सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (11:28 IST)

बंद घरात कुटुंबातील 5 जणांचे सांगाडे सापडले, 'ते' पत्र काय संकेत देतं?

crime
कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील उपनगरीय भागात एका निवृत्त कार्यकारी अभियंत्याच्या घरात पाच मानवी सांगाडे सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचं आणि धक्क्याचं वातावरण पसरलं आहे.
 
आतापर्यंतच्या पोलीस तपासात असं समोर आलं की, ज्या कुटुंबाबत हे घडलं, ते कुटुंब नातेवाईकांपासूनही काहीसे अंतर राखून राहत असत.
 
जगन्नाथ रेड्डी (85 वर्षे), त्यांची पत्नी प्रेमा (80 वर्षे), मुलगी त्रिवेणी (62 वर्षे) आणि दोन मुलं कृष्णा (60 वर्षे) आणि नरेंद्र (57 वर्षे) असं हे दुर्दैवी कुटुंब होतं.
 
हे कुटुंब इतर लोकांपासून इतके अलिप्त राहत होतं की, त्यांचं घर 2019 च्या जून-जुलै महिन्यापासून बंद होतं. तरी कुणालाही शंका आली नाही.
मात्र, दोन दिवसांपूर्वी काही जणांनी घराचा मुख्य दरवाजा उघडा पाहिल्यानंतर कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.
 
पोलिसांनी घटनास्थळावरुन कुटुंबातील पाचही जणांचे सांगाडे बाहेर काढले आहेत.
 
पोलिसांनी काय सांगितलं?
चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक धर्मेंद्र कुमार मीणा यांनी बीबीसी हिंदीला या प्रकरणाची माहिती देताना सांगितली की, जगन्नाथ रेड्डी यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, हे कुटुंब एका आश्रमात जाण्याचा विचार करत होतं.
 
त्यामुळे बराच काळ घर बंद पाहून लोकांना असं वाटलं की ते आश्रमात गेले असावेत.
 
या कुटुंबानं एका खटल्यासंदर्भात ज्या वकिलांची सेवा घेतली होती, त्यांचंही हेच म्हणणं आहे.
मात्र, या कुटुंबाला शेवटचं कधी कुणी पाहिलं का, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
 
रेड्डी कुटुंब मोठ्या घरात राहत होतं.
 
या घराच्या आजूबाजूला फार कमी शेजारी राहतात. कारण नव्यानं उभारलेला उपनगरीय भाग आहे. गेल्या दोन वर्षांत इथं काही घरं बांधण्यात आली. त्यांच्या घरापासून जवळचं घर किमान 100 फूट अंतरावर आहे
 
या घराच्या पलीकडे एक घर आहे. पण या कुटुंबातील लोकही रेड्डी कुटुंबाप्रती उदासीन राहिले. कारण रेड्डी कुटुंबानं त्यांच्यापासून अंतर ठेवलं होतं. कोणी दार ठोठावलं तरी ते बाहेर पडत नसत. ते फक्त खिडकीतूनच बोलायचे.
 
या घराच्या आजूबाजूच्या लोकांनी परिसरात दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी याआधी केल्या होत्या. मात्र पोलिसांनी फारसं लक्ष दिलं नाही.
घर बंद असल्यानं पोलिसांनाही फार काही कळलं नाही. त्यांचा बाहेरचा गेट बंद होता. या घराचा दोन महिन्यांपूर्वी गेट तुटला असून, दोन दिवसांपूर्वी घराचा दरवाजाही तुटलेला दिसून आल्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली.
 
पोलीस तपासादरम्यान घरातून कागदपत्रं सापडली. अनेक रुग्णालयांचे मेडिकल रिपोर्ट यात सापडले आहेत.
 
हे रिपोर्ट बंगळुरू आणि इतर रुग्णालयातील उपचारांचे आहेत. निम्हन्स हॉस्पिटलचा एक रिपोर्ट हाती लागला, ज्यामध्ये जगन्नाथ रेड्डी यांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचा आजार असल्याचं स्पष्ट होत.
 
मुलीला स्पॉन्डिलायटिसचा (मणक्याचा आजार) त्रास होता, तर कृष्णा हे लठ्ठपणा आणि हृदयविकारानं त्रस्त होते. धाकट्या नरेंद्रच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल फारसं काही सापडलं नाही.
 
पोलीस अधिकारी मीणा यांनी सांगितलं की, वैद्यकीय रेकॉर्ड सरकारी डॉक्टरांकडून तपासत आहोत.
 
'ते' पत्र काय संकेत देतं?
एका पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी हिंदीला सांगितलं की, कन्नडमध्ये लिहिलेली एक चिठ्ठी देखील सापडली आहे, ज्यातून संकेत मिळतात की कुटुंब काही टोकाचं पाऊल उचलू शकतं, पण त्यावर तारीख किंवा स्वाक्षरी नव्हती.
 
पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं की, हे कुटुंबातील कोणत्या सदस्यानं लिहिलं आहे हे कळू शकलेलं नाही.
 
या कुटुंबातील जवळच्या नातेवाईकानं पोलिसांना सांगितलं की, रेड्डी कुटुंबातील सदस्य त्यांच्या आजारपणामुळे त्रस्त असतील किंवा आपल्या मुलीचं लग्न होत नाही, या काळजीनं त्यांनी हे पाऊल उचललं असावं.
 
एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, सध्या मिळालेल्या पुराव्यांवरून असं दिसतं की, या घरात अनेकदा तोडफोड झाली असावी.
 
पोलिसांनी आत प्रवेश केला असता त्यांना एकाच बेडवर आई आणि मुलीचे सांगाडे पडलेले दिसले. एकाच खोलीच्या मजल्यावर वडील आणि मुलाचे सांगाडे सापडले. लहान मुलाचा मृतदेह दुसऱ्या खोलीत दिसला.
 
सर्व मानवी सांगाडे तपासणीसाठी फोरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
 
पोलीस अधिकारी मीणा म्हणाले, "दोन आठवड्यात तपास अहवाल मिळेल, अशी आशा आहे."
 
Published By- Priya Dixit