आर्यन खानचे एनसीबीनं कौन्सिलिंग केल्याचे पुरावे दाखवा : नवाब मलिक
आर्यन खानवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवरून नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. एनसीबीची कारवाई म्हणजे सगळा बनाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे एनसीबीकडून देखील सातत्याने कारवाई योग्य आणि नियमाला धरूनच असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एनसीबीकडून आर्यन खानचं समुपदेशन केलं जात असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट एनसीबीवरच प्रतिहल्ला करत यावर सवाल उपस्थित केले आहेत.
एनसीबीनं कौन्सिलिंग केल्याचे पुरावे दाखवण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. “इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्या एनसीबीच्या अधिकार्यांनी आर्यन खानचं कौन्सिलिंग कधी केलं ते सांगावं आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. दरम्यान, आर्यन खानचं समुपदेशन करण्यासाठी एनसीबीचे अधिकारी तुरुंगात गेले होते का? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग जेलमध्ये करायला गेले होते का? अशी विचारणा करतानाच “देशातील मोठे वकील हरीश सालवे बोलत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यामुळे आता अशा पॉझिटिव्ह गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत”, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.