गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जून 2024 (10:59 IST)

अयोध्येत भाजपला पराभूत करणारे दलित नेते अवधेश प्रसाद यांचा 'असा' आहे प्रवास

Awdhesh Prasad
Awdhesh Prasad
उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर, देशभर राम मंदिराची चर्चा सुरु होती. मात्र, अयोध्या जिथे आहे त्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव करणाऱ्या 79 वर्षीय दलित नेते अवधेश प्रसाद यांची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.
 
बहुतांश लोकांना अयोध्येत भाजपचा पराभव कसा झाला, हेच कळत नाहीये. भाजप समर्थकांना या पराभवाचा धक्का बसला आहे. अयोध्येत राहणाऱ्यांना मात्र या पराभवाची कारणं ठाऊक आहेत.
 
फैजाबाद लोकसभा मतदारसंघातल्या मिल्कीपूरचे विद्यमान आमदार अवधेश कुमार यांचं राजकारण माहीत असलेल्या लोकांना मात्र अयोध्येत मोठी उलथापालथ होऊ शकते, याचा अंदाज आला होता.
 
भाजपचे उमेदवार लल्लू सिंग यांच्याबद्दल असणारी नाराजी आणि स्थानिक मुद्द्यांकडे भाजपने केलेलं दुर्लक्ष या कारणांमुळेच भाजपचा पराभव झाल्याचं अनेकांना वाटतं.
 
अवधेश प्रसाद यांच्या तळागाळाशी जोडलेल्या राजकारणामुळे त्यांनी भाजपला हरवलं, असं मत असणारे अनेकजण अयोध्येत आहेत.
उत्तर प्रदेशातल्या 'पूर्वांचल एक्सप्रेस-वे'वर आम्ही अवधेश प्रसाद यांना भेटलो. त्यावेळी ते मिल्कीपूर विधानसभा क्षेत्रातील एका गावातल्या लग्नातून परत येत होते.
 
अवधेश प्रसाद म्हणतात की, "एका गरीब कुटुंबातील मुलीचं लग्न होतं. त्यामुळे मी कितीही व्यस्त असलो, कुठेही असलो तरी त्या लग्नाला येण्याचं वचन मी मुलीच्या बापाला दिलं होतं आणि मी दिलेला शब्द पाळला. माझ्या मतदारसंघातील लोकांना दिलेलं प्रत्येक आश्वासन मी पूर्ण केलं आहे."
 
तब्बल 9 वेळा आमदार आणि 6 वेळा मंत्री
79 वर्षांचे अवधेश प्रसाद अजूनही दमदार पावले टाकून चालतात. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे कठीण आहे. त्यांच्यासोबत असलेले बहुतांश कार्यकर्ते तरुण आहेत.
 
डोक्यावर लाल टोपी, गळ्यात लाल स्कार्फ आणि पांढऱ्या कुर्तीखाली धोतर परिधान केलेले अवधेश प्रसाद दुरून मुलायमसिंह यादव यांच्यासारखे दिसतात.
 
अवधेश प्रसाद त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत तब्बल नऊ वेळा आमदार आणि सहा वेळा मंत्री राहिले आहेत. पण राजकारणात ते काही अचानक आले नाहीत. ते ठरवून राजकारणात आले होते.
त्यांच्या लहानपणीच एक किस्सा सांगताना अवधेश म्हणतात की, "दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजची फी माफ व्हावी म्हणून आमच्या खासदारांची स्वाक्षरी घ्यायला मी त्यांच्याकडे गेले होतो. तिथे गेल्यानंतर खासदारांनी मला अपमानास्पद वागणूक दिली."
 
अवधेश प्रसाद पुढे म्हणतात की, "त्यावेळी मी तरुण होतो, खासदारांनी केलेल्या अपमानामुळे मला राग आला होता. मी तिथेच खाली बसलो, एक कागद घेतला आणि त्यावर लिहिलं - 'अवधेश प्रसाद -एलएलबी, वकील, आमदार, खासदार-गृहमंत्री.' त्यादिवशी तिथे बसून मी जे काही ठरवलं होतं ते सगळं मिळवलं, त्यातलं एक पद अजूनही बाकी आहे."
 
31जुलै 1945 रोजी उत्तर प्रदेशातल्या सुरवारी गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये अवधेश प्रसाद यांचा जन्म झाला. लखनौ विद्यापीठातून त्यांनी एलएलबी केलं आहे आणि कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमधून त्यांनी एम. ए. केलं आहे.
 
बी. ए. आणि एम. ए. पूर्ण केल्यानंतर 1968मध्ये अवधेश प्रसाद यांनी कायद्याची पदवी मिळवली.
 
राजकारणात प्रवेश
अवधेश प्रसाद सांगतात की, "एलएलबीचा शेवटचा पेपर दिल्यानंतर मी थेट फैजाबादच्या कोर्टात गेलो. तिथे सरकार विरुद्धचं एक प्रकरण माझ्याकडे आलं. मी माझ्या अशिलांना सांगितलं की मला अजूनही पदवी मिळालेली नाही. पण त्यांनी त्यांच्यातर्फे मीच हा खटला लढावा असा आग्रह केला."
 
"माझ्या अशिलांनी मला त्यावेळी फी म्हणून 12 रुपये दिले होते. मला तोपर्यंत पदवी मिळाली नव्हती म्हणून मग मी ते बारा रुपये घेऊन एका मोठ्या वकिलांकडे गेलो आणि त्यांना कोर्टात खटला दाखल करायला लावला. त्यांनी त्यांच्या कारकुनाला दोन रुपये दिले आणि मी नको म्हणत असतानाही राहिलेले दहा रुपये मला परत केले. कायद्याचं शिक्षण घेऊन झालेली ती माझी पहिली कमाई होती."
 
अवधेश प्रसाद सांगतात की राजकारणात येण्याचं त्यांनी आधीच ठरवलं होतं आणि म्हणूनच शिक्षण सुरु असतानाच ते राजकारणातही सक्रिय होते.
 
1968 मध्ये त्यांनी एकीकडे वकिलीची सुरुवात केली आणि त्यासोबतच राजकारणही सुरु होतं.
 
1974 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि 324 मतांनी त्यांचा पराभव झाला. पुढच्या काही वर्षांत देशात आणीबाणी लागू झाली.
 
लोकनायक जयप्रकाश यांनी आणीबाणीच्या विरोधात आंदोलन सुरू केले. अवधेश प्रसादही त्यात सामील झाले.
 
आणीबाणीच्या काळात देशातील बड्या नेत्यांना अटक झाली होती. या काळात अवधेश प्रसाद लखनौ आणि फैजाबादच्या तुरुंगातही होते.
आणीबाणीच्या काळात अवधेश प्रसाद तुरुंगात असताना त्यांच्या आईचे निधन झाले. आईची आठवण निघाल्यावर त्यांना गहिवरून आलं.
 
अवधेश प्रसाद म्हणाले की, "माझ्या आईचा मृतदेह चार दिवस तिथे पडून होता, पण मी तिला शेवटचं पाहू शकलो नाही. मला माझ्या वडिलांचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. अमेठीत संजय गांधी विरुद्ध शरद यादव यांच्या निवडणुका होत होत्या. चौधरी चरणसिंग यांनी आम्हाला आमच्या गावी न जाण्यास सांगितलं होतं, याच काळात माझे वडील वारले. मी मतमोजणी केंद्रावर एजंट होतो, त्यावेळी मतपत्रिकेद्वारे मतदान व्हायचं, सहा-सात दिवस मतमोजणी सुरू राहिली, मतमोजणीच्या एक दिवस आधी माझे वडील वारले पण मला तिकडे जाता आलं नाही."
 
अवधेश प्रसाद सांगतात की, त्यांनी राजकारण आणि वकिली एकाच वेळी सुरू ठेवली.
 
1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर ते नऊ वेळा आमदार झाले.
 
अयोध्येत भाजपचा पराभव केल्यानं राजकीय उंची वाढली?
अयोध्येतील आश्चर्यकारक विजयानंतर अवधेश प्रसाद यांची राजकीय उंची वाढली आहे.
 
अवधेश प्रसाद अत्यंत शांतपणे म्हणतात की, त्यांच्यापुढे कुणीही उमेदवार म्हणून उभं राहिलं असता तरी त्यांनी त्याचा पराभव केला असता.
 
अवधेश प्रसाद यांनी दावा केला की अखिलेश यादव यांनी आधीपासूनच त्यांना आयोध्येतून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचं ठरवलं होतं.
 
अवधेश प्रसाद म्हणतात, "अखिलेश यादव यांनी ऑक्टोबरमध्येच मला सांगितलं होतं की आमदार साहेब तुम्हाला मी मोठा माणूस बनवणार आहे, तुम्ही बघाल की बीबीसी लंडनही तुमची मुलाखत घ्यायला येईल. पण त्यावेळी ते हे म्हणाले नव्हते की ते मला आयोध्येतून तिकीट देतील."
 
अवधेश प्रसाद म्हणतात की, "हा माझा नाही तर अयोध्येच्या महान लोकांचा विजय आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आयोध्येतून उभे राहिले असते तरी त्यांचा पराभव निश्चित होता. कारण लोकांनी अहंकाराच्या राजकारणाचा पराभव करण्याचा निश्चय केला होता."
फैजाबादमध्ये भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांना चार लाख 99 हजारांहून अधिक मते मिळाली असून त्यांना अयोध्या विधानसभा मतदारसंघातून चार हजारांची आघाडीही मिळाली आहे.
 
मात्र, या निवडणुकीत त्यांचा 54 हजार मतांनी पराभव झाला.
 
असं असलं तरी भाजपचं इथे आव्हानच उभं राहिलं नाही अशी परिस्थिती नव्हती.
 
अवधेश प्रसाद म्हणतात की, "लल्लू सिंह हे माझ्या विरोधातले उमेदवार नव्हतेच.स्वतः नरेंद्र मोदी माझ्या विरोधात लढत होते असं मला वाटतं, कारण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अनेकदा इथे आले, पंतप्रधान मोदींनी एक मोठा रोड-शो केला, एवढंच काय राष्ट्रपतींचा एक कार्यक्रम इथे ठेवण्यात आला. भाजप संपूर्ण ताकदीनिशी अयोध्येत निवडणूक लढवत होता."
 
अवधेश प्रसाद महागाई, बेरोजगारी आणि पेपरफुटी यांसारख्या मुद्द्यांमुळे त्यांचा विजय झाल्याचे सांगतात.
 
"प्रत्येक गावात लोक त्रस्त आहेत, पण त्यांचे कोणीही ऐकत नाही. फक्त तेच लोक भाजपच्या पराभवाने आश्चर्यचकित झाले आहेत ज्यांना जमिनीवर काय सुरु आहे हे माहीत नाही," असं अवधेश प्रसाद सांगतात.
 
अवधेश प्रसाद म्हणतात की, "मी माझ्या आयुष्यात 11 निवडणुका लढवल्या आहेत. ही माझी पहिलीच निवडणूक होती, जी जनतेने हातात घेतली होती."
 
79 वर्षांच्या अवधेश प्रसाद यांना वाटतं की त्यांना राजकारणात त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
 
अवधेश म्हणतात ली, "आम्हाला राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर, लोहिया, चौधरी चरणसिंग यांच्या स्वप्नांचा देश बनवायचा आहे. आज देशात महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी आहे. हे उद्दिष्ट जोपर्यंत साध्य होत नाही, जोपर्यंत माझा श्वास चालत राहील, तोपर्यंत मी राजकारणात सक्रिय राहीन."
 
Published By- Priya Dixit