शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (07:21 IST)

कोरोनाची दुसरी लाट वेळीच रोखायला हवी : पंतप्रधान

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ व्हायला लागली आहे. या कोरोनाच्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणाची स्थिती या विषयावर त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला वेळेत रोखणे गरजेचे आहे. कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरातील कोरोनाविरोधातील लढाईचे यश बेजबाबदारीत बदलले गेले नाही पाहिजे. टेस्टिंग आणि ट्रेसिंग वेळेत होणे गरजेचे आहे. अनेक राज्यांमध्ये रॅपिड टेस्टवर जोर दिला जात आहे. मात्र आरटीपीसीआर टेस्ट 80 टक्क्यांच्यावर ठेवायला हव्यात, असे त्यांनी सांगितले.
 
अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून
यावेळी टियर-2 आणि टियर-3 शहरात देखील कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. यापूर्वी या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त झाला नव्हता. मात्र जर कोरोना ग्रामीण भागात पसरला तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसेल. छोट्या शहरांमध्ये कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आदी राज्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक राज्यांमध्ये लसी वापराविना पडून आहेत, याबाबत नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. कोरोना लस वाया जाण्याची समस्या गंभीर आहे. ती सुधारायला हवी. तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये कोरोना लस वाया जाण्याचं प्रमाण 10 टक्के आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण जवळपास तेवढेच आहे, असे मोदींनी म्हटले आहे.
 
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णायक पावलं उचलावी लागतील
कोरोनाच्या लढाईला एक वर्षाहून अधिकचा काळ झाला आहे. भारतीय नागरिकांनी कोरोनाचा जसा सामना केला, ते एक उदाहरण बनले आहे, त्याची प्रशंसाही झाली. आज देशात 96 टक्के लोक कोरोनामुक्त झाले आहेत. काही राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील 70 जिल्ह्यात ही वाढ 150 टक्क्यांपर्यंत आहे. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेला वेळीच रोखले पाहिजे. यासाठी आपल्याला निर्णायक पावले उचलावी लागतील, असे त्यांनी म्हटले आहे.
 
पाच राज्यांमध्ये 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात या राज्यांमधून 79.73 टक्के नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 24,492 नवीन रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात 15,051 इतक्या सर्वाधिक संख्येने नवे रुग्ण आढळले आहेत.  त्यापाठोपाठ पंजाबमध्ये 1,818 तर केरळमध्ये  1,054  नवीन रुग्ण आढळले आहेत.
 
आता आपल्याला अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता
मोदी म्हणाले, आपल्याला भीतीचे वातावरण नाही निर्माण करायचे. मात्र काही दक्षता बाळगून काही बाबतीत पुढाकार घेऊन, आपल्याला जनेतला संकटातून बाहेर देखील काढायचे आहे. आपल्या जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत व चांगले प्रयोग आहेत. अनेक राज्य अन्य राज्यांकडून नवनवीन प्रयोग शिकत आहेत. आता आपल्याला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे  तसेच जिथे आवश्यक आहे आणि हे मी आग्रहाने सांगतो, की मायक्रो कंटेंन्मेंट झोन बनवण्याच्या पर्यायात कोणत्याही परिस्थितीत हयगय होता कामा नये. यावर काम झाले पाहिजे. या शिवाय कोरोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावे.
 
संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना कमीत कमी वेळात शोधून काढणे आणि आरटीपीसीआर टेस्ट 70 टक्क्यांपेक्षा अधिक ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. देशातील सर्व राज्यांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे, असंही मोदी म्हणाले.