत्यांपैकी एक बाळासाहेब होते. जयंतीनिमित्त मी त्यांचे स्मरण करतो आणि त्यांना नमन करतो. राष्ट्र आणि समाजाच्या हिताच्या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच सडेतोड भूमिका मांडली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली', अशा शब्दांत राजनाथ यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. केंद्रीय मंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केले. 'हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी सादर नमन', असे ट्वीट गडकरी यांनी केले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली
 
.Edited By- Ratnadeep Ranshoor