1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2024
  3. लोकसभा निवडणूक 2024 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (13:17 IST)

जे अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात जमलं, ते तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये का जमलं नाही?

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी त्यांच्या निवडणूक सभांमध्ये 'ए टू झेड'चं समीकरण मांडलं होतं.
 
लालूप्रसाद यादवांनी जे 'एम-वाय' (माय) म्हणजेच मुस्लिम-यादव समीकरण मांडलं होतं, त्यातून बाहेर पडून सर्व वर्गातील लोकांचा समर्थन मिळवण्याचा प्रयत्न तेजस्वी यादवांनी केल्याचं दिसलं.
 
तेजस्वी त्यांच्या पक्षाला 'माय बाप' (बीएएपी) म्हणत, म्हणजेच बहुजन, आगडा, अर्धी लोकसंख्या (महिला) आणि पुअर (गरीब) म्हणूनही ओळखलं गेलं.
 
तसंच, राजदने मोठ्या संख्येने कुशवाह उमेदवारांना तिकीट देऊन नितीश यांच्या 'लव-कुश' व्होटबँकमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.
 
तेजस्वी यांनी आपल्या भाषणात बिहारमध्ये महागाई आणि रोजगार हे निवडणुकीतील मोठे मुद्दे असल्याचं सांगितलं. आपल्या भाषणांमध्ये ते 'चुपचाप लालटेन छाप' असं म्हणत मत मागत होते.
 
रोजगार आणि महागाई याशिवाय विरोधी पक्षांनी जात जनगणना, संविधान आणि आरक्षण या मुद्द्यांना हात घालत हे मुद्दे मोठे करण्याचा प्रयत्न केला. तेजस्वी यादव यांनी निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीलाच हे मुद्दे उपस्थित केले होते.
 
डझनभर निवडणूक सभांनंतरही या लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांना कोणतंही मोठं यश मिळवता आलेलं नाही, तर बिहारच्या शेजारील राज्य उत्तरप्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी भाजपला मोठा धक्का देण्यात यश मिळवलं.
 
अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने यूपीमध्ये 62 जागांवर उमेदवार उभे केले आणि 37 जागा जिंकल्या. तर काँग्रेसने 17 पैकी सहा जागा जिंकल्या. पण असाच करिश्मा बिहारमध्ये तेजस्वी यादवांना करता आला नाही.
 
40 लोकसभेच्या जागा असलेल्या बिहारच्या निवडणूक निकालांवर नजर टाकली तर विरोधी पक्षांना फक्त 9 जागा मिळाल्या आहेत, तर पूर्णिया जागेवरून अपक्ष उमेदवार म्हणून पप्पू यादव विजयी झाले .
 
पटणाच्या एएन सिन्हा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजचे माजी संचालक डीएम दिवाकर यांच्या मते, नितीश कुमार भाजपसोबत असूनही वेगळे दिसत होते. त्यांनी आपली समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रतिमा राखण्यात यश मिळवलं.
 
डी एम दिवाकर म्हणतात, "तेजस्वी यांच्या सुमार कामगिरीचं पहिलं कारण म्हणजे नितीश कुमार यांची ईबीसी आणि महिला व्होट बँकेवर असलेली पकड. कोणासोबतही राहून बिहारचा विकास करता येईल, अशी प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत."
 
विरोधी आघाडी
बिहारमध्ये, राजद नेते तेजस्वी यादव यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व केले आणि संपूर्ण विरोधकांचा एकहाती प्रचार केला.
 
तेजस्वी यादव यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान शेवटच्या क्षणी व्हीआयपी मुकेश साहनी यांना इंडिया आघाडीत सामील केले. साहनी समाजाच्या मतदारांची मतं मिळवण्यासाठी तेजस्वी यांनी मुकेश साहनी यांना राजद कोट्यातून लोकसभेच्या तीन जागा दिल्या होत्या.
 
त्यानंतर हे दोन्ही नेते निवडणुकीच्या मंचावर एकत्र दिसले. मुकेश साहनी यांच्याशी झालेला करार तेजस्वी यांच्यासाठी फारसा फायदेशीर ठरला नाही, हे निवडणूक निकालांवरून दिसून येतं.
 
साहनी आपल्या उमेदवारांना विजयी करू शकले नाहीत किंवा आपल्या प्रभावाखालील भागात विरोधकांना मोठा फायदा करून देऊ शकले नाहीत.
 
नितीशकुमार यांनी महाआघाडी सोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी राज्यभर दौरा केला होता.
 
त्यांच्या सभांना तरुणांची मोठी गर्दीही दिसून आली. असं असतानाही तेजस्वी यादव यांच्या पक्षाला बिहारमध्ये तितकंस यश मिळवता आलं नाही.
 
मात्र, 2019 च्या तुलनेत या निवडणुकीत विरोधकांना मोठा विजय मिळाला. 2019 मध्ये एनडीएने एकतर्फी विजय मिळवला होता आणि राज्यातील 40 पैकी 39 जागा जिंकल्या होत्या.
 
2019 च्या निवडणुकीत भाजपला राज्यात 24 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आणि त्यांनी 17 जागा जिंकल्या, तर त्या वर्षी जेडीयूला 22 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आणि त्यांनी 16 जागा जिंकल्या होत्या.
 
आकडेवारी काय सांगते?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला बिहारमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती आणि त्यांना फक्त 15% मतं मिळाली होती.
 
पण या निवडणुकीत राजदला चार जागा जिंकण्यात यश आलं आणि त्यांना 22% पेक्षा जास्त मतं मिळाली आहेत.
 
मात्र, या मतांचं जागांमध्ये रूपांतर करण्यात तेजस्वी यादव पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाहीत. बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांपैकी राजदने सर्वाधिक 23 जागा लढवल्या होत्या.
 
इतकंच नाही तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 9 जागांवर निवडणूक लढवून 3 जागा जिंकण्यात यश मिळवलं. तर
 
सीपीआयने (एमएल) तीन जागांवर निवडणूक लढवून दोन जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे.
 
याचा अर्थ विरोधी मतांचा फायदा काँग्रेस किंवा सीपीआय (एमएल) जितका झाला, तितकाही फायदा तेजस्वी यांचा पक्ष राजदला होऊ शकला नाही.
 
ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर म्हणतात, "राजदला बिहारमध्ये चार जागा मिळाल्या हे देखील त्यांचं मोठं यश आहे. कारण राज्यात त्यांची एकही जागा नव्हती. राज्यात कुशवाह मतं फोडण्यात राजदला यश आलं. खेड्यापाड्यातील तरुणांमध्ये केंद्र सरकारबद्दल नाराजी होती, ज्याचा फायदा राजदला झाला आहे."
 
2020 मध्ये तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत वडील लालूप्रसाद यादव यांच्याशिवाय प्रचार केला होता. त्या निवडणुकांमध्ये, राजदने 23 टक्के मतांसह 75 जागा जिंकल्या आणि 243 जागांच्या बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आले.
 
इथूनच तेजस्वी यादव यांना राजकारणात महत्व येऊ लागलं. त्यानंतर 2022 मध्ये बिहारच्या महाआघाडी सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीही बनले.
 
त्या सरकारमध्ये तेजस्वी यादव आणि राजदने बिहारमधील तरुणांना सुमारे चार लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे श्रेय स्वतःकडे घेतलं होतं.
 
'तेजस्वी यादव एकटे पडले'
तेजस्वी बिहारमध्ये एकटे पडल्याने विरोधी पक्षांची कामगिरी सुमार असल्याचं ज्येष्ठ पत्रकार नचिकेता नारायण सांगतात.
 
तेजस्वी यादव यांना निवडणूक प्रचारात कोणत्याही मोठ्या नेत्याची साथ मिळाली नाही, तर उत्तर प्रदेशमध्ये राहुल आणि प्रियांका गांधी यांनीही जोरदार प्रचार केला.
 
नचिकेता नारायण म्हणतात, "निवडणुकीचे वातावरण निर्माण करणारे अरविंद केजरीवाल झारखंडला पोहोचले, पण बिहारमध्ये आले नाहीत. बिहारमधील विरोधी पक्षांमधील जागावाटपही नीट होऊ शकले असते. लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसला दूर लोटता येत नाहीत याचं मूल्यमापन लालू आणि राजदला करावं लागेल."
 
बिहारमधील विरोधी पक्षांमधील जागावाटपावर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह होतं. काँग्रेसच्या पप्पू यादव यांना पूर्णियातून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, याबाबतही बरीच चर्चा झाली.
 
लालूप्रसाद यादव काँग्रेससाठी ही जागा सोडायला तयार नव्हते. नंतर पप्पू यादव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही जागा लढवली, तर राजदच्या विमा भारती यांच डिपॉझिट जप्त झालं.
 
आम्ही बिहारमधील अनेक मतदारसंघाविषयी लालूप्रसाद यादव आणि राजद समर्थकांशी बोललो. यावर असं दिसून आलं की, त्यांच्याकडे पूर्णियामधून पप्पू यादव आणि सिवानमधून हेना शहाब यांच्याबद्दल राजदविरोधात तक्रारी होत्या. म्हणजेच या दोन नावांचा प्रभाव बिहारमधील अनेक जागांवर दिसून आला.
 
मतांच्या विभाजनामुळे रजदला केवळ सिवानची जागाच गमवावी लागली नाही तर शिवहर आणि सारणच्या जागांवरही अगदी कमी फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
 
लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य सारणमधून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्यासमोर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी निवडणुकीच्या रिंगणात होते.
 
तिकीट वाटपावर प्रश्न
2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजदने बिहारमध्ये 22 जागा जिंकल्या होत्या. त्या वर्षी काँग्रेसने तीन आणि एलजेपीने तीन जागा जिंकल्या होत्या.
 
2009 च्या लोकसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान काँग्रेससाठी जास्त जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे बिहारमध्ये भाजपविरोधी पक्षांची आघाडी तुटली. त्यावेळी लालूंच्या पक्षाला केवळ चार जागांवर विजय मिळवता आला तर रामविलास पासवान स्वतः हाजीपूरमधून निवडणूक हरले.
 
तेव्हापासून आजपर्यंत लालूप्रसाद यादव यांच्या राजदला बिहारमधील लोकसभा निवडणुकीत मोठ्या यशाची प्रतीक्षा आहे.
 
2014 च्या निवडणुकीतही रजदला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भोपळाही फोडता आला नाही.
 
या निवडणुकीतही बिहारमधील विरोधी पक्षांमधील जागावाटपावरून सुरुवातीपासूनच प्रश्न उपस्थित केले जात होते. विरोधी पक्षांमध्ये जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजदने अनेक उमेदवारांना तिकिटं दिली होती.
 
डी. एम दिवाकर म्हणतात, "विरोधकांनी उमेदवारांच्या निवडीतही चूक केली. उदाहरणार्थ, झांझारपूर मतदारसंघातील विरोधी उमेदवार सुमन कुमार महासेठ होते, जे आरएसएसशी संबंधित आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं नाही. इथून राजदचे आमदार गुलाब यादव बसपामधून उभे राहिले आणि इथूनच यादवांची मतं विभागली गेली.
 
राजदला जागा वाटप चांगल्या पद्धतीने करता आलं असतं. या प्रकरणी पुर्निया जागेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. माजी खासदार पप्पू यादव हे निवडणूक लढवण्याची अनेक दिवसांपासून तयारी करत होते.
 
त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, पण पूर्णियाची जागा काँग्रेससाठी सोडण्यास राजद तयार नव्हता. अखेर पप्पू यादव यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करत ही जागा अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली.
 
असं म्हटलं जातंय की, जिथे काँग्रेस निवडून येण्याची शक्यता होती त्या जागांपासून त्यांना दूर ठेवण्यात आलं. या संदर्भात बिहारमधील वाल्मिकी नगर ही जागाही खूप महत्त्वाची आहे.
 
2020 मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रवेश मिश्रा यांचा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला. मात्र यावेळी राजदने ही जागा स्वत:साठी ठेवली आणि इथेही त्यांचा पराभव झाला.
 
बिहारमधील मधुबनीची जागाही काँग्रेसला देण्यात आली नाही. काँग्रेस नेते शकील अहमद इथलेच आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला ही जागा मिळाली नाही, त्यानंतर शकील अहमद यांनी ही जागा अपक्ष म्हणून लढवली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. तर राजदच्या उमेदवाराला खूप कमी मतं मिळाली.
 
Published By- Dhanashri Naik