राज्याचे शिक्षणमंत्री बोगस म्हणून शिक्षणाचे वाटोळे झाले.. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका
शिक्षण विभागाने महाराष्ट्र बोर्डाच्या १० वीच्या विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत गुण दिले नसल्यामुळे यंदाचा राज्यातील १० वीचा निकाल कमी लागला. त्यामुळे प्रवेशावेळी राज्यातील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री बोगस असल्यामुळे राज्यातील शिक्षणाचे वाटोळे झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. जोपर्यंत अशा लोकांच्या हातात कारभार असेल तोपर्यंत राज्याची परिस्थिती सुधारणार नाही, असेही ते म्हणाले.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची सरकारकडून मुस्कटदाबी
मोदी सरकारच्या कार्यकाळात पत्रकारांवर दबाव आणून बातम्या दाबल्या जातात. जे पत्रकार धाडस करून सरकारचा भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून वा मारहाण करून सरकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला धोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक करण्यात आली. तर आज रेल्वेतील भ्रष्टाचाराचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला जी.आर.पी.एफ.च्या जवानांनी मारहाण केली. पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले असल्याने आधीच योगी आदित्यनाथ यांच्यावर नामुष्की ओढवली आहे. आता भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी तरी सरकारची निभावावी, असे मत मलिक यांनी मांडले.