1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:07 IST)

देशाच्या विकासाठी रेवडी संस्कृती घातक- मोदी

आपल्या देशात 'रेवडी' वाटून मते मागण्याची संस्कृती रुजत असून ती देशाच्या विकासासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मते मिळवण्यासाठी मतदारांना खूश करणाऱ्या मोफत सेवासुविधा देण्याच्या राजकारणावर टीका केली.
 
नागरिकांनी विशेषत: तरुणांनी रेवडी संस्कृतीपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
उत्तर प्रदेशातल्या जालौन जिल्ह्यातील ओराई तालुक्यात सुमारे 14 हजार 850 कोटी खर्चून बांधलेल्या 296 किलोमीटरच्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाच्या उद्घाटनानंतर एका जाहीर सभेत मोदी यांनी, मतांसाठी जनतेला मोफत सेवा, वस्तू वाटप करणाऱ्या राजकीय पक्षांना टीकेचे लक्ष्य केले.
 
'रेवडी संस्कृती'चे लोक नवे द्रुतगती महामार्ग, नवे विमानतळ किंवा संरक्षण 'कॉरिडॉर' कधीच बांधणार नाहीत. मात्र, 'रेवडी' वाटून लोकांना विकत घेतील. आपण सर्वानी अशा विचारसरणीला पराभूत करून राजकारणातून 'रेवडी संस्कृती'ला हटवायचे आहे, असे मोदी म्हणाले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.